‘मी जाडय़ा माणसांची चित्रं काढत नाही’- असे ठासून सांगणाऱ्या फर्नादो बोतेरो या चित्रकाराने १९५९ पासून ते अगदी सप्टेंबरात निधन होईपर्यंत जी काही चित्रे रंगवली, कांस्य-शिल्पे घडवली त्यांमधली सारी माणसे फुगीर चेहऱ्याची आणि पुष्ट, फुगलेल्या अवयवांचीच आहेत. चित्रकलेचा गंध नसलेल्या कुणालाही ‘बोतेरोची मोनालिसा’ चटकन ओळखू येते. बोतेरोने घोडा काढला तर तोही गोबरा-गोबरा, अस्वल तर आणखीच गरगरीत, बोतेरो यांनी शिल्प म्हणून घडवलेला ‘रोमन योद्धा’ केवळ ढाल-तलवारीमुळे रोमन म्हणायचा- नाही तर तो दिसतो एखाद्या सुमो पैलवानासारखा! अशीच चित्रे बोतेरो यांनी का केली, हा प्रश्न चित्रकलेत रस असणाऱ्यांसाठी महत्त्वाचा राहीलच. पण दक्षिण अमेरिकेतल्या कोलंबिया देशाच्या ग्रामीण भागात जन्मलेल्या, वयाच्या १८ व्या वर्षीपर्यंत त्या देशाची राजधानीसुद्धा न पाहिलेल्या फर्नादो बोतेरो यांना जगभर प्रसिद्धी मिळाली, पॅरिस, न्यू यॉर्क या शहरांतल्या महत्त्वाच्या कला-संग्रहालयांत त्यांची एकल प्रदर्शने भरली आणि अक्षरश: जगभरच्या कला-रसिकांना त्याची शैली ओळखू येऊ लागली, ही कथासुद्धा प्रेरक ठरेल!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बोतेरोच्या या शैलीला ‘बोतेरिस्मो’ अशा स्पॅनिश नावाने ओळखले जाते. ‘मी जाडय़ा माणसांची चित्रं नाही काढत’ – या बोतेरोच्या विधानाचा अर्थ, जाड नसलेल्या माणसांची मी काढलेली चित्रेदेखील त्या माणसांना जाडसर रूपात चित्रित करतात, असा असल्याचे त्याची चित्रे सांगतील. हे ठसवण्यासाठी त्याने काही लोकप्रिय चित्रांचे स्वत:च्या शैलीतले अवतार सादर केले. उदाहरणार्थ १९७८ सालचे त्याचे ‘मोनालिसा’चे चित्र सोबत आहे. ख्रिस्ती धर्मीयांना माहीत असलेली प्रसंगचित्रेही बोतेरो यांनी या शैलीत रंगवल्यामुळे देवदूतांसह सारे जण गब्दुल झाले, परंतु कुणाच्या भावना दुखावल्याचा आरोप चित्रकारावर झाला नाही. रंग-आकारांवर या चित्रकाराची छान हुकमत आहे, हे त्यांची चित्रे पाहणाऱ्या सामान्यजनांना कळत असे. ज्यांना एवढेही कळत नसे त्यांनासुद्धा त्यांची चित्रे आवडत, याचे कारण म्हणजे चित्रविषयाची सुयोग्य रचना आणि  रंगांच्या फिकट छटांतून जाणवणारी प्रसन्नता.

मृत्यूने बोतेरो यांना १५ सप्टेंबर रोजी, वयाच्या ९१ व्या वर्षी गाठले, पण जगाला ही वार्ता उशिरा कळली. आयुष्याचा बराच काळ युरोपात, स्पेनमध्ये घालवूनही मृत्यूपूर्वीच त्यांनी बोगोटा (कोलंबियाची राजधानी) आणि मेडेलिन (कोलंबियातले जन्मगाव) येथे संग्रहालये स्थापून, स्वत:च्या चित्र-शिल्पांखेरीज, इतक्या वर्षांत त्यांनी जमवलेल्या पिकासो, दाली आदींच्या कलाकृतीही तेथे ठेवल्या. कोलंबियन लोकांनीही या अनिवासी चित्रकाराला भरपूर प्रेम दिले.