रोज १०० नेत्र शस्त्रक्रिया, रोज १५०० नेत्ररुग्णांवर उपचार, जवळपास हजारभर कर्मचाऱ्यांचा ताफा आणि १०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स एवढे वार्षिक उत्पन्न असा पसारा चालवणाऱ्या शंकर नेत्रालयाची स्थापना हे डॉ. एस. एस. बद्रीनाथ यांचे महत्त्वाचे योगदान. डॉ. सेंगामेदु श्रीनिवास बद्रीनाथ हे भारतभरातल्या गरजू नेत्ररुग्णांसाठी गेली पाच दशके आशेचा किरण ठरले ते त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभ्या केलेल्या या कामामुळेच. १९७८ मध्ये चेन्नईमध्ये सुरू झालेले शंकर नेत्रालय हे भारतामधले सगळय़ात मोठे आणि ना नफा आणि ना तोटा तत्त्वावर चालणारे नेत्र रुग्णालय आहे. परवडणाऱ्या किमतीत चांगले नेत्रोपचार, अंधत्व हाताळण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि नेत्र आजारांवरील संशोधन ही तीन प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून त्याची स्थापना झाली आहे. लहानपणी असलेल्या विशिष्ट आजारामुळे बद्रीनाथ यांचे शालेय शिक्षण उशिरा म्हणजे वयाच्या सातव्या वर्षांनंतर सुरू झाले. त्यांचे आई-वडील त्यांच्या लहानपणीच निवर्तले. बद्रीनाथ यांना आश्रय देणाऱ्या नातेवाईकांचे अंधत्व आणि त्यातल्या अडचणी बघून बद्रीनाथ यांनी डोळय़ांचे डॉक्टर व्हायचा निर्णय घेतला. आई-वडिलांच्या आयुर्विम्याच्या पैशातून त्यांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर अमेरिकेत जाऊन ‘न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल स्कूल’मधून पदव्युत्तर शिक्षण घेतले. काही काळ तिथेच वैद्यकीय प्रॅक्टिसही केली. तिथेच त्यांना वासंती अय्यंगार ही बालरोगतज्ज्ञ असलेली त्यांची सहधर्मचारिणीही भेटली. अमेरिकेतल्या नोकरीत असलेली उत्तम करिअरची संधी सोडून त्यांनी आपले ज्ञान लोकांसाठी वापरायचे ठरवले . १९७० च्या सुमारास ते दोघेही भारतात आले आणि दोघांनीही आपापल्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा