भारतीय परंपरा, संस्कृती, ज्ञान यातील भाकडकथांना बाजूला सारून खऱ्या अर्थाने भारतीय ज्ञान परंपरा, वैदिक परंपरा, संस्कृत भाषा यांना जागतिक पटलावर स्थान मिळवून देणाऱ्यांपैकी प्राचार्य दीपक भट्टाचार्य हे एक! त्यांचे नुकतेच वृद्धापकाळाने वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. ते संस्कृत भाषेतील तज्ज्ञ आणि वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. त्याचबरोबर पाली, प्राकृत, जर्मन या भाषांवरही त्यांचे प्रभुत्व होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मूळचे कोलकाता येथील भट्टाचार्य यांनी १९६१ साली कला शाखेची पदवी घेतली. त्यानंतर १९७५ साली विश्व-भारती विद्यापीठातून जर्मन भाषेचा पदविका अभ्यासक्रम केला. १९७७ साली त्यांना पीएच.डी. मिळाली. प्रा. भट्टाचार्य यांनी १९६६ पासून संस्कृत भाषेचे शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी ‘व्ही. बी. इन्स्टिटय़ूट ऑफ संस्कृत अॅण्ड इंडोलॉजिकल स्टडीज्, होशियारपूर’ येथे व्याख्याता म्हणून काम केले. पुढे १९८४ सालापासून विश्व-भरती विद्यापीठ येथे संस्कृत, पाली आणि प्राकृत भाषा शिकवू लागले. १९९१-९२ दरम्यान साहित्य अकादमी, दिल्ली येथे त्यांनी भाषा सल्लागार म्हणून काम केले.

प्रा. भट्टाचार्य यांनी विश्व-भारती विद्यापीठ, शांतिनिकेतन येथे काम करताना आपले जीवन संस्कृत आणि वैदिक अभ्यासाच्या क्षेत्रात अध्यापन आणि संशोधनास समर्पित केले. वैदिक अभ्यासातील संशोधनाचे, विशेषत:, अथर्ववेदाच्या पैप्पलाद संहितेच्या पहिल्या आवृत्तीचे श्रेय त्यांना जाते. ओदिशातील अथर्ववेदाची परंपरा शोधण्याचे श्रेय त्यांचे वडील प्रा. दुर्गामोहन भट्टाचार्य यांचे. वडिलांचे अपूर्ण राहिलेले काम त्यांनी पुढे सुरू ठेवले. त्यांनी ओरिया लिपीत लिहिलेल्या वेदाची अनेक हस्तलिखिते जमा केली. प्रा. भट्टाचार्य यांनी संस्कृत भाषा आणि वैदिक शास्त्राचा आयुष्यभर बारकाईने अभ्यास केला. त्यांनी वैदिक शास्त्रातील २० खंड असलेल्या संपूर्ण संहितेची समीक्षात्मक आवृत्ती तयार केली. एशियाटिक सोसायटी, कोलकाताद्वारे ही आवृत्ती चार खंडांमध्ये प्रकाशित करण्यात आली.

‘प्रा. भट्टाचार्य यांची पौराणिक आणि अनुष्ठान प्रतीकवाद : वैदिक संदर्भात एक अभ्यास’, ‘तांत्रिक अग्नी’, अथर्ववेद खंडाची ‘पैप्पलाद संहिता’, ‘भारतीय व्युत्पत्तिशास्त्रज्ञ आणि त्यांची व्युत्पत्ती’, ‘अनंतश्राद्धांजली’, ‘पूर्ववर्ती आणि नवकल्पना’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बुखारेस्ट येथे झालेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय वैदिक कार्यशाळेत त्यांनी भाग घेतला होता. प्रा. भट्टाचार्य यांना त्यांनी केलेल्या संशोधनासाठी ‘माक्र्विस हूज हू’द्वारे भाषा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच एशियाटिक सोसायटी, कोलकाताची ‘सर विल्यम जोन्स रिसर्च फेलोशिप’ प्राप्त झाली होती. त्याचबरोबर १९८६ साली, ‘इंडियन बुक सेंटर’कडून वर्षांतील सर्वोत्कृष्ट पुस्तकासाठी ‘एआयओसी’ हा पुरस्कार देण्यात आला. २००९ साली ‘इन्स्टिटय़ूट डी फ्रान्स’द्वारे पैप्पलाद संहितेच्या पहिल्या आणि दुसऱ्या खंडासाठी त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vyaktivedh principal deepak bhattacharya is one of those who have given place to indian knowledge tradition on the world stage amy