हॉलीवूड चित्रपटांच्या फारशा नादी न लागणाऱ्यांनासुद्धा मॉर्गन फ्रीमन, डेन्झेल वॉशिंग्टन, सॅम्युअल एल. जॅक्सन, विल स्मिथ आदी कृष्णवंशीय कलाकारांच्या चेहऱ्याशी ओळख व्हावीच; इतकी या नरपुंगवांची वृत्तमाध्यमांतून चर्चा होत असते. त्यांच्या संपत्तीपासून वादा-प्रमादांच्या गोष्टी कुठेन् कुठे झळकत राहतात. जिम ब्राउन हे अमेरिका वगळता इतर जगासाठी सहजओळख गटात मोडणारे नाव नसले, तरी वर उल्लेखलेल्या कृष्णवंशी कलाकारांच्या कैकपटीने त्यांच्या कामाचा आणि कार्याचा दबदबा राहिला. नॅशनल फुटबॉल लीग (ही आपल्या माहितीची फुटबॉल म्हणजे सॉकरची स्पर्धा नव्हे) या स्पर्धेत विक्रमांची नोंद, सिनेमांमध्ये सहजरीत्या शिरकाव आणि साठोत्तरीतल्या नागरी हक्क चळवळीमध्ये सक्रिय सहभाग अशा कुठल्याही परमोच्च स्थानातील सिनेकलाकार, फुटबॉलपटू आणि सामाजिक कार्यकर्त्यांला एकाच वेळी जमणार नाहीत, त्या गोष्टी या रांगडय़ा माणसाने करून दाखविल्या होत्या. व्यावसायिक मुष्टियुद्धपटूच्या घरात जन्मलेल्या ब्राउन यांचे शिक्षण न्यू यॉर्कमधील उच्चभ्रू वर्तुळात झाले. तिथे शाळकरी वयातच फुटबॉल- रग्बी या खेळांतील प्रावीण्यामुळे त्यांचा समावेश राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धामध्ये झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहा वर्षांत त्यांनी इतकी लोकप्रियता कमावली की, त्या बळावर त्यांचा सिनेमाप्रवेश सुकर झाला. याच काळात हॅरी बेलाफॉण्टे या कलाकाराने नुकताच हॉलीवूडमध्ये श्वेतवर्णीय अभिनेत्रीसोबत पडद्यावर झळकण्याचा मान मिळविला होता. पण त्याही पुढे जाऊन जिम ब्राउन यांनी डोळय़ांना व्यायाम करायला लावणारी अभिनेत्री रॅकेल वेल्च हिच्यासमवेत रोमान्सकारी दृश्याचा अनुभव ‘हण्ड्रेड रायफल्स’ या चित्रपटातून दर्शकांना दिला. रंगभेदाचा मुद्दा तिथे तापलेला असताना या दृश्याचे सामाजिक पडसाद मोठे होते. १९६६ साली ब्राउन यांनी क्रीडानिवृत्ती घेतली, त्याच वर्षी ‘एमजीएम’तर्फे आलेल्या, ‘डर्टी डझन्स’ या दुसऱ्या महायुद्धावरील प्रसिद्ध चित्रपटातील त्यांची भूमिका जगप्रिय झाली. कुप्रसिद्ध कैद्यांना तयार करून जर्मन अधिकाऱ्यांना मारण्याचा बेत आखणारे कथानक असलेला हा चित्रपट अभिजात म्हणून गणला गेला. क्रीडा क्षेत्रात दबदबा असतानाच त्यांनी नागरी हक्क चळवळीसाठी उत्तर अमेरिकेतील कृष्णवंशीय खेळाडूंना एकत्र करून दबावगट तयार केला.

त्यात जगप्रसिद्ध मुष्टियोद्धा मोहम्मद अली यांचाही समावेश होता. पण त्याआधी त्यांनी कृष्णवंशीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘निग्रो इंडस्ट्रिअल युनियन’ची स्थापना केली जी नंतर ‘ब्लॅक इकॉनॉमिक युनियन’ नावाने ओळखली गेली. कृष्णवंशीय तरुणांना रोजगार मिळविण्यासाठी ही संस्था कार्यरत राहिली. हिंसाविरोधी संस्था उभारूनही क्रोधातिरेकाने केलेल्या हाणामाऱ्या आणि कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी किमान पाच-सहा वेळा अल्पकालीन तुरुंगवास भोगावा लागलेल्या ब्राउन यांचे व्यक्तिमत्त्व अनेक विरोधाभासी घटनांमुळे चर्चेत राहिले. ट्रम्प यांचे कौतुककर्ते म्हणूनही ते ओळखले जात! ‘ट्रम्प काळय़ांविरोधी नाहीत’ असा दावा करणारे ब्राउन यांचे नुकतेच निधन झाले, तेव्हा हयातभर आघाडी असलेल्या सर्वच क्षेत्रांतून त्यांना प्रचंड मानवंदनेसह स्मरणवंदनाही देण्यात आली.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vyaktivedh jim brown hollywood movies star footballer amy
Show comments