पूर्व पाकिस्तानच्या जबडय़ातून बंगाली अस्मितेला मुक्त करण्याचा रणसंग्राम पेटलेला.. पाकिस्तानी लष्कराच्या छळछावण्यांतून जीव मुठीत घेऊन लाखो निर्वासित भारतीय भूमीवरील छावण्यांमध्ये आश्रयाला आलेले.. बंगालमधील अशाच काही छावण्यांत अतिसाराच्या (कॉलरा) साथीचा कहर झाला. आयव्ही संचांची तीव्र टंचाई, सलाइनची कमतरता, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची वानवा, एकंदर हाहाकाराची परिस्थिती निर्माण झाली होती. स्वतंत्र देशाचे, वंग अस्मितेचे स्वप्न पाहणारी निर्वासितांची भावी पिढी मरणाच्या दारात पोहोचली होती. बोनगाव छावणीत रुग्णसेवा देणाऱ्या एका अस्वस्थ तरुण डॉक्टरला एक कल्पना सुचली. लाखो मुला-माणसांचे मृत्यू रोखायचे असतील तर शरीराची जलधारण क्षमता वाढवली पाहिजे. त्याने पाण्यात साखर आणि मीठ विरघळवले आणि छावण्यांतील हजारो रुग्णांना दिले. कॉलराच्या साथीने हळूहळू माघार घेतली. जलसंजीवनीचा (ओरल रिहाइड्रेशन सोल्युशन-ओआरएस) शोध अशा प्रकारे रणभूमीवर लागला. या ‘ओरल सलाइन’चे जनक होते- डॉ. दिलीप महालनबीस. ओआरएस या सहजसोप्या, अत्यंत किफायतशीर अशा घरगुती औषधाने आजपर्यंत अनेक देशांतीलही लाखो रुग्णांचे प्राण वाचवले. ही जलसंजीवनी आता औषधांच्या दुकानांतून आकर्षक वेष्टनांत आणि विविध चवींमध्ये विकली जात असली तरी जिथे डॉक्टर नसतो तिथे, अर्थात दुर्गम भागांत तीच अतिसाराच्या रुग्णांचा डॉक्टर होते. याचे पूर्ण श्रेय डॉ. महालनबीस यांनाच.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) या प्रयोगाची दखल १९७८ मध्ये घेतली. इतकेच नव्हे तर बालकांना होणाऱ्या अतिसाराशी लढण्यासाठी सुमारे सव्वाशे देशांमध्ये ओआरएसच्या वापरास मान्यता देण्यात आली. ‘लॅन्सेट’ने या संशोधनाचे वर्णन ‘अतिशय महत्त्वाचा शोध’ या शब्दांत केले. डॉ. महालनबीस यांचा जन्म १९३४ मध्ये झाला. शिक्षण कोलकाता आणि लंडन येथे झाले. त्यानंतर त्यांनी कोलकात्यातील जॉन हॉपकिन्स विद्यापीठ संशोधन संस्थेत काम सुरू केले. याच संस्थेत त्यांनी १९६६ मध्ये ‘ओरल रिहायड्रेशन थेरपी’वरील (ओआरटी) संशोधनास प्रारंभ केला होता.
‘डब्लूएचओ’च्या वृत्तपत्रिकेत २००९ मध्ये डॉ. महालनबीस यांच्या मुलाखतीचा अंश प्रसिद्ध झाला. त्यात त्यांनी छावण्यांमधील रुग्णांवर उपचार करतानाचे दाहक अनुभव सांगितले होते. ते म्हणाले होते, ‘बोनगावमधल्या रुग्णालयातील दोन कक्ष अतिसाराच्या अत्यवस्थ रुग्णांनी भरले होते. जमिनीवरील रुग्णांना सलाइन लावण्यासाठी आम्हाला अक्षरश: विष्ठा आणि उलटय़ा अशा घाणीत गुडघ्यांवर उभे राहावे लागत होते. ही लढाई आम्ही हरत असल्याचे मला जाणवले. कारण अपुरे आयव्ही संच आणि माझ्यासोबत दोनच प्रशिक्षित कर्मचारी..’ अशा आव्हानात्मक परिस्थितीत डॉ. महालनबीस यांनी अगदी सोपा उपचार शोधला. डब्लूएचओने १९८३ मध्ये डॉ. महालनबीस यांना अतिसार नियंत्रण कार्यक्रमाचे सदस्यपद बहाल केले. त्यांनी पाच वर्षे जगभर फिरून ओआरएसचा प्रसार आणि प्रचार केला. त्यांनी येमेन, अफगाणिस्तान, इजिप्तमध्ये काम केले. २००७ मध्ये थायलंड सरकारने त्यांचा गौरव केला. बालरोगांवरील संशोधनातील नोबेल समजला जाणारा कोलंबिया विद्यापीठाचा पॉलिन पुरस्कार त्यांना आणि डॉ. नाथानिएल पीयर्स यांना प्रदान करण्यात आला. ओआरएसने जगभरात अतिसाराच्या उपचारांत क्रांती घडवून आणली, पण या क्रांतीचा नायक असलेले डॉ. महालनबीस मात्र दुर्लक्षितच राहिले. आपल्या आयुष्याची पुंजी (सुमारे एक कोटी रुपये) कोलकात्यातील मुलांच्या रुग्णालयासाठी दान करून ते गेल्या १६ ऑक्टोबरला निवर्तले.