मुंबईतील दादर परिसर हा एके काळी भारतीय क्रिकेटचा केंद्रिबदू होता. या परिसरात वाढलेले वा खेळलेले अनेक जण पुढे भारतीय क्रिकेट संघात येऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकले. ही यादी मोठी आहे. पण त्यापेक्षाही मोठी यादी आहे, स्वत: गुणवान असूनही केवळ मुंबईकर भारतीय क्रिकेटपटूंच्या सान्निध्यात खेळल्यामुळे अजिबात वा पुरेशी आंतरराष्ट्रीय संधी न मिळालेल्यांची. अशा गुणवानांचा एखादा कल्पित संघच बनवायचा झाल्यास, सुधीर नाईक त्या संघाचे कर्णधार नक्कीच ठरले असते. नुकतेच घरगुती अपघाताचे निमित्त होऊन ते अंथरुणाला खिळले आणि पुन्हा बरे होऊ शकले नाहीत. वयाच्या ७८व्या वर्षी त्यांचे निधन झाले. सुधीर नाईक यांना केवळ तीनच कसोटी सामने खेळता आले. १९७४मध्ये इंग्लंड दौऱ्यातील एका सामन्यात दुसऱ्या डावात त्यांनी झुंजार ७७ धावा केल्या. त्या खेळीच्या आधी लंडनमधील एका दुकानात चोरी केल्याचा खोटा आळ त्यांच्यावर आणण्यात आला होता. नेमस्त नाईक यांनी गुमान गुन्हा कबूल करून प्रकरण वाढवू दिले नाही. त्यांनी आरोप फेटाळायला हवे होते, असे सुनील गावस्करांसह त्यांचे अनेक समकालीन आजही सांगतात. सुधीर नाईकांच्या बाबतीत दु:खद बाब म्हणजे, त्या वेळच्या भारतीय क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांची पाठराखण केली नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतातर्फे पहिला चौकार लगावण्याचे श्रेय त्यांनाच जाते. तेथेही त्यांची कारकीर्द लांबली नाही.

पण मुंबई रणजी संघासाठी त्यांनी केलेली कामगिरी गौरवास्पद ठरली. नेतृत्वगुण त्यांच्यात मुरलेले होते. मुंबई विद्यापीठ आणि नंतर मुंबई रणजी संघाचेही त्यांनी नेतृत्व केले. १९७०-७१मधील रणजी हंगामातला अंतिम सामना आजही सुधीर नाईक यांचा सामना म्हणून ओळखला जातो. त्या सामन्यासाठी मुंबईतर्फे अजित वाडेकर, दिलीप सरदेसाई, सुनील गावस्कर, अशोक मांकड हे इंग्लंड दौऱ्यावर गेल्यामुळे खेळू शकले नव्हते. समोर महाराष्ट्राच्या अनुभवी आणि तगडय़ा संघाचे आव्हान होते. पण तो सामना मुंबईने ४८ धावांनी जिंकला, त्या विजयात नाईक यांच्या नेतृत्वाचा वाटा मोठा होता. विशेष म्हणजे मुंबईचे दिग्गज फलंदाज पुढील हंगामासाठी परतल्यानंतर नाईक यांना वगळण्यात आले! क्रिकेट कारकीर्दीमध्ये असे अनेक चढ-उतार येऊनही अस्सल दादरवासीयाप्रमाणे नाईक यांच्या क्रिकेटनिष्ठेत आणि क्रिकेटप्रेमात खंड पडला नाही. क्रिकेटच्या सर्व पैलूंची त्यांना इत्थंभूत माहिती होती. खेळपट्टी तयार करण्याच्या गुंतागुंतीच्या शास्त्राचे ते जाणकार होते. खेळपट्टी ही क्रिकेटचा निखळ आनंद घेण्यासाठी तयार केली जावी, कुण्या एका संघाला फायदा व्हावा म्हणून नव्हे, या तत्त्वावर त्यांची अखेपर्यंत श्रद्धा राहिली आणि त्यासाठी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. नॅशनल क्रिकेट क्लबच्या माध्यमातून त्यांनी झहीर खानसारखे उत्तम क्रिकेटपटू घडवले. फलंदाजी, नेतृत्व, प्रशिक्षण, खेळपट्टी शास्त्र अशा विविध पैलूंवर हुकुमत असलेल्या या मितभाषी परंतु अभिमानी क्रिकेटपटूला साजेसा सन्मान मात्र भारतीय क्रिकेट व्यवस्थेकडून मिळाला नाही, हे कटू वास्तव!