अन्यायकारक राज्यात फक्त सत्ताधाऱ्यांच्या जवळचे असलेल्या काही जणांच्याच अभिव्यक्तीला मुक्त वाव असतो , मग अशा सत्ताधारीप्रिय गणंगांनी राष्ट्रपुरुषांचा अपमान केला तरीही ते मोकाटच असतात – फार तर, भिडेखातर त्यांचा तोंडी निषेध केला जातो ; पण बाकीचे – अर्थात सत्ताधाऱ्यांच्या विरोधी भूमिका घेणारे – मात्र बारीकसारीक खुसपटे शोधून आरोपांच्या फेऱ्यात अडकवले जातात.. या सर्वकालिक कटु सत्याचा पूर्व युरोपीय पुरावा म्हणजे चित्रकार आणि हरहुन्नरी कलावंत अलेस पुष्किन . मूळचा बेलारूसचा. आपल्या देशात खरोखरची लोकशाही नांदावी, यासाठी गेली कैक वर्षे तळमळीने प्रयत्न करणाऱ्या अलेस पुष्किन यांचे ११ जुलै रोजी बेलारूसच्या कैदेतच निधन झाल्याची बातमी जगभर पोहोचली, तेव्हा देशोदेशींच्या अन्यायकारक राजवटी कशा प्रकारे अभिव्यक्तीवर दहशत बसवण्याचा प्रयत्न करतात, सत्तेमुळे माजलेल्या राज्यकर्त्यांच्या मागे त्यांची तथाकथित कायदेशीर पण प्रत्यक्षात दमनकारी यंत्रणा कशी राबत असते, याचेही दर्शन जगाला घडले.
अलेस पुष्किन हे ५७ वर्षांंचे होते – म्हणजे पंचविशीपर्यंतची उमर त्यांनी सोव्हिएत राजवटीत काढली होती, पण अवघ्या अठराव्या वर्षी (१९८४ मध्ये) त्यांना अफगाणिस्तानात रशियन फौजांचा भाग म्हणून धाडण्यात आले होते. मात्र दोनच वर्षे ही सक्तीची लषकरी सेवा करावी लागली, त्यानंतर ऐन उमेदीच्या काळात बर्लिनिभत पडण्यापासून बेलारूसच्या स्वातंत्र्यापर्यंत, मुक्त अभिव्यक्तीची आशा जागवणारे अनेक क्षण ते जगले होते. या सर्व काळात ते ज्या कलाशाळेत शिकले, तेथे २१५ चौरस फूट आकाराचे प्रचंड भित्तिचित्र त्यांनी केले. चित्रपटकार आंद्रे तारकोवस्की यांच्यासह अनेक महनीय कलावंतांची ही शाळा असल्याचे सांगणारे ते चित्र इतके गाजले की, त्यांना थेट मॉस्कोमध्ये चित्रकार म्हणून मानाचे स्थान मिळाले. तो काळ गोर्बाचेव्ह यांच्या पेरेस्त्रोइका धोरणाचा असल्याने, राजकीय / सामाजिक आशयाच्या अभिव्यक्तीतून जरी तत्कालीन राज्यकर्त्यांवर रोख दिसला तरी कुणी छळ केला नाही!
बेलारूसने सार्वभौमत्वाची घोषणा केली, तेव्हापासून मात्र हा आपला सार्वभौम देश कसा असावा, कशा प्रकारे चालावा अशा अपेक्षांची अलेस पुष्किन यांनी केलेली अभिव्यक्ती वादग्रस्त ठरवली जाऊ लागली! वास्तविक, बेलारूसने आता स्वत:स समाजवादी प्रजासत्ताकाऐवजी लोकशाही प्रजासत्ताक म्हणावे, अशा प्रकारच्या या अपेक्षा होत्या! मग १९९४ मध्ये अलेक्झांडर लुकाशेन्को हे सत्ताधारी झाले, तेव्हा लोकशाहीच्या आशाच करपून जाणार हे उघड होत असूनही अलेस पुष्किन हे लढय़ाच्या पवित्र्यात उभे राहिले. हा लढाही कलेकडे कल असलेलाच होता, हे विशेष. उदाहरणार्थ, लुकाशेन्को हे रशियन राजवटीतील कृषी पदाधिकारी होते आणि खतांचा वापर आपणच वाढवल्याचा अक्कलशून्य तोरा ते मिरवत; यावर जळजळीत भाष्य करणारी कलाकृती म्हणून , गाडे भरभरून खत आणून अलेस पुष्किन यांनी ते लुकाशेन्को यांच्या प्रासादासमोर ठेवले – ओतले आणि त्यावर लुकाशेन्कोंचा फोटो लावून , तुमच्या खतावर आमची शेती नको अशा घोषणा दिल्या. तिरकसपणाचा हाच धागा पुढे नेऊन ‘ नाझींना मदत करणारा येवगेनी झिपर हाही राष्ट्रपुरुषच मानावा लागेल’’ असे भाष्य करू पाहणाऱ्या कलाकृतीचा मात्र पद्धतशीर उलटा अर्थ लावून , अलेस पुष्किन याला देशाबद्दल अप्रीती दाखवण्याच्या कलमांखाली डांबण्यात आले, असे खटले हाताळण्यात तरबेज असलेल्या न्यायाधीशांनी त्याला पाच वर्षांंची कैद ठोठावली आणि ही शिक्षा भोगत असतानाच त्याचा अंत झाला. अलेस पुष्किन यांच्या कलाकृती मात्र अन्य युरोपीय देशांत दिसत राहातील – लुकाशेन्को यांची राजवट अन्यायकारक होती, याचा इतिहास त्या कलाकृतींतून दिसेल!