महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमा प्रश्नावरून कमालीची कटुता असली तरी या दोन शेजारील राज्यांमध्ये सत्ता आणि सद्य:स्थितीतील राजकारण यात समान धागा आहे. भाजपचे महाराष्ट्रात १०५ तर कर्नाटकात १०४ आमदार निवडून आले होते. दोन्ही राज्यांमध्ये भाजपला सत्तेचा जादूई आकडा गाठता आला नव्हता. तरीही दोन्ही राज्यांमध्ये भाजपने सरकारे स्थापन केली. पण सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्याने कर्नाटकात येडियुरप्पा तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अल्पजीवी ठरले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला त्याच धर्तीवर कर्नाटकात काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. दोन्ही राज्यांमध्ये पहिल्या दिवसापासून सरकारे पाडण्यासाठी भाजपने जोर लावला. ‘ऑपरेशन लोटस’मध्ये सरकार गडगडून भाजप सत्तेत आला. राज्यात शिवसेनेतील फाटाफुटीनंतर सत्ताबदल झाला. कर्नाटकात जनता दलातून भाजपवासी झालेल्या बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. राज्यातही शिवसेनेच्या फुटीर एकनाथ शिंदे यांच्याकडे नेतृत्व सोपविण्यात आले. याच बोम्मई यांची आता येत्या विधानसभा निवडणुकीत कसोटी लागली आहे. दक्षिणेकडील राज्यात भाजपला पहिल्यांदा सत्ता मिळवून देणाऱ्या येडियुरप्पा यांची मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली तेव्हापासूनच तिथे भाजपच्या सत्तेचा लंबक काही स्थिर राहिला नाही. लिंगायत समाज आणि येडियुरप्पा यांना खूश ठेवण्याकरिता जनता दलातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बसवराज बोम्मई यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्यात आले. पण गेल्या पावणेदोन वर्षांत बोम्मई स्थिरस्थावर होऊ शकले नाहीत. पक्षांतर्गत हेवेदावे तर होतेच पण बोम्मई सरकारवर ४० टक्के दलालीचा आरोप होऊ लागला. ठेकेदारांनी तर जाहीरपणे आरोप केला. टक्केवारीमुळे होणाऱ्या मंत्र्याच्या जाचाला कंटाळून एका ठेकेदाराने आत्महत्या केल्यावर तर भ्रष्टाचार आणि टक्केवारीचा मुद्दा अधिकच गाजला. काँग्रेसने तर ‘पे सीएम’, ‘४० टक्के दलालीचे सरकार’ असे फलक जागोजागी लावले होते.‘ न खाऊंगा न खाने दुंगा’ हे मोदींचे ब्रीदवाक्य, पण दलाली आणि टक्केवारीच्या आरोपांमुळे कर्नाटक भाजप सरकारची प्रतिमा मलिन झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा