सलीम दुराणी.. नजाकत आणि निखळ आनंद या दोनच मूल्यांना भारतीय क्रिकेटमध्ये ज्या काळात अनन्यसाधारण महत्त्व होते, त्या म्हणजे १९६०-१९७०च्या दशकात अष्टपैलू क्रिकेटपटू सलीम दुराणींचा उदय झाला. एम. एल. जयसिंहा, टायगर पतौडी, फारुक इंजिनीअर, अब्बास अली बेग, बुधी कुंदरन, पॉली उम्रीगर, बापू नाडकर्णी अशा बहुपैलू क्रिकेटपटूंचा तो काळ. यांतील अनेक देखणेही होते. सलीम दुराणी दोन्ही गटांमध्ये फिट्ट बसायचे. एका इंग्लिश पत्रकाराने या गटाची तुलना इटालियन दिग्दर्शक फेदरिको फेलिनीच्या चित्रपटांतील देखण्या नायकांशी केली होती. सलीम दुराणी अफगाणिस्तानात जन्मले आणि कराचीत वाढले, पण त्यांचे क्रिकेट खुलले ते भारतात, विशेषत: गुजरात आणि राजस्थानमध्ये. ते बरीच वर्षे मुंबईत राहायचे. डावखुरी फलंदाजी आणि डावखुरीच फिरकी गोलंदाजी करणारे दुराणी १९६२ ते १९७३ अशा प्रदीर्घ काळात भारतासाठी खेळले. आत्ताच्या पिढीला त्यांची कसोटी आकडेवारी फारशी लक्षवेधी वाटणारही नाही. २९ सामन्यांमध्ये २५च्या सरासरीसह १२०२ धावा आणि ३५च्या सरासरीने ७५ बळी. शिवाय एकच शतक. पण सलीम दुराणी यांची कहाणी आकडेवारीपलीकडची आहे. ती क्रिकेटच्या रसास्वादाची आणि रसिकांची आहे.
प्रेक्षकांच्या मागणीनुसार सलीम दुराणी षटकार लगावायचे असे सांगितले जाते. त्यात फारसे तथ्य नाही. एकदा निव्वळ योगायोगाने प्रेक्षकांमधून षटकारांची मागणी होत असतानाच मी षटकार लगावले, असे त्यांनी सांगितले होते. ते आक्रमक फलंदाज होते आणि त्यांचे एकमेव शतक वेस्ट इंडिजचे तुफानी गोलंदाज वेस्ली हॉल यांच्या तेज माऱ्यासमोर लगावले गेले. पण गोलंदाज म्हणून त्यांची कामगिरी तुलनेने झाकोळली गेली, तरी कमी महत्त्वाची नव्हती. टेड डेक्स्टर यांच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघाविरुद्ध दुराणींनी १९६१-६२ मधील तत्कालीन मद्रास कसोटी सामन्यात १० बळी घेतले ती मालिका जिंकून देण्यात मोलाचे योगदान दिले. पुढे १० वर्षांनी वेस्ट इंडिजविरुद्ध क्लाइव्ह लॉइड आणि साक्षात सर गॅरी सोबर्स यांचे बळी घेऊन त्यांनी भारताच्या िवडीज भूमीवरील पहिल्या-वहिल्या विजयासही हातभार लावला. सहा फुटांहून अधिक उंचीचा पुरेपूर फायदा दुराणी गोलंदाजी करताना घ्यायचे. देखणे व्यक्तिमत्त्व, मैदानावर निर्धास्त वावर, फलंदाजी करताना बेडर मिजाज़् यांमुळे त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली.
एका सामन्यात त्यांना वगळण्यात आले, त्यावेळी ‘नो दुराणी नो क्रिकेट’ असे फलक झळकावले गेले. असे रसिकप्रेम त्या काळच्या क्रिकेटपटूंना कोणत्याही बिदागीपेक्षा अधिक मोठे वाटायचे. त्यात एक सच्चेपणा होता. पुढे दुराणींनी चित्रपट, समालोचन अशा क्षेत्रांमध्ये मुशाफिरी केली. परंतु त्यांची ओळख ‘नायक क्रिकेटपटू’ अशीच अखेपर्यंत राहिली. षटकारांसाठी ओळखल्या गेलेल्या या क्रिकेटपटूचे कसोटी कारकीर्दीतले १५ षटकार त्यामुळेच आजच्या टी-२० जमान्यातील खंडीभर षटकारांपेक्षा अधिक मोलाचे ठरतात.