भारतीय संगीताची गंगा ग्वाल्हेरहून महाराष्ट्रात आल्यानंतर ती पुन्हा देशभर पोहोचवण्यासाठी पंडित विष्णु दिगंबर पलुसकर यांनी केलेल्या अथक आणि अखंड प्रयत्नांचे आजच्या काळातील फलित म्हणजे पं. केदार बोडस. नितळ आणि मधुर आवाजाची जन्मदत्त देणगी आणि त्यावर वयाच्या आठव्या वर्षांपासून झालेले स्वरांचे संस्कार यामुळे त्यांचे गायन कायमच लक्षात राहणारे ठरले. त्यांचे आजोबा लक्ष्मणराव हे तर थेट विष्णु दिगंबरांचेच शिष्य. समाजाच्या सर्व स्तरांत संगीत आवडायला हवे, या तळमळीने विष्णु दिगंबरांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली आणि कराचीपासून ते मिरजेपर्यंत सर्वत्र त्याच्या शाखा निर्माण केल्या. त्या सगळय़ा शाखांमध्ये महाराष्ट्रातील आपल्या उत्तम शिष्यांना पाठवले आणि तेथे संगीत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. लक्ष्मणरावांकडून केदार यांना थेट शिक्षण मिळाले. स्वर, त्याचे लगाव, त्याची मांडणी आणि त्यातून व्यक्त होणारा भाव याची एक बैठकच तयार करून घेतल्यानंतर केदार यांनी संगीताचे अभ्यासक आणि ज्येष्ठ गुरू डॉ. अशोक दामोदर रानडे यांच्याकडे गायन शिकण्यास सुरुवात केली. त्यापूर्वीचे शिक्षण ममत्वाने होणे स्वाभाविक होते. संगीताचार्य रानडे यांनी केलेले विद्यादान आणि रागसंगीताकडे पाहण्याची दिलेली नजर ही अनेक प्रकारे कष्टसाध्य होती. केदार यांनी ते कष्ट उपसले आणि त्याचे त्यांना शेवटपर्यंत समाधान वाटत राहिले. संगीतात जे जे नवे ऐकायला मिळेल, ते सहजपणे टिपून त्यावर कलात्मक साज चढवणे, हे केदार यांचे वेगळेपण.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा