गोष्ट सन २०१० ची. महाराष्ट्र राज्याने सुवर्णमहोत्सवी वर्षांपर्यंत कशी प्रगती साधली, हे राज्यकर्ते उच्चरवाने सांगत होते, तेव्हा एक व्यक्ती खेडय़ापाडय़ांत फिरून खरा महाराष्ट्र कसा आहे, हे जाणून घेत होती. दिसलेले वास्तव त्यांनी रिपोर्ताज स्वरूपात वाचकांसमोर आणले. पुढे अशाच प्रकारे ईशान्य भारत पालथा घालून तेथील स्थितीही पुस्तकातून मांडली. चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते, लेखक राजा शिरगुप्पे यांच्या लेखनाची ही सुरुवात होती..
निपाणी ही तंबाखूची बाजारपेठ. येथेच जन्मलेल्या राजाभाऊंनी इंग्रजीमध्ये एमए केल्यानंतर प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. आजरा येथे वास्तव्यास असताना त्यांनी साहित्याच्या नानाविध प्रांतांत मुशाफिरी केली. कथा, कविता, नाटक, चित्रपट, पथनाटय़, समीक्षा असे साहित्याचे विविध विषय हाताळले. तंबाखूसंदर्भात माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी लढा पुकारला तेव्हा त्या चळवळीत शिरगुप्पे सहभागी झाले. त्यांनी कामगारांचे प्रश्न हाताळले. या निमित्ताने समाजकारणात सक्रिय होऊन समाजमनाची स्पंदने टिपण्यास सुरुवात केली. साधी, सोपी, प्रवाही भाषा असल्यामुळे त्यांचे लेखन वाचकप्रिय झाले. त्यांच्या पुस्तकांनी सामाजिक वास्तवाचा अचूकपणे वेध घेतला. ‘न पेटलेले दिवे’ या पुस्तकातून कष्टकरी मुलांच्या व्यथा-वेदना, जगणे भेदकपणे मांडले.
राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून समाजकारणाशी जोडले गेले. देवदासी चळवळ, शेतकरी संघटना, विषमता निर्मूलन परिषद, मुक्ती संघर्ष चळवळ, बळीराजाला पाणीवाटपाचे लढे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, तंबाखू आंदोलन, बिडी कामगारांचे आंदोलन अशा आंदोलनांमध्ये राजाभाऊ अखेपर्यंत सक्रिय राहिले. किंबहुना याच कामाला वाहून घेण्यासाठी त्यांनी प्राध्यापकी सोडली आणि कार्यकर्ता पत्रकार म्हणून ते कार्यरत राहिले. राजाभाऊंच्या लेखनात, पुस्तकांत शेवटच्या स्तरातील माणूस कोणत्या परिस्थितीत राहतो, झगडतो याचे मूलगामी दर्शन घडते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सहकार्याने राजाभाऊंचे ग्रामीण महाराष्ट्राचे वास्तव रेखाटणारे ‘शोधयात्रा – महाराष्ट्राच्या ग्रामीण दुर्गम भागाची’ हे पुस्तक प्रकाशित झाले. जयप्रकाश नारायण यांच्यानंतरचा बिहार कसा आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी भटकंती करून दीर्घ लेखन केले. ईशान्येकडील राज्यातील लोकांशी संवाद साधून स्थानिकांचे प्रश्न, राज्यकर्त्यांचा नकारात्मक दृष्टिकोन, सामान्यांचे जीवन जाणून घेऊन ‘शोधयात्रा – ईशान्य भारताची’ हे दुसरे पुस्तक वाचकांसमोर आणले. विद्रोही साहित्य चळवळीत काम केले. हे सांगली येथे झालेल्या विद्रोही संमेलनाचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वाङ्मयीन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ‘डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ने त्यांचा सन्मान केला गेला.
राजर्षी शाहूमहाराज यांच्यावर आधारित मालिकेत कोल्हापूरचे चित्रकार आबालाल रहमान यांची भूमिका साकारलेल्या राजाभाऊंनी लिहिलेली ‘तिच्या नवऱ्याचं वैकुंठगमन’, ‘कफान’ ही नाटके गाजली. ‘प्रॉमिथिअस’ या नावाने त्यांनी कविता केल्या. त्यांचे ‘रिंगण’ हे पथनाटय़ गाजले. संत तुकारामांवरील त्यांचे नाटक सेन्सॉर बोर्डात दीर्घकाळ अडकले. महात्मा बसवेश्वर यांच्यावरील पुस्तक प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. या साहित्यकृती रसिकांसमोर येणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल!