डॉ. उज्ज्वला दळवी
‘‘अगं, अलीकडे माझे सांधे धरतात आणि सुजतातसुद्धा. वयपरत्वे व्हायचंच म्हणा. शिवाय भूक लागत नाही. ओठ फुटलेत. अंगाला खाज येते. डोळे कसकसतात. कॅन्सरच्या परिणामाने होतं का ग असं?’’ कुशाताईंनी विचारलं.
डॉक्टर भाचीने तपासण्या करून घेतल्या. किडनीच्या, लिव्हरच्या कामात गोलमाल होता. कोलेस्टेरॉल वाढलं होतं. ‘‘मावशी, तू औषधं कुठली घेतेयस?’’
‘‘ती तू दिलेली ब्लड प्रेशरची एकच गोळी.’’
भाचीने त्यांचा औषधांचा खण उपडा केला. खणात अ-जीवनसत्त्वाच्या गोळय़ांची पाकिटं होती. कुशाताईंचा गर्भाशय कॅन्सरमुळे चार वर्षांपूर्वी काढून टाकला होता. ‘अ-जीवनसत्त्व घेतल्याने कॅन्सर पुन्हा उद्भवत नाही,’ असं त्यांनी पूर्वी वर्तमानपत्रात वाचलं होतं. नंतरच्या संशोधनाने ते मत खोडून काढल्याचं त्यांच्या गावीही नव्हतं! म्हणून त्यांनी गेली तीन-चार वर्ष रोज अ-जीवनसत्त्वाची भारी गोळी घेतली होती. ‘जीवनसत्त्व हे काय औषध असतं?’ म्हणून त्याचा औषधांत उल्लेखही केला नव्हता. त्यांना त्या जीवनसत्त्वाची विषबाधा झाली होती.
जीवनसत्त्वांचा अतिरेक सहसा नुसत्या आहारामुळे होत नाही. काही अपवाद आहेत : ध्रुवाजवळच्या सस्तन प्राण्यांच्या लिव्हरमध्ये अ-जीवनसत्त्वाचा मोठा साठा असतो. एस्किमो ध्रुवाजवळच्या अस्वलाचं मांस खातात पण त्याची लिव्हर खात नाहीत. १९१२ साली काही रशियन खलाशी उत्तर ध्रुवाजवळचा नवा सागरी मार्ग शोधायला गेले. त्यांच्यातल्या एका भुकेल्या खलाशाने तिथल्या अस्वलाच्या लिव्हरवर ताव मारला. त्याला ताप भरला, डबल दिसू लागलं. डोकं दुखलं, अंग ठणकलं. शरीरभर फोड आले.. ही अ-जीवनसत्त्वाची विषबाधा. त्या मोहिमेतले दोघेच खलाशी जिवानिशी बचावले. त्यांपैकी एकानं ते करुण वर्णन नोंदून ठेवलं. टय़ूना, शार्क, सी-बास वगैरे माशांच्या लिव्हरमध्येही अ-जीवनसत्त्वाची रेलचेल असते.
दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांकडे रडारचं नवं तंत्रज्ञान आलं. त्याने जर्मनांची विमानं अचूक टिपता येऊ लागली. जर्मनांना रडारची कुणकुण लागू नये म्हणून इंग्रजांनी वावडी उठवली, ‘इंग्रजी गाजरांतल्या अ-जीवनसत्त्वामुळे वैमानिकांची नजर तीक्ष्ण होते.’ जर्मन फसले नाहीत. पण इंग्रज जनता मात्र ब्लॅक-आउटच्या काळोखात दिसावं म्हणून गाजराचे ढिगारे खाऊ लागली. तिच्या गोऱ्यापान त्वचेला शेंदरी-पिवळी छटा आली! सुदैवानं कुणाला विषबाधा झाली नाही. शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असली तर ती बाहेरून जरूर घ्यावी. शरीरातल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींसाठी, प्रकृतिस्वास्थ्यासाठी जीवनसत्त्वांची आवश्यकता असते. नितळ दृष्टी आणि निकोप त्वचेसाठी अ-जीवनसत्त्व, हाडं बळकट करायला ड-जीवनसत्त्व आवश्यक असतात. सूर्यप्रकाशात आपल्या त्वचेखाली थोडं ड-जीवनसत्त्व बनतं. मोठय़ा आतडय़ातले जंतू त्यांच्या गरजेपुरतं ब-जीवनसत्त्व आणि आपल्यालाही मिळेल असं ‘के’ (ङ)-जीवनसत्त्व बनवतात. याखेरीज आपल्या शरीरात जीवनसत्त्वं बनत नाहीत. ती संतुलित आहारातूनच मिळतात.
पण आजकालचा आहार संतुलित नसतो. मग लोक पापक्षालनार्थ सर्रास जीवनसत्त्वांच्या गोळय़ा घेतात. दह्यदुधात, पावबिस्किटांत जादाची जीवनसत्त्वं कोंबलेली असतातच. नियमांनी त्या कोंबण्यावर मर्यादा घातल्या आहेत. पूरक गोळय़ा किती घ्याव्या तेही डॉक्टर सांगू शकतात. पण बहुतेकदा कमतरता नसली तरीसुद्धा, लोक स्वत:हून स्वत:वर त्या गोळय़ांचा भडिमार करतात. त्यामुळे अतिरेक, विषबाधा होऊ शकते.
साठीच्या शालीआत्यांना बद्धकोष्ठाचा त्रास होता. पोटात मुरडा येई. पुन्हापुन्हा लघवीला धावावं लागे. सतत तहानेने जीव व्याकूळ होई. थकवा इतका की संडासातून उठणं अशक्य होई. तपासणीत मूतखडा दिसला. रक्तातल्या कॅल्शियमची पातळी गगनभेदी होती. जाणकार डॉक्टरांनी आत्यांच्या औषधांची पिशवी ओतून पाहिली. ‘‘त्या मल्टिव्हिट्स गोळय़ा माझ्या डॉक्टर सासऱ्यांनी दिल्या. कॅल्सीडी ह्यंनी मुद्दाम आणून दिल्या. आता दोघेही नाहीत. गोळय़ा कशा थांबवू? माझ्या थकव्यासाठी बंडूने व्हिटलाइफ आणल्या,’’ आत्यांनी त्यांच्या खजिन्यातल्या रत्नांची माहिती दिली. आत्या कॅल्सीडी ही ड-जीवनसत्त्वाची, दोन महिन्यांतून एकदाच घ्यायची, अती ताकदवान गोळी रोज घेत होत्या. शिवाय बाकीच्या दोन गोळय़ांतही ड-जीवनसत्त्व होतंच. आत्यांचं आजारपण त्या अति-डमुळेच उद्भवलं होतं. जखम झाल्यावर रक्तातली काही प्रथिनं रक्तस्राव थांबवतात. त्यांच्यातली काही महत्त्वाची प्रथिनं बनवायला, लिव्हरला ‘के’-जीवनसत्त्वाची गरज असते. ‘के’ चे दुष्परिणाम क्वचितच दिसतात.
प्रमाण वाढल्यामुळेच प्रश्न
ई-जीवनसत्त्व मेंदूला पोषक आहे. मधुमेहाचे किडनीवरचे दुष्परिणाम, दम्याची, संधिवाताची तीव्रता घटवतं. ते कर्करोगविरोधीही आहे. ‘लाख दुखों की एक दवा’ वाटणारं ते जीवनसत्त्व लघवीतून, पित्तातून सहज बाहेर टाकलं जातं. त्यामुळे निरोगी माणसांत त्याचे दुष्परिणाम सहसा दिसत नाहीत. तरीसुद्धा फार मोठय़ा प्रमाणात घेतलं की ते ‘के’-जीवनसत्त्वाच्या कामात लुडबूड करतं. रक्तस्रावाचा धोका वाढतो. अगदी विषबाधा झाली नाही तरीही अ, ई जीवनसत्त्वांच्या दीर्घकाळ सेवनामुळे मृत्युदर वाढतो.
‘अ, ड, ई आणि ‘के’ ही तेलात विरघळणारी (तैलविद्राव्य) जीवनसत्त्वं आपल्या चरबीत, लिव्हरमध्ये साठून राहतात म्हणून त्यांची विषबाधा होते. पाण्यात विरघळणारी (जलविद्राव्य) जीवनसत्त्वं लघवीतून निघून जातात, त्यांना दुष्परिणाम नाही,’ हा गैरसमज आहे. पाण्यात विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांपैकी बी-कॉम्प्लेक्स घराणं तालेवार! थकवा, हातापायांची जळजळ, मुंग्या येणं वगैरे तक्रारींसाठी ब-१, ब-६, ब-१२ त्रिकुटाच्या गोळय़ा-इंजेक्शनांची खिरापत वाटली जाते. त्यांच्या अतिरेकाने आकडी येऊ शकते, सूर्यप्रकाश सोसेनासा होतो. ब-१२चा मारा झाला तर अॅलज्र्या वाढतात, हृदय थकतं, फुप्फुसांत पाणी साचतं. ब-घराण्यातले बाकीचेही भाऊबंद प्रमाणाबाहेर घेतले की वेगवेगळा त्रास देतात.
लायनस पाविलग या नोबेलविजेत्यानं १९७० मध्ये, ‘रोज ३००० मि.ग्रॅ.क-जीवनसत्त्व घेणं हा सर्दीवरचा उत्तम उपाय,’ असा डंका पिटला. त्याला कसल्याही भक्कम संशोधनाचं पाठबळ नव्हतं. पाविलगला जाऊन तीस वर्ष झाली. पण आजही लोक शिंक आली की क-जीवनसत्त्वाच्या गोळय़ा पेपरिमटसारख्या खातात! क-जीवनसत्त्व हे आम्ल आहे. त्या आम्लाचं मोठय़ा प्रमाणात सेवन केल्यामुळे जळजळ, जठरात जखमा (अल्सर) होतात. आम्ल वातावरणात ब-घराण्यातल्या काही जीवनसत्त्वांचं शोषण होतच नाही. तर काही पदार्थ (ऑक्झेलेट) आतडय़ातून अधिक शोषले जातात. त्यांमुळे मुतखडे होतात.
एका अमेरिकेतच दरवर्षी ६०,००० लोकांमध्ये जीवनसत्त्वांच्या अतिसेवनाचे घातक परिणाम दिसून येतात. गरोदरपणी मोठय़ा प्रमाणात जीवनसत्त्वं घेतल्यास पोटातल्या बाळावर दुष्परिणाम होतात. अर्थात, जीवनसत्त्वांचा अतिरेक झाला तर फक्त ती जीवनसत्त्वं घेणं बंद केलं आणि भरपूर पाणी प्यालं की हळूहळू शरीरात साठलेल्या त्या गुणी पदार्थाची त्रासदायक अडगळ कमी होत जाते. त्याच्यासाठी आणखी वेगळय़ा औषधांचा मारा करायची गरज नसते.
असंतुलित आहारामुळे तसेच वाढत्या वयात, उतारवयात पूरक जीवनसत्त्वांची गरज असते. वेगवेगळय़ा कारणांनी जीवनसत्त्वांची कमतरता होऊ शकते. तशी झाली तर किंवा ती टाळण्यासाठी, डॉक्टरांच्या सल्ल्याने, गरजेपुरती जीवनसत्त्वं जरूर घ्यावी. आपल्या मर्जीने स्वत:वर जीवनसत्त्वांचा भडिमार करू नये. साठी पार केलेल्या, एकटय़ा राहणाऱ्या माणसांचे औषधांचे खण-बटवे नियमितपणे तपासावे. तेवढय़ानेच अनेक संभाव्य आजारांची पाळंमुळं खणून टाकता येतील.