‘शॉर्टहॅण्ड, टायिपग’ शिकून नोकरीला लागता येत होते तेव्हाची गोष्ट. १९३६ साली जन्मलेल्या आणि युद्धकाळाच्या ओढगस्तीत लंडनमध्ये वाढलेल्या ऑड्री वेस्ट वयाची विशी गाठतानाच नोकरी करू लागल्या. पण पगार बेताचाच. स्वित्र्झलडच्या आल्प्स पर्वतरांगेकडे जाणे अशक्य असल्याने लंडनमधल्या उंच इमारतींवरच ‘गिर्यारोहणा’ची हौस भागवण्याचे ऑड्री यांनी १९६० साली ठरवले. लंडनमध्येच तसे प्रशिक्षण नुकतेच सुरू झाले होते तिथे त्या सामील झाल्या आणि पुढे या प्रशिक्षित लंडनवासींनीच स्थापलेल्या ‘टय़ूसडे क्लाइिम्बग क्लब’च्या शाखाप्रमुखही झाल्या. याच मंडळात त्यांना पीटर साल्केल्ड भेटले आणि त्या ऑड्री साल्केल्ड झाल्या. पण पस्तिशीत वाचलेल्या एका लेखाने त्यांचे आयुष्य बदलले.. ‘माउंटन’ नियतकालिकाच्या १९७१ मधील एका अंकातला तो लेख जॉर्ज मॅलरी आणि अॅण्डर्य़ू आयर्विन यांच्या जून १९२४ मधल्या एव्हरेस्ट- मोहिमेबद्दलचा. या मोहिमेतच प्राण गमावण्यापूर्वी मॅलरी यांनी शिखर सर केले असावे का, या शंकेला त्या लेखाने काही आधार दिले होते. ‘कशी असेल ती मोहीम?’ या कुतूहलाने ऑड्री साल्केल्ड यांना इतके झपाटले की, त्या स्वत:च या मोहिमेच्या पुनशरेधासाठी सज्ज झाल्या! त्यासाठी ‘माउंटन’नेही त्यांना नेपाळला पाठवले. त्या फेरीतही काम पूर्ण नाही झाले, म्हणून ऑड्री पुन:पुन्हा एव्हरेस्ट पायथ्याशी जात राहिल्या. १९८६ साली- म्हणजे पन्नाशी गाठताना- त्या एव्हरेस्ट शिखरावरही गेल्या! त्याआधीही एव्हरेस्टच्या वाटेवर त्यांची शोधभ्रमंती सुरूच असते. ‘गिर्यारोहणाचा इतिहास’ सांगणारे तोवर होते, पण ‘एव्हरेस्ट मोहिमांच्या इतिहासकार’ म्हणून पहिले नाव घेतले जाईल ते ऑड्री साल्केल्ड यांचेच!
‘द मिस्टरी ऑफ मॅलरी अॅण्ड आयर्विन’ (१९८६) या पुस्तकापासून इतिहासकार म्हणून ऑड्री यांचा प्रवास सुरू झाला. त्यांची नंतरची पुस्तके विविध शिखरांच्या गिर्यारोहण- इतिहासाबद्दल आहेत. यात आफ्रिकेतल्या सर्वोच्च किलिमांजारो शिखराबद्दलचे पुस्तक, ‘पीपल इन हाय प्लेसेस’ हे अत्युच्च शिखरे गाठणाऱ्यांबद्दलचे तर ‘ऑन द एज ऑफ युरोप’ हे युरोपीय (आल्प्स) शिखरांबद्दलचे पुस्तक आहे. पण एव्हरेस्टबद्दल पुन्हा मॅलरी यांचा छायाचित्रमय इतिहास, ‘द लास्ट क्लाइम्ब’ तसेच ‘क्लाइिम्बग एव्हरेस्ट’ अशी अन्य दोन पुस्तके असा ऐवज ऑड्री यांच्या नावावर आहे. ‘प्रत्येक गिर्यारोहक हा गिर्यारोहणाचा इतिहासकारही असतोच’ असे विनयाने म्हणणाऱ्या ऑड्री यांचा भर गिर्यारोहकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणे आणि मग त्या नोंदी पडताळून पाहाणे यावर असे. जर्मनभाषक गिर्यारोहकांशी बोलता यावे यासाठी त्या जर्मन शिकल्या आणि त्यांच्या पुस्तकाची जर्मन भाषांतरे तर झालीच, पण मूळ जर्मनमधूनही काही पुस्तके आली. एव्हरेस्ट सर केल्याचा उल्लेखच ‘लिन्क्डइन’च्या प्रोफाइलवर न करता ‘संशोधक- गिर्यारोहण संशोधनात प्रावीण्य- कामासाठी उपलब्ध’ असे लिहिणाऱ्या ऑड्रीबाई, ११ ऑक्टोबर रोजीच मनोभ्रंशाच्या (डिमेन्शिया) विकाराने वारल्या, ही बातमी ४ नोव्हेंबर रोजी कुणा गिर्यारोहण-ब्लॉगला समजलीदेखील.. पण जगापुढे ती येण्यास बरेच दिवस लागले.
.. मॅलरीचाही मृत्यू असाच, काही दिवसांनी जगाला समजला होता !