‘ऑस्कर’ पुरस्कारांच्या लोभस सोहळ्यात ‘अॅण्ड द विनर इज..’ या चार शब्दांनंतर तिचे नाव दोनदा घोषित झाले होते. होय, १९७० च्या ‘विमेन इन लव्ह’ आणि १९७४ च्या ‘अ टच ऑफ क्लास’साठी ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली होती. पण एकदाही तिने त्या सोहळ्याच्या मंचावर जाऊन पुरस्काराची ती ‘ऑस्करमूर्ती’ स्वत: स्वीकारली नाही. तिच्या वतीने कुणा अमेरिकी प्रतिनिधींनीच ते काम केले.. ग्लेन्डा जॅक्सन ही हॉलीवूडची अभिनेत्री नव्हतीच. ती होती ब्रिटिश.. अट्टल ब्रिटिश. तिचे १५ जून रोजी निधन झाल्याच्या बातम्यांनी जगाला हेही सांगितले की, ती एक कार्यक्षम, विचारी स्त्री होती. कामगार संघटनांच्या राजकारणाशी आणि ब्रिटिश मजूर पक्षाशी (लेबर पार्टी) तिचा वैचारिक संबंध होता आणि राजकारणासाठी १९९० पासून अभिनय पूर्णत: थांबवल्यानंतर पार्लमेण्टमध्ये हॅम्पस्टेड मतदारसंघातून तीनदा तिची निवड झाली होती.
तमाम अट्टल ब्रिटिश अभिनयकारांची सुरुवात बहुतेकदा शेक्सपिअरच्या नाटकांपासून होते, तसे काही ग्लेन्डा जॅक्सन यांचे झाले नाही. लंडनच्या ज्या ‘राडा’मधून आपले इब्राहिम अल्काझी १९५० मध्ये स्नातक झाले, त्या रॉयल अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टमधून या १९५७ मध्ये बाहेर पडल्या- म्हणजे वयाच्या एकविसाव्या वर्षी. पण शेक्सपिअर सोसायटीच्या चाचण्यांमध्ये नाकारल्या गेल्या म्हणून मिळेल त्या नोकऱ्या करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. शेक्सपिअरच्या नाटकात पहिली संधी मिळाली ती वयाची तिशी गाठल्यानंतर, १९६७ साली ‘हॅम्लेट’मधली ऑफीलिया म्हणून. त्या वेळच्या एका मुलाखतीतले, ‘मला खरे तर हॅम्लेटची मुख्य भूमिकाच करणे आवडेल’- हे जॅक्सनबाईंचे विधान बरेच गाजले होते. पण िलगभाव-समानता वगैरे संकल्पनांचा बोलबाला नसतानाच्या काळात मुखर केलेली ती आंतरिक इच्छा सुमारे अर्धशतकानंतर पूर्ण झाली, ‘किंग लिअर’ या शेक्सपिअरी नाटकातील लिअरची भूमिका २०१६ त्यांनी साकारली तेव्हा. वयाच्या ऐंशिव्या वर्षी या भूमिकेचे सोने करताना हालचाली, आवाज हे सारे त्यांनी पणाला लावले. वाहवा झालीच, पण ‘विशिष्ट वयानंतर तुम्ही स्त्री आहात की पुरुष, याला काहीही अर्थ नसतो’ हे पुन्हा मुलाखतीतच केलेले विधानही महत्त्वाचे ठरले.
१९९० ते २०१५ अशी तब्बल २५ वर्षे त्या अभिनय करत नव्हत्या म्हणजे नव्हत्या. त्याआधी अनेक ब्रिटिश चित्रपट, नाटके आणि टीव्ही मालिका अथवा टीव्हीपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या. ‘विमेन इन लव्ह’मध्ये वस्त्रहीन ‘लव्ह सीन’ केला, ‘मी सहा महिन्यांची गरोदर असताना हा चित्रपट पूर्ण झाला होता’ ही माहिती त्यांनीच, त्यांचे चरित्रकार ख्रिस्टोफर ब्रायन्ट यांना दिली होती. ‘लोकप्रिय नटय़ा’ राजकारणात येतात, तसा त्यांचा राजकारणप्रवेश नव्हता. टोनी ब्लेअर यांच्यासह विरोधी पक्षात आणि पुढे राज्यमंत्री दर्जाच्या पदावर त्यांनी काम केले होते आणि रेल्वे कामगार संघटनांच्या प्रश्नांत त्या रस घेत.