‘आम्हाला त्रास देण्यासाठीच तुम्ही क्रिकेट खेळता’ असा अचाट आरोप सात-आठ वर्षांच्या मुलावर करणाऱ्या बेलवंडेआजी. पण त्यांच्या बाल्कनीत पडलेला बॉल परत घेऊन जाण्याची परवानगी आजोबा देतात. तरीही करवादणाऱ्या या आजी, ‘तिथल्या फुलांना हात लावू नको’ म्हणत या मुलाच्या मागे जातातच.. मुलाचा दंड तिथे वाळत घातलेल्या चादरीला लागतो आणि बॉल परत घेऊन जातानाच वाळलेली चादरही तो आजींना आणून देतो. त्यानंतर या आजीला आपल्या दूरच्या नातवंडांची, त्यांनी कधीच अशी मदत न केल्याची आठवण आली आहे आणि भावनांचा कल्लोळ दाबून, लाडूवडय़ांचे डबे चाचपून याच मुलाला आजी आता लाडू भरवणार आहेत! – ‘बोक्या सातबंडे’ या चित्रपटातला हा पहिलाच प्रसंग जिवंत करणाऱ्या आजी म्हणजे चित्रा. ‘बोक्या..’च्या आदल्या वर्षी (२००८ मध्ये) याच चित्रा नवाथे ‘टिंग्या’ची आजी होत्या.
डोंगराळ भागात, कच्च्या घरांत राहणारी काहीशी बेरकी आजी. पंचाहत्तरीच्या उंबरठय़ावर असताना चित्रपटसृष्टीत त्यांचे पुनरागमन झाले नसते, तर कदाचित त्यांच्या अभिनयाचे वैविध्यही दिसले नसते. कारण वयाच्या पासष्टीला स्मिता तळवलकरांच्या आग्रहाखातर ‘तू तिथं मी’ (१९९८) या चित्रपटात गाण्यांच्या भेंडय़ा खेळण्याच्या प्रसंगात ‘लखलख चंदेरी तेजाची..’ म्हणत नाचण्यापुरताच सहभाग सोडला, तर चित्रा यांचे सारे चित्रपट १९५५ च्या आधीचे.
त्या मोजक्या चित्रपटांतूनही चित्रा आठवत राहातात.. पुलंच्या ‘देवबाप्पा’मधली नर्स म्हणून नोकरी करणारी आई तर ‘गुळाचा गणपती’मध्ये नाऱ्याच्या स्वप्नात ‘इथेच टाका तंबू..’ या गाण्यावर नाचणारी पण त्याला वास्तवाचे भान देऊ पाहणारी लीला, ‘लाखाची गोष्ट’मध्ये गाणारी, फुरंगटणारी निव्र्याज प्रेयसी अशा शहरी चेहऱ्याच्या भूमिका त्यांनी केल्या. संसारात पडल्यावर काही काळ ‘लग्नाची बेडी’, ‘तुझे आहे तुजपाशी’ अशा नाटकांतून काम केले.
मराठीत साधारण १९५८ पासून आलेल्या ग्रामीण, तमाशाप्रधान चित्रपटांच्या लाटेपासून चित्रा आणि त्यांची बहीण रेखा या दोघीही अभिनेत्री दूरच राहिल्या हे स्वाभाविक, कारण दोघींकडे ‘दादरला राहणाऱ्या मध्यमवर्गीय मुली’ म्हणूनच प्रेक्षकांनीही पाहिले होते. या बहिणींची मूळची नावे कुसुम आणि कुमुद. थोरली कुसुम म्हणजे चित्रा. लहान वयातच चित्रपटांमधील मुलांच्या गर्दीत काम करावे लागले, नृत्य शिकताना तर चित्रपटांची गोडीच लागली आणि हिंदूीतही सहनृत्यांगना म्हणून त्यांनी काम केले. राज कपूर यांच्या एका चित्रपटाच्या सेटवर, सहदिग्दर्शक राजा नवाथे भेटले आणि ते चित्रा यांचे जन्माचे जोडीदार झाले. राजा नवाथे २००५ मध्ये निवर्तल्यानंतरच चित्रा पुन्हा चित्रपटांत आल्या. मात्र करोना साथीच्या काळात त्या वृद्धाश्रमात राहू लागल्या, तिथूनच त्यांना अखेर रुग्णालयात नेण्यात येऊन त्यांचा जीवनप्रवास संपला.