स्वातंत्र्योत्तर नेहरूवादी औद्योगिक विकास, नंतरची बंदिस्त आणि अतिनियंत्रित अर्थव्यवस्था, १९९१ नंतरचे मुक्त बाजारप्रणीत धोरण ते अलीकडची चौथी औद्योगिक क्रांती हे स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पे होत. हा इतका मोठा कालखंड अनुभवलेला कदाचित एकमेव उद्योगपती म्हणजे केशुब महिंद्रा. बुधवारी वयाच्या ९९व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. भारताचा स्वातंत्र्य इतिहास, फाळणी आणि महिंद्रा अँड महिंद्रा (पूर्वाश्रमीचा महिंद्रा अँड मोहम्मद) या उद्योगसमूहाचे अजोड नाते आहे. स्वातंत्र्याची पहाट होत असतानाच केशुब महिंद्रा यांनी वयाच्या २४व्या वर्षी महिंद्रा समूहात व्यावसायिक कारकीर्द सुरू केली. ‘फोर्ब्स’च्या जागतिक अब्जाधीशांच्या सूचीतील ते सर्वात वयोवृद्ध उद्योगपती होत. देशातील ट्रॅक्टर क्रांतीचे जनक म्हणून ते ओळखले जात. पण खरे तर केशुब महिंद्रा यांच्या कारकीर्दीतच, महिंद्रा अँड महिंद्रा या वाहन क्षेत्रातील उद्योगसमूहाला नवनवीन व्यवसाय-धुमारे फुटले. वित्त, आतिथ्य, पर्यटन, माहिती-तंत्रज्ञान अशा नवनव्या सेवा क्षेत्रात महिंद्रा समूहाने भक्कमपणे पाय रोवले. पण हा बहुढंगी व्यवसाय विस्तार सुरू असताना, आपली मुळे मात्र ते विसरले नाहीत. भारताच्या वाहन उद्योगाला जागतिक मंचावर मानाचे स्थान मिळवून देणारी महिंद्रा समूहाची घोडदौड त्यांच्या कार्यकाळात वेगाने सुरूच होती. पुतणे आनंद महिंद्रा यांच्या हाती उत्तराधिकारी म्हणून सूत्रे सोपविली जाईपर्यंत त्यांनी हे सर्व साध्य केले होते, हे विशेषत्वाने नमूद करावे लागेल. आपल्या अन्य सात भावंडांप्रमाणेच, जात्याच हुशार असलेले केशुब यांनी प्रतिष्ठित विद्यापीठांमधून उच्च शिक्षण पूर्ण केले होते. १९९१ मधील उदारीकरणाविरोधात उघडपणे उभ्या राहिलेल्या ‘बॉम्बे क्लब’मध्ये राहुल बजाज यांच्यासह तेही सामील होते. ‘विदेशी कंपन्यांच्या गुलामगिरीला आवतनं देणारे नवीन युग’ अशी त्यांची त्या धोरणावर टीका होती. पण आपली भूमिका चुकल्याची प्रांजळ कबुलीही पुढे त्यांनी दिली. नंतरच्या काळात सरकारच्या विविध समित्यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आणि २००४ ते २०१० पर्यंत ते पंतप्रधानांच्या उद्योग व आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य होते. १९८४ मध्ये भोपाळ वायू दुर्घटना घडली तेव्हा ते युनियन कार्बाइड या अमेरिकी कंपनीचे गैर-कार्यकारी अध्यक्ष होते. या दुर्घटनेसाठी सर्वोच्च न्यायालयाने कंपनीच्या अन्य सात अधिकाऱ्यांसह त्यांनाही हयगयीसाठी दोषी (सदोष मनुष्यवधासाठी नव्हे!) ठरवून दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली, पण पुढे त्यांना जामीनही मंजूर केला. महिंद्रा यांचा स्वदेशी उद्योगवाद, व्यवसायाचा गाडा हाकताना नीतितत्त्वांवरील श्रद्धा आणि निपुण व्यवस्थापन कौशल्याचा खरे तर स्पर्धक म्हणाव्यात अशा कंपन्यांनी भरपूर उपयोग केला. अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळात त्यांनी कैक दशके काम करीत निष्पक्ष सल्ला-मार्गदर्शनाने त्यांच्या वाढीतही मोलाचे योगदान दिले. अशा सर्वार्थाने श्रीमंत-समृद्ध उद्योगपतीला ‘लोकसत्ता’ची श्रद्धांजली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा