पुरस्कार ही अनेकांच्या दृष्टीने आपल्या कामाला मिळालेली ओळख किंवा पावती असते. साहजिकच आहे ते. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन काम करत राहण्याची दखल घेतली जाणे हे महत्त्वाचेच. आणि म्हणूनच तो पुरस्कार नाकारणेदेखील तितकेच महत्त्वाचे होऊन बसते. २०१५ मध्ये देशातील वाढत्या जातीय हिंसाचार आणि असहिष्णूतेचा निषेध म्हणून काही साहित्यिकांनी सरकारने दिलेले पुरस्कार परत करायला सुरुवात केली. अलीकडे कोबाड गांधी यांच्या ‘फॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी दिलेला पुरस्कार राज्य सरकारनेच मागे घेतला तेव्हादेखील निषेध म्हणून अनेकांनी आपल्याला मिळालेले पुरस्कार परत केले होते. या प्रकाराची पुरस्कार वापसी गँग अशी संभावना केली गेली असली तरी अशा पद्धतीने पुरस्कार नाकारणे हे या सगळय़ांचेच आपापल्या पातळीवर एक विधान होते. सत्तेच्या विरोधात केलेले. आता सुकीर्थराणी या तमिळ स्त्रीवादी दलित कवयित्रीनेदेखील तिला मिळालेला देवी हा पुरस्कार नाकारून एक विधान केले आहे. अर्थात त्यांना जाहीर झालेला पुरस्कार सरकारी नव्हता, तर खासगी होता. पण तो नाकारण्यामागची त्यांची भूमिका हे देखील सत्तेच्या विरोधात केलेले विधानच आहे.
तमिळनाडूमधील राणीपेट जिल्ह्यातील लालपेट इथे राहणाऱ्या सुकीर्थराणी व्यवसायाने शिक्षिका आहेत, पण तमिळ भाषकांना त्या अधिक परिचित आहेत त्या कवयित्री म्हणून. त्यांचे आत्तापर्यंत सहा कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या कविता तमिळनाडूमध्ये महाविद्यालयांमधून शिकवल्या जातातच, शिवाय त्या इतर भारतीय भाषांमध्येही अनुवादित झाल्या आहेत. २०२१ मध्ये दिल्ली विद्यापीठाने त्यांच्या कविता अभ्यासक्रमातून काढून टाकल्या होत्या, तेव्हाही त्यांच्या धारदार स्त्रीवादी लिखाणावर बरीच चर्चा झाली होती. स्त्रीला कोणतीही सत्ता आपल्या ताकदीने याच पद्धतीने बेदखल करत असते, हे त्यांचे म्हणणे एरवीही अनेक उदाहरणांमधून सिद्ध होतच असते. दलित असणे, स्त्री असणे आणि या दोन्ही ‘ओळखीं’मधून वाटय़ाला येणारे जगणे हा सुकीर्थराणी यांच्या चिंतनाचा मुख्य विषय त्यांच्या कवितांमधून इतक्याच थेटपणे व्यक्त होत असतो.
आता सुकीर्थराणी यांचे पुरस्कार नाकारण्याचे कारणही तितकेच थेट आहे. पुरस्कार देणाऱ्यांविषयी त्यांचे काहीही म्हणणे नाही. पण पुरस्कार मिळण्याच्या आदल्या दिवशी त्यांना समजले की या पुरस्काराच्या कार्यक्रमाचा प्रमुख प्रायोजक अदानी समूह आहे, तेव्हा त्यांनी पुरस्कार नाकारायचा असे ठरवले. मी आजपर्यंत ज्या तत्त्वांसाठी, ज्या तत्त्वज्ञानासाठी उभी राहिले आहे, ज्यासाठी मी लेखन करते, त्या सगळय़ामागे माझे एक विशिष्ट राजकीय विचार आहेत. अदानी समूहाची भूमिका त्या सगळय़ाच्या विरोधातली आहे. त्यामुळे ते ज्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत, तो पुरस्कार मी घेऊ शकत नाही, असे सुकीर्थराणी यांनी जाहीर केले आहे. कधी पुरस्कारामुळे एखादी व्यक्ती चर्चेत येते, तर कधी एखाद्या व्यक्तीमुळे पुरस्कार चर्चेत येतो तो असा.