प्रसिद्ध कलाकार आणि लोकप्रिय कलाकार या दोन गोष्टी वेगळय़ा आहेत. कायम प्रसिद्धीच्या झोतात असलेला, सातत्याने यशस्वी ठरलेला कलाकार लोकांच्या आवडीचा असेलच असे नाही. त्याउलट, प्रसिद्धीचा लवलेशही नसलेला एखादा कलाकार.. त्याक्षणी काम करत नसला तरी त्याच्या नुसत्या नावाबरोबर त्याच्या आठवणींचा पट रसिकमनात उलगडत जातो. ‘पटय़ा’ या लाडक्या नावाने ओळखले गेलेले अभिनेते प्रदीप पटवर्धन हे खऱ्या अर्थाने रसिकप्रिय कलाकार होते.
गिरगावात झावबावाडीत राहणारा, इथल्या मराठमोळय़ा चाळसंस्कृतीत लहानाचा मोठा झालेला हा कलाकार. त्यामुळे गणपतीपासून दहीपंडीपर्यंतच्या मिरवणुका-सांस्कृतिक कार्यक्रमांमधून होणारे विविध कलाप्रकारांचे संस्कार प्रदीप यांच्यावरही झाले. त्यांची आई संगीत शिक्षिका असल्याने त्यांच्यावर गाण्याचेही संस्कार घडले होते. गायन-वादनात ते निपुण होते. अभिनेते सतीश पुळेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या एका एकांकिकेत केवळ वादनासाठी प्रदीप यांची निवड झाली होती.
७०-८०च्या दशकातील जे मराठी कलाकार पुढे नाटक- चित्रपट- मालिकांमधून लोकांसमोर आले, त्यांच्यापैकी अनेकांची जडणघडण महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा, राज्य नाटय़ स्पर्धामधून झाली होती. सिद्धार्थ महाविद्यालयात शिकत असताना प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर, विजय पाटकर अशी एखाद शैक्षणिक वर्ष मागेपुढे असलेली कलाकार मंडळी एकांकिकांच्या निमित्ताने एकत्र आली. अभिनेते सतीश पुळेकर हे त्यांचे गुरू होते. पुळेकरांच्या ‘सतीश थिएटर’ अंतर्गतही या सगळय़ांनी एकत्रित एकांकिका केल्या, पुरस्कार जिंकले. या सगळय़ांमध्ये देखणा चेहरा, रुबाबदार व्यक्तिमत्त्व असलेले आणि अंतस्थ स्फूर्तीने काम करणारे प्रदीप पटवर्धन लोकांचे लक्ष वेधून घेत. त्याकाळी प्रत्येक महाविद्यालयीन कलाकाराला ‘महाराष्ट्राची लोकधारा’त आपल्यालाही संधी मिळावी असे वाटे. प्रदीप यांचाही तिथे सहज प्रवेश झाला आणि ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’वर त्यांनी धरलेला ताल समस्त मराठी रसिकमनांचा ठाव घेता झाला. पुढे ‘मोरुची मावशी’ हे नाटक गाजल्यानंतर प्रदीप यांच्यासाठी चित्रपटांची वाटही खुली झाली. विनोदी अभिनेता म्हणून ओळख निर्माण झाली.
कलाकारांच्या गर्दीतही रसिकांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेण्याची क्षमता त्यांच्या अभिनयात होती. तरीही अत्यंत यशस्वी अभिनेता असा लौकिक काही त्यांच्या वाटय़ाला आला नाही. कलेवर नितांत प्रेम करणारे, सर्व जबाबदाऱ्या सांभाळून कलाकार म्हणून आपली हौस जपणारे प्रदीप पटवर्धन गिरगावकरांत नेहमी ‘पटय़ा’ म्हणूनच ओळखले गेले. पटय़ा म्हणजे सुपरस्टार, पटय़ा म्हणजे दहीहंडीत हाफ पँट, शर्ट- गॉगल अवतारात नाचणारा आणि चाळीच्या गॅलरी-खिडक्यांमध्ये उभं राहून त्याला पाहणाऱ्या अनेक तरुणींची धडकन, पटय़ा म्हणजे निखळ हास्य ही त्यांची आठवण सर्वसामान्यांच्या मनात राहिली. कलाकाराला कलाप्रवाहाशी जुळवून घ्यावे लागते. ते काही त्यांना जमले नाही. आयुष्याच्या सांजपर्वातही सर्वसामान्य गिरगावकरांसारखा वागणारा, वावरणारा आणि तिथेच रमणारा पटय़ा गिरगावकरांचा लाडका होताच. पण रंगभूमी आणि चित्रपटातील त्यांच्या काही भूमिकांमधून का होईना त्यांना मिळालेली रसिकप्रियताही महाराष्ट्राच्या मनात कायम राहिली.