आता भारतरत्न जाहीर झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या आयुष्यात विरोधाभासांची मालिकाच आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. त्यांचा जन्म भारताचा सतत द्वेष करणाऱ्या पाकिस्तानातील. पण आता त्यांना जाहीर झाला आहे, भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार. व्यक्तिगत आयुष्यात अत्यंत मृदू असलेल्या अडवाणींचे वर्णन एकेकाळी भारताचे ‘लोहपुरुष’ असे केले जात असे. ज्या श्रेयसासाठी आयुष्य दिले ते समोर दिसत असताना बाजूला होऊन दुसऱ्याला वाट करून द्यावी लागणे, हादेखील त्यांच्या आयुष्यातील एक विरोधाभासच. आता त्याचे वर्णन काहींनी ‘काव्यगत न्याय’ असे करणे ही गोष्ट वेगळी. नव्वदच्या दशकात रथयात्रा काढून राममंदिराचा मुद्दा टिपेला नेणाऱ्या आणि लोकसभेत अवघ्या दोन जागांवर असलेल्या भाजपचा सत्तेचा मार्ग प्रशस्त करून देणाऱ्या अडवाणींना एकेकाळी त्यांचे नेतृत्व जहाल असल्याकारणाने पंतप्रधानपदावर पाणी सोडावे लागले होते, हे आता अगदी ‘जहालपणा’ची नवलकथा वाटावे असे. तेव्हा ‘अब की बारी अटलबिहारी’ म्हणत ते बाजूला झाले खरे, पण तेव्हा हुकलेले पंतप्रधानपद त्यांना नंतर कधीच मिळू शकले नाही. असे असले तरी ‘भारताचा लोहपुरुष’ हे बिरुद घेऊनच ते राजकारणात वावरले.
उदारमतवादी, मवाळ, संवेदनशील कवी असलेले अटलबिहारी वाजपेयी आणि लोहपुरुष अडवाणी ही भाजपच्या त्या काळातील शीर्ष नेतृत्वाची जणू एकमेकांचा समतोल साधणारी जोडी होती. तत्कालीन राजकारण कडवे करत नेणाऱ्या अडवाणींच्या वैयक्तिक आयुष्यातील उमदेपणाचे अनुभव आजही कितीतरीजण सांगतात. वैयक्तिक पातळीवर त्यांचे अनेकांशी स्नेहाचे नाते होते. आजच्या काळात अपवादाने दिसणारी विचारनिष्ठा, पक्षनिष्ठा हा त्यांच्या जणू व्यक्तिमत्त्वाचाच भाग होता. आज युसेन बोल्टपेक्षाही वेगाने पक्ष आणि निष्ठा बदलणारे राजकारणी सतत समोर दिसतात. असे असताना एके काळी सत्तेच्या आसपासही नसलेली जनसंघाचे बोट धरून राजकारणात आलेली आणि सगळी हयात एकाच पक्षात घालवणारी अडवाणींसारखी माणसे खरोखरच दुर्मीळ ठरतात.
वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्यांनी जनसंघाचे सचिव म्हणून राजकीय प्रवास सुरू केला. तिथून ते देशाच्या गृहमंत्री तसेच उपपंतप्रधानपदापर्यंत पोहोचले. मात्र ‘त्यानंतर’च्या अधिक खडतर वाटचालीतही वैयक्तिक मानापमानांपेक्षा पक्ष अधिक महत्त्वाचा मानत ते बाजूला राहिले. त्यांचा शब्द झेलायला उभ्या असलेल्या माध्यमांनाही त्यांनी कटाक्षाने दूर ठेवले. आपल्या वाटय़ाला जे आले, त्याबद्दल कटुतेचा एक शब्दही उच्चारला नाही. हे सगळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगून जाते. अशा लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करणे हा त्यांच्या ‘वारसदारां’साठीही काव्यगत न्यायच म्हणता येईल का?