आसामच्या सिल्चर शहरात कचार कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (सीसीएचआरसी) ची स्थापना स्थानिक नागरिकांच्या ना-नफा संस्थेतर्फे म्हणून करण्यात आली, सरकारने दिलेल्या जमिनीवर सार्वजनिक देणग्यांद्वारे निधी उभारून रुणालय सुरूही झाले, पण पहिल्या जवळपास दशकभराच्या वाटचालीत, या रुग्णालयाचे स्वरूप एखाद्या उपकेंद्राइतकेच मर्यादित राहिले होते. कर्करोगग्रस्त अवयव काढून टाकण्याची शस्त्रक्रिया इथे होत नसे. तशा शस्त्रक्रिया करणारा विभाग इथे २००७ मध्ये ‘सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट’ म्हणून डॉ. आर. रवी कण्णन आले, तेव्हापासून सुरू झाला! हे डॉ. कण्णन, यंदाच्या वर्षी ‘मॅगसेसे पुरस्कारा’चे एकमेव भारतीय मानकरी ठरले आहेत. सिल्चरला येण्याआधी डॉ. कण्णन हे चेन्नईचे जणू उपनगर मानले जाणाऱ्या अडय़ार इथल्या कर्ररोग रुग्णालयात कार्यरत होते. पण वयाच्या ४२व्या वर्षी, आसामातल्या या रुग्णालयात केवळ कर्करोग-शल्यचिकित्सक (सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट) नव्हे तर या रुग्णालयाचे प्रमुख म्हणूनही काम करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले. ते सिल्चरच्या या रुग्णालयात आले, तेव्हा डॉक्टर, नर्स वा अन्य कर्मचारी धरून अवघे २३ जणांचे मनुष्यबळ होते.. आता इथे ४५१ जण कार्यरत आहेत.
किमान २० हजार कर्करोगग्रस्तांवर या रुग्णालयाने उपचार केले आहेत आणि कर्करोगशास्त्र (ऑन्कोलॉजी), नैदानिक विकारशास्त्र (पॅथॉलॉजी), किरणशास्त्र (रेडिओलॉजी), सूक्ष्मजीवशास्त्र (मायक्रोबायोलॉजी), रोगपरिस्थितीविज्ञान (एपिडेमिऑलॉजी), अर्बुद-निबंधन (टय़ूमर रजिस्ट्री) आणि उपशामक शुश्रूषा (पॅलिएटिव्ह केअर) अशा अनेक सेवा देणारे २८ विभाग आहेत. हे कण्णन यांचे निव्वळ व्यवस्थापकीय कौशल्य नव्हते.. ‘केवळ ऐपत नाही म्हणून कोणत्याही रुग्णाला कर्करोगाचे योग्य उपचार नाकारले जाणार नाहीत. कोणताही रुग्ण यातना आणि अपमानाने जिवास मुकू नये, कोणत्याही कुटुंबाला गरिबी आणि दु:खामुळे उपचार टाळावे लागू नयेत’ असे स्पष्ट ध्येय त्यांनी ठेवले आणि आचरणातही आणले. त्यासाठी माणसे जोडली. उदाहरणार्थ, मध्य प्रदेशातले डॉ. रितेश तापकिरे चेन्नईच्या कर्करुग्णालयात होते, त्यांना २०१३ मध्ये कण्णन यांनी सिल्चरच्या या रुग्णालयाचे विभागप्रमुख पद दिले. सध्या डॉ. कण्णन हे ५९ वर्षांचे आहेत. २०१३ मध्ये वैद्यकशास्त्रासाठीचा ‘महावीर पुरस्कार’ (दहा लाख रु. आणि सन्मानपत्र असा हा पुरस्कार गेली २५ वर्षे दिला जातो, त्यापैकी दहाच वेळा तो डॉक्टरांना वैयक्तिकरीत्या मिळाला असून उर्वरित १५ वेळा रुग्णालयांना संस्था म्हणून देण्यात आला आहे), तसेच २०२० मध्ये ‘पद्मश्री’ किताबाने त्यांचा गौरव झालेला आहे. ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कारा’मुळे जगाचे लक्ष त्यांच्या कार्याकडे जाईलच, पण समाजसेवी डॉक्टरांनाही नवी उमेद मिळेल!