पंचावन्न वर्षांपूर्वी अंतराळातून चंद्राला दहा प्रदक्षिणा मारून, चंद्राच्या पलीकडून दिसणाऱ्या ‘पृथ्वीउदया’चे पहिलेवहिले छायाचित्र टिपणाऱ्या ‘अपोलो-८’ या अंतराळ-मोहिमेचे नेतृत्व फ्रँक बोरमन यांनी केले होते. अंतराळवीरांनी अस्मिता सुखावणारी, भावनिक आवाहन करणारी विधाने अंतराळातून करावीत, या क्लृप्तीची सुरुवातही फ्रँक बोरमन यांच्याचकडून झाली होती.. ती कशी ते नंतर पाहूच, पण निव्वळ अंतराळवीर म्हणून कामगिरी न बजावता, पुढे चंद्रावर माणसांना नेऊन परत आणणाऱ्या ‘अपोलो-११’ या मोहिमेसाठी कोणकोणत्या सुधारणा आवश्यक आहेत यासाठी महत्त्वाचा सल्लाही फ्रँक बोरमन यांनी दिला होता. वयाच्या १५ व्या वर्षी विमानचालक परवाना मिळवणाऱ्या; पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातले जुनाट विमान विकत घेऊन, त्याची दुरुस्ती करून दरवर्षी एकदा तरी ते उडवण्याचा पराक्रम वयाच्या पन्नाशीनंतर करणाऱ्या आणि ९५ वर्षांचे समाधानी आयुष्य जगलेल्या फ्रँक बोरमन यांचे निधन ७ नोव्हेंबर रोजी  झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकी हवाई दलात नियुक्ती मिळालेल्या फ्रँक यांना १९५० च्या कोरियन युद्धावर जाण्याची इच्छा होती, पण तांत्रिक अचूकपणाकडे असलेला त्यांचा कल पाहून वरिष्ठांनी त्यांना ती संधी नाकारून त्याऐवजी, प्रशिक्षण पथकात सामील करून घेतले. ‘टेस्ट पायलट’ म्हणून, तसेच सहकर्मी- प्रशिक्षक म्हणूनही फ्रँक यांनी उत्तम कामगिरी केली. त्यांना १९६२ मध्येच ‘नासा’च्या ‘जेमिनी’ मोहिमेसाठी निवडण्यात आले. ‘जेमिनी’ ही अमेरिकेची मानवी अंतराळमोहीम आणि त्यापैकी ‘जेमिनी- ६ ए’ यानाने अंतराळात ठरलेल्या ठिकाणी भूस्थिर राहण्याची कामगिरी केली, पण ‘जेमिनी-७’ यानाने पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्या, शिवाय ‘जेमिनी- ६ ए’च्या अगदी एक फूट इतके जवळ जाऊन तिथून पूर्ववत प्रदक्षिणा सुरू ठेवण्याचेही काम फत्ते केले. ‘जेमिनी-७’मध्ये फ्रँक बोरमन  आणि कॅप्टन जेम्स लॉव्हेल यांचा सहभाग होता, तेव्हाही प्रमुखपद बोरमन यांच्याकडेच होते. चंद्रावर माणूस पाठवण्याचा ध्यास घेतलेल्या ‘अपोलो’ मोहिमेला अपघातांनी ग्रासल्यानंतर, ‘अपोलो-८’ या चंद्र-प्रदक्षिणा मोहिमेसाठी बोरमन यांच्याचकडे तिघांच्या पथकाचे नेतृत्व सोपवण्यात आले. त्यांनी टिपलेले ‘पृथ्वीउदया’चे छायाचित्र २४ डिसेंबर १९६५च्या रात्री प्रसारित करण्यात आले, त्याप्रसंगी ‘देवाने प्रथम स्वर्ग आणि नंतर पृथ्वी निर्माण केली’ हे विज्ञानाशी सुतराम संबंध नसलेल्या बायबलमधील विधान फ्रँक बोरमन यांनी उद्धृत केले, अमेरिकेतील बहुसंख्याकांच्या भावनांना हात घातला गेला! पुढे ‘अपोलो-११’च्या यशस्वी चांद्रवीरांना प्रशिक्षण देणाऱ्या पथकात फ्रँक होते. पण १९७० साली निवृत्ती घेऊन ते ईस्टर्न एअरलाइन्स या खासगी विमान कंपनीत गेले, या कंपनीतील संपकाळात त्यांनी उत्तमरीत्या धुरा सांभाळली, पण पुढे १९८६ मध्ये अन्य खासगी विमान कंपन्यांच्या स्पर्धेत टिकाव न लागल्याने ती विकावी लागली. कधीकाळी १९३० च्या मंदीत फ्रँक यांच्या वडिलांचा मूळ व्यवसाय- फोर्ड मोटारी विकण्याचा- बंद करावा लागला होता, त्याचे नव्या ठिकाणी पुनरुज्जीवन फ्रँक यांच्या मुलाने केले. पण तिथे जीव रमेना म्हणून ६५ हजार हेक्टरची ‘रँच’ विकत घेऊन तिथल्या गुराढोरांपासून उत्पन्न मिळवत पुन्हा विमानांचा छंद फ्रँक जोपासू लागले!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vyaktivedh frank borman led the apollo 8 space mission amy
Show comments