डोंबिवलीतील सामाजिक क्षेत्रातील एक खळाळता प्रवाह म्हणजे मधुकरराव चक्रदेव. डोंबिवली शहराचे साहित्यिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, अर्थविषयक वलय जपले जावे म्हणून जी समर्पित भावाची मंडळी कार्यरत होती, त्यांच्यात मधुकरराव नेहमीच अग्रभागी असत. त्या काळी डोंबिवलीतील खेळाडूंना कोणत्याही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ठाणे अथवा मुंबईला जावे लागत असे. या मुलांना स्थानिक स्तरावरच क्रीडाविषयक सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून डोंबिवलीतच जिमखान्याची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. डोंबिवली जिमखान्याच्या उभारणीत मधुकररावांचे मोलाचे योगदान होते. आता शहर परिसरातील हजारो विद्यार्थी या जिमखान्याच्या माध्यमातून आपली कौशल्ये विकसित करून देशासह जगाच्या कानाकोपऱ्यांत डोंबिवलीतील क्रीडा क्षेत्राची पताका झळकवताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिमखान्याजवळच असलेले मैदान राज्याच्या उद्योग विभागाच्या अखत्यारीत होते. हे प्रशस्त मैदान जिमखान्याला मिळावे यासाठी पाठपुरावा करण्यात मधुकररावांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. डोंबिवलीचे नागरीकरण होत असताना येथील स्थानिक अर्थव्यवस्थेला आधार देणाऱ्या डोंबिवली नागरी सहकारी बँँकेच्या स्थापनेस आणि या विकासास चक्रदेव यांनी हातभार लावला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडली जाणारी प्रत्येक व्यक्ती सर्वात आधी ‘स्वयंसेवक’ असणे अपरिहार्य होते, असा तो काळ होता. संघ स्वयंसेवक एखाद्या विशिष्ट क्षेत्रांत सकारात्मक बदल घडवण्याचे लक्ष्य समोर ठेवून काम करत. मधुकरराव हे त्या पिढीचे प्रतिनिधी होते. ते आयुष्यभर एक शिस्तप्रिय स्वयंसेवक राहिले. श्री गणेश मंदिर संस्थान, लायन्स क्लब, रोटरी क्लब, स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समिती, नागरी अभिवादन समिती या संस्थांमध्ये त्यांनी कोणत्याही महत्त्वाकांक्षेविना झोकून देऊन काम केले. आदिवासी दुर्गम भागांतील रहिवाशांच्या कुटुंबाचा गाडा योग्य रीतीने चालावा म्हणून दरवर्षी ते या भागांतील उपवर वधू-वरांच्या सामूहिक विवाहांसाठी पुढाकार घेत. शाळकरी मुलांना व्यासपीठ मिळावे म्हणून डोंबिवली परिसरातील शाळांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करत. अशा स्पर्धानी अनेक मुलांमध्ये खेळांची, व्यायामाची आवड रुजविली. गोरगरीब, गरजू विद्यार्थी, कुटुंबांना सर्व प्रकारची मदत करण्यात ते नेहमी पुढाकार घेत. ज्येष्ठ नागरिक संघांमधील त्यांचा सहभाग सदस्यांना उमेदीचे बळ देत असे.

डोंबिवली आजसारखे पसरलेले नव्हते. त्या काळात शहरातील प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात मधुकररावांनी गावकीच्या प्रमुखाप्रमाणे भूमिका बजावली. सामाजिक कार्यात पाऊल टाकताच राजकीय आकांक्षांना धुमारे फुटण्याचा हा काळ. महत्त्वाकांक्षेच्या बळावर असे अनेक ‘समाजसेवक’ लगेचच लोकप्रतिनिधी, नेते होतात. अशा नेत्यांचे उदंड पीक आज डोंबिवलीत गल्लोगल्ली दिसते. आपल्या ४०-५० वर्षांच्या कार्यकाळात अशा राजकीय महत्त्वाकांक्षेचा स्पर्शही मधुकररावांना झाला नाही. त्यांचे रोखठोक बोलणारे कठोर शिस्तीचे व्यक्तिमत्त्व हा डोंबिवलीचा सामाजिक आधारवड होता.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vyaktivedh social areas in dombivli madhukarrao chakradev amy
Show comments