नव्वदीच्या दशकात भारतातही ‘व्हिडीओ किल रेडिओस्टार’ या गाण्यातील शब्दांना खरेखुरे ठरवणारे दृश्यक्रांतीचे शिलेदार वायुवेगाने दाखल झाले. टीव्हीवरच्या रामायण-महाभारत महामालिकांच्या साडेतीन डझन लघुकथांतून सांगितल्या जाणाऱ्या जाहिरातींपासून ते ‘एमटीव्ही’, ‘व्ही’ चॅनलवरील साडेतीन मिनिटांचे म्युझिक व्हिडीओज लोकांच्या डोळय़ांची झापडे बंद होऊ न देण्यासाठी सक्रिय झाली होती. आपल्याकडे नागरिकांना जाणवण्याआधीच ‘व्हिडीओ किल रेडिओस्टार’ची प्रक्रिया घडून संगणकाच्या चौकोनाला मनोरंजनासाठी वापरण्याची सुरुवात झाली होती.. या सर्व काळात प्रदीप सरकार यांच्या जाहिराती आणि म्युझिक व्हिडीओचा आपल्या डोळय़ा-डोक्यावर मारा होत होता.. तोही त्यांचे नाव अजिबात माहिती नसताना! ‘कॅडबरी’च्या ‘पप्पू पास हो गया’सह कैक जाहिराती, एव्हरेडीची ‘गिव्ह मी रेड’ ही बॅटरी सेलची कैक ढंगांनी बदलत गेलेली जाहिरात अशा तब्बल हजारांच्या वर उत्पादनविक्रीच्या दृश्यतुकडय़ांशी प्रदीप सरकार हे नाव जोडले गेले होते. पुढे म्युझिक व्हिडीओ क्षेत्रातील ठळक नाव होईस्तोवर प्रदीप सरकार यांनी जाहिरातक्षेत्रातच दिग्दर्शन, संकलन, अनुभवले होते. देशी नव-पॉपस्टार्सना विदेशात गाणे चित्रित करण्याचे वेध लागलेले असताना, प्रदीप सरकार यांनी देशी भूमीत गाणे चित्रित करून स्वत:ऐवजी या कलाकारांचेच नाव उज्ज्वल केले. उदाहरणच घ्यायचे तर १९९९ साली देशात कसलीही ओळख नसलेल्या ‘युफोरिया’ या बँडला धर्मस्थळी नेऊन चित्रित केलेले ‘धूम पिचक धूम’ हे गाणे असो किंवा उत्तर भारतातील सौंदर्यखुणा कॅमेऱ्यातून खुलवणारे सुलतान खान यांचे ‘पिया बसंती रे’. शास्त्रीय गायनात पांडित्य असलेल्या शुभा मुदगल यांना ‘अब के सावन’, ‘सीखो ना नैनो की भाषा’ या गाण्यांतून पॉपस्टार बनवणारे किंवा ‘कभी आना तू मेरी गली’ गाण्यात मॉडेल म्हणून उभ्या केलेल्या विद्या बालनला बॉलीवूडचे महाद्वार उघडून देणारे म्युझिक व्हिडीओकार ही प्रदीप सरकार यांची पहिली ओळख. त्यानंतरच्या ‘परिणिता’ या चित्रपटामुळे दिग्दर्शक म्हणून त्यांचे नाव भारतीयांना माहीत होण्याआधी त्यांचे काम सर्वाना परिचित होते. कोलकात्यातील कलासंपन्न आणि सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या सरकार यांनी ‘दिल्ली कॉलेज ऑफ आर्ट’मध्ये सुवर्णपदकासह पदवी घेतली. जाहिरात विश्वात दीड तप काम करून बरीच वर्षे विधुविनोद चोप्रा प्रॉडक्शन हाऊसमध्ये सेवा दिली. टीव्हीवरील जाहिरातयुगाच्या आरंभापासून त्यांच्या कल्पक जाहिरातींना त्या क्षेत्रातील अनेक सन्माननीय पारितोषिके मिळाली. चित्रपट संकलक म्हणूनही त्यांची बरीच ख्याती. ‘दिग्दर्शनातील सर्वोत्कृष्ट पदार्पण’ असा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणाऱ्या ‘परिणिता’मधली वा पुढल्या लफंगे पिरदे, मर्दानी या चित्रपटांतील दृश्यश्रीमंती ही त्यांच्या जाहिरात विश्वातील अनुभवांचा परिपाक होता. कलाकारांना घडविण्यापासून पडद्यावर लोकप्रिय करणाऱ्या या किमयागाराचे गेल्या आठवडय़ात आजारामुळे ६८ व्या वर्षी निधन झाले. तेव्हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाची, सिनेदिग्दर्शनाच्या पलीकडची छबी लोकांना ज्ञात झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा