‘तुझसे नाराज नही जिंदगी, हैरान हूं मैं’ या एकाच गाण्यापुरती अनुप घोषाल यांची ओळख मर्यादित नाही. ‘मासूम’ चित्रपटातले ते गाणे कदाचित अन्य कुणी गायले असते तरी गाजलेच असते; याचे कारण अनुप घोषाल यांचा आवाज, गुलजार यांचे काव्य किंवा आर.डी. बर्मन यांच्या चालीपेक्षाही निराळेच असू शकेल.. हिंदी गाण्यांच्या श्रोत्यांना गंभीर- तत्त्वचिंतनवजा गाणी ऐकण्याची सवयच मन्ना डे यांनी गायलेल्या ‘हसने की चाह ने इतना मुझे रुलाया हैं’ (आविष्कार, १९७४)ने लावली होती, ती पुढे साधारण दशकभर टिकली, असे सुरेश वाडकरांच्या आवाजातली गज़्ल – ‘इस शहर में हर शख़्स परेशान सा क्यूं है’ (गमन- १९७८), किंवा ‘जिंदगी फूलों की नही..’ (गृहप्रवेश- १९७८), ‘कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता’ (आहिस्ता आहिस्ता- १९८१) आठवल्यास उमगेल. ही सवय १९८३ मधल्या ‘मासूम’च्या ज्या गाण्याने गोंजारली, त्याचे गायक अनुप घोषाल! पण त्याआधीच १९६९ मध्ये साक्षात् सत्यजित राय यांनी ‘गोपी गायें बाघा बायें’ या संगीतप्रधान चित्रपटातील डझनभर गाण्यांसाठी अनुप घोषाल यांचा आवाज वापरला होता. ही पडद्यावरली संगीतिकाच होती आणि जुलमी राजवटीला कलावंत घाबरत नाहीत म्हणजे काय, हे राय यांनी भर कम्युनिस्टकाळात या चित्रपटातून सांगितले होते. ‘महाराजा, तोमारे सलाम’ किंवा ‘ओ मंत्रीमोशाय..’ अशा त्या १९६९ मधल्या गाण्यांत ठासून भरलेला उपरोध किती खरा आहे हे समजण्यासाठी २०११ पर्यंत थांबावे लागले.. ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसने, कोलकात्याबाहेर न पडलेल्या अनुप घोषाल यांना उत्तरपारा मतदारसंघात आमदारकीसाठी उभे केले, तेव्हा स्वत:च्या प्रचारफेऱ्यांत हीच गाणी घोषाल यांनी गायली आणि ते आमदार झालेसुद्धा!
त्यांची राजकीय कारकीर्द काही फार झळाळली नाही, पण एकही गुन्हा नसलेला, प्रामाणिक आणि लोकांचे ऐकून घेणारा तसेच ममतानिष्ठ लोकप्रतिनिधी एवढा लौकिक त्यांनी कमावला. राजकारण, समाजकारण, लोक आणि संगीत यांचा संबंध बंगालने आधुनिक काळात गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर यांच्या ‘आनंदध्वनी जागौ गगने’ वा ‘ओरे नूतन जुगेर भोरे..’ यांसारख्या गाण्यांतून जसा अनुभवला, तसाच पद्मा नदीच्या पैलतीरावरले काझी नझरुल इस्लाम यांच्या गीतांतूनही आकळून घेतला होता. मध्यमवर्गीय घरातल्या अनुप घोषाल यांनी लहानपणापासून शास्त्रीय संगीत, रबिन्द्र संगीत शिकल्यानंतर ‘एमए’ संगीत विषयात केले आणि पुढे पीएच.डी. केली ती ‘नझरुलगीती’च्या पैलूंचा अभ्यास करून.
अनेक बंगाली, असमिया, भोजपुरी चित्रपटांसाठी पार्श्वगायन करूनही पुरस्कारांनी त्यांना हुलकावण्याच दिल्या. अखेर वयाने घेरले आणि रविवारी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. पण त्यांच्या पुरुषी खर्जदार आवाजाचा तलम बंगाली पोत, त्यातली उच्चकोटीची फिरत श्रोत्यांना नेहमीच ‘हैऽराऽऽन’ करत राहील, आठवत राहील.