‘तारे जमीं पर’ या चित्रपटातील लहानग्या नायकाला चित्रकलेच्या महा-स्पर्धेत ज्यांच्या हस्ते पहिले पारितोषिक मिळते, त्या ललिता लाजमी! या चित्रपटात त्यांनी स्वत:चीच भूमिका केली, त्यामागे काही मुलगी कल्पना लाजमी चित्रपट दिग्दर्शिका किंवा भूपेन हजारिका हे मुलीचे सहचर.. किंवा युगकर्ते चित्रपटकार गुरू दत्त हे सख्खे भाऊ यांपैकी कोणतेही कारण नव्हते. ‘नामवंत, ज्येष्ठ चित्रकार’ अशी ‘तारे जमीं पर’मध्ये ललिता लाजमी यांची ओळख करून दिली जाते, तशा त्या होत्याच. पण त्याहीपेक्षा, दक्षिण मुंबईच्या शाळेतील कलाशिक्षिका म्हणून ललिता लाजमी यांनी जमिनीवरल्या काही ताऱ्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव दिली होती, हे खरे कारण. प्रख्यात चित्रकार शीतल गट्टाणी या ललिता लाजमी यांचा संस्कार शालेय वयात झाल्यामुळे चित्रकलेत मुक्तीची वाट शोधू शकणाऱ्यांपैकी एक. लाजमींना कलाशिक्षिकाच किंवा चित्रकारच व्हायचे होते असे नाही, पण आपल्याला चित्रे काढायला आवडतात आणि ही आवड आपण जोपासणारच, एवढे मूळच्या ललिता पदुकोण यांनी कोलकात्याहून मुंबईस आल्यानंतर, शाळेत असतानापासून ठरवले होते. लग्नानंतर ही आवड जोपासण्यासाठी सर ज. जी. कला महाविद्यालयात शंकर पळशीकरांसारख्या कलागुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्या काळी चालणाऱ्या छंदवर्गात त्यांनी प्रवेश घेतला. याच कलासंस्थेतून ललिला लाजमींनी ‘आर्ट मास्टर’ ही – शाळेत चित्रकला शिक्षक होण्यास पुरेशी- पदविका मिळवली. ‘जेजे’तले तेव्हाचे वातावरण चित्रकार व कलाविद्यार्थ्यांच्या संवादाचे असे. मूळच्या संवेदनशील ललिता लाजमींना त्याचा लाभ घेता आला. प्रदर्शनांतून विक्रीची अपेक्षा नव्हतीच, तरीही चारचौघांकडे चित्रे पोहोचली, घरच्या परिस्थितीमुळे कलाशिक्षिकेची नोकरी करावीच लागत असूनही स्वत:च्या कलेसाठी उन्मेष उरला, वाढला. मग जहांगीर आर्ट गॅलरीनजीकच्या आता इतिहासजमा झालेल्या ‘वैभव रेस्टॉरंट’मधील कलाचर्चात सामील झाल्यामुळे प्रभाकर बरवे, शकुंतला कुलकर्णी, भारती कपाडिया अशांच्या कलाजाणिवांशी स्वत:ला ताडून पाहता आले. १९८० च्या दशकाच्या मध्यावर, कलाबाजार वाढला नसूनही ‘केमोल्ड आर्ट गॅलरी’त एकल प्रदर्शनासाठी त्यांनी मोठे कॅनव्हास केले होते. ‘फॅमिली’ अशा नावाच्या त्या प्रदर्शनातील सारे कॅनव्हास एकरंगी छटांचे.. ‘सेपिया टोन’मधल्या जुन्या कौटुंबिक छायाचित्रांसारखे. तेवढय़ा मोठय़ा आकाराची चित्रे त्यानंतर कधीच त्यांनी केली नाहीत, पण या चित्रांचा स्त्रीलक्ष्यी दृष्टिकोन आणि कुटुंब- नाती हे विषय कायम राहिले. रंग निळे, गुलाबी, पिवळे असले तरी त्यांच्या फिक्या अनाग्रही छटाच ललिता यांच्या अभिव्यक्तीत आल्या. त्यांनी भरपूर काम कसे केले आणि रेखाटन तर किती निरनिराळय़ा पद्धतींनी ‘करून पाहिले’, याची साक्ष देणारे त्यांचे सिंहावलोकनी प्रदर्शन मुंबईतील ‘राष्ट्रीय आधुनिक कलादालना’त भरले असतानाच, वयाच्या ९१ व्या वर्षी- १३ फेब्रुवारीस त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या प्रवासातील उपलब्ध खुणा मांडणारे हे प्रदर्शन पाहाणे, हीच त्यांना आदरांजली ठरेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा