‘वीर्काव जागतिक आरोग्य पारितोषिका’ची रक्कम जरी पाच लाख युरो- म्हणजे सुमारे चार कोटी ३८ लाख ७९ हजार रुपये- असली आणि हा पुरस्कार कारकीर्दीचा गौरव करणारा असला तरी यंदा तो रोझ लेके यांना मिळाल्याची प्रसिद्धी फारशी झाली नाही, याची कारणे दोन. पहिले असे की, पेशीविज्ञानाचा वापर समाजासाठी करू पाहणारे प्रख्यात जर्मन डॉक्टर रुडॉल्फ वीर्काव (१८२१-१९०२) यांच्या नावे चालवल्या जाणाऱ्या प्रतिष्ठानातर्फे २०२२ पासूनच हे पारितोषिक सुरू करण्यात आले आणि यंदा त्याचे अवघे दुसरेच वर्ष. दुसरे कारण कदाचित असेही सांगता येईल की, आफ्रिकेत- कॅमेरूनमध्ये राहून जगभराच्या मलेरियामुक्तीसाठी झटणाऱ्या रोझ लेके यांना पुरस्कार आणि मानमरातब नवे नाहीत. त्यांच्या १९७९ पासूनच्या कारकीर्दीला जागतिक आरोग्य संघटनेसह अनेकांची दाद मिळाली आहेच आणि पुरस्कार मिळवण्यापेक्षा काम पुढे जाणे त्या महत्त्वाचे मानतात. वीर्काव पुरस्काराचा सोहळा गेल्या शनिवारी झाला, तेव्हाही याचे प्रत्यंतर आले. मलेरिया लशीचा प्रसार हे ध्येय न विसरण्याची अपेक्षा याही निमित्ताने त्यांनी व्यक्त केलीच, पण ‘मुली, तरुणी मोठय़ा संख्येने आरोग्य-संशोधन क्षेत्रात येताहेत, हा आनंद वाढत राहावा’ असे म्हणणाऱ्या रोझ लेके यांची छोटेखानी मिरवणूकच आफ्रिकी वंशाच्या महिला शास्त्रज्ञांनी या सोहळय़ात काढली, हे पुरस्काराइतकेच मोठे होते! त्यांना २०१८ मध्ये कॅमेरून मेडिकल कौन्सिलतर्फे ‘क्वीन मदर ऑफ द कॅमेरूनियन मेडिकल कम्युनिटी’ हा किताब मिळाला होताच पण दक्षिण आफ्रिकेतून प्रसारित होणाऱ्या ‘आफ्रिका मिरर’ने त्यांना ‘क्वीन ऑफ इम्युनॉलॉजी’ म्हटले होते, याची आठवण देणारी ती मिरवणूक होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा