हिंदी चित्रपटांच्या विश्वात ‘बेनाम’, ‘प्रेम कहानी’, ‘कबिला’, ‘रफू चक्कर’, ‘रास्ते का पत्थर’, ‘मैं इन्तकाम लूंगा’  यांसारख्या यशस्वी चित्रपटांच्या पटकथा लेखनातील सहभागाबरोबरच सुप्रसिद्ध दिग्दर्शक राज खोसला यांच्या कथा-पटकथा लेखकांच्या चमूतही जयंत धर्माधिकारी यांचा मोठा सहभाग होता. एकीकडे मुख्य प्रवाहातील सिनेमा करतानाच जयंत धर्माधिकारी प्रभात चित्र मंडळ या मुंबईतील आघाडीच्या फिल्म सोसायटीच्या संपर्कात आले आणि वेगळय़ा वाटेवरच्या सिनेमाकडेही आकृष्ट झाले. धर्माधिकारी यांचे अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्याशी मैत्र जुळले. पुढे ‘अनकही’ या चित्रपटाची निर्मिती या दोघांनी एकत्र केली. चिं. त्र्य. खानोलकर यांच्या कथेवर आधारित हा चित्रपट होता. कारकीर्दीच्या सुरुवातीला सख्खे मित्र म्हणून दामू केंकरे यांच्यासमवेत रंगभूमीवरही त्यांनी काम केले.

ऐंशी-नव्वदच्या दशकात अर्थात ‘दूरदर्शन’चे वर्चस्व असलेल्या काळातील अनेक चांगल्या मराठी- हिंदी मालिकांनी जनमानसावर गारूड केले होते. निखळ विनोदी मालिकांचा जसा एक प्रवाह होता तसाच सामाजिक जाणिवा किंवा भान देण्याचा प्रयत्नही काही मालिकांद्वारे करण्यात येत असे. पहिल्या भारतीय डॉक्टर डॉ. आनंदी जोशी आणि त्यांचे पती व कर्ते सुधारक गोपाळराव जोशी यांच्या सहजीवनावरील आनंदी-गोपाळ या गाजलेल्या पुस्तकावर आधारित याच नावाची हिंदी मालिका दूरदर्शनवर पहिल्यांदा सादर करून निर्माते जयंत धर्माधिकारी यांनी एक प्रकारे धाडसच केले होते. कमलाकर सारंग दिग्दर्शित या मालिकेत अजित भुरे यांनी गोपाळराव फर्मास साकारले होते. धर्माधिकारी यांची निर्मिती असलेली ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली. एकीकडे वैशिष्टय़पूर्ण अशा या मालिकेबरोबरच त्यांनी ‘भोकरवाडीची चावडी’ ही नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात निखळ विनोदी व ग्रामीण पार्श्वभूमीची मालिका प्रेक्षकांसमोर आणली. ‘भोकरवाडीच्या गोष्टी’ आणि ‘भोकरवाडीतील रसवंतीगृह’ या द. मा. मिरासदार लिखित कथासंग्रहावर आधारित ही मालिकाही प्रेक्षकांची करमणूक करणारी होती. ‘प्रभात चित्र मंडळ’चे विश्वस्त असण्याबरोबरच ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाच्या ‘एशियन फिल्म फाऊंडेशन’वरही जयंत धर्माधिकारी विश्वस्त म्हणून कार्यरत होते. समाजवादी विचारांची पक्की बैठक असलेले धर्माधिकारी ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’मार्फत अनेक लोकोपयोगी उपक्रम करीत असत. दिंडोशी- गोरेगाव भागात ‘नागरी निवारा परिषदे’ने स्वस्त आणि चांगल्या घरांची संकल्पना लोकसहभागातून साकार करून दाखवली, त्याविषयी ‘नागरी निवारा परिषद- असंही होऊ शकतं’  हा लघुपट त्यांनी दिग्दर्शित केला होता, प्रकृतीच्या कारणास्तव वाचन, सिनेमा पाहणे असो की टीव्ही पाहणे यावर बंधने आल्यामुळे अखेरच्या कालखंडात ते अस्वस्थ होते. ही अस्वस्थता २६ फेब्रुवारीस निमाली.