क्रिकेटवेडय़ा मुंबईतील मैदानांवर दररोज लाखो मुले देशासाठी क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न बाळगून मेहनत घेत असतात. अशा वेळी वेगळय़ा खेळाचा प्रसार करणाऱ्यांचे कौतुक वाटते. त्यातही असा प्रसार करणारा एकांडा शिलेदार असेल, तर आदर कैक पटींनी वाढतो. सुरेंद्र करकेरा यांच्याविषयी हेच म्हणता येईल. मुंबईतील बहुतेक सर्व माध्यमांच्या कार्यालयांमध्ये रात्री धडकणारे, दाक्षिणात्य वळणाच्या हिंदीमधून मैत्रीपूर्ण संवाद साधणारे सुरेंद्र करकेरा कित्येक क्रीडा पत्रकारांना सुपरिचित असतील. समोरचा कामात गढलेला असल्याचे पूर्ण भान ठेवूनही करकेरा होऊ घातलेल्या किंवा झालेल्या फुटबॉल शिबिराच्या बातम्यांना थोडी तरी प्रसिद्धी मिळावी, यासाठी आर्जवे करत. त्यांच्या तळमळीकडे, फुटबॉल कधी तरी या मातीत लोकप्रिय होईल, या आशावादाकडे पाहून थक्क झालेल्या पत्रकारांच्या दोन पिढय़ा आहेत. करकेरा निव्वळ फुटबॉल संघटक नव्हते. कार्यकर्ते होते. असंख्य गरीब आणि होतकरू खेळाडूंना बिपिन फुटबॉल अकादमीच्या माध्यमातून फुटबॉलचे प्रशिक्षण मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करायचे. तळागाळापासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतच्या फुटबॉलपटूंना त्यांच्याविषयी आदराची भावना होती. त्यांच्या या मिशनला दु:खद पार्श्वभूमी होती. करकेरा यांचा थोरला मुलगा बिपिनचे १९८८ मध्ये अकाली निधन झाले. मोठेपणी फुटबॉलपटू होण्याचे बिपिनचे स्वप्न होते. त्याच्या निधनामुळे करकेरा यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, मुलाचे फुटबॉलप्रेम पुढे नेण्यासाठी त्यांनी बिपिन स्मृती फुटबॉल प्रशिक्षण व स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली. मुलाच्या निधनानंतर साधारण महिन्याभरात काही मित्रांच्या साहाय्याने त्यांनी पहिली स्पर्धा खेळवली. यामध्ये आठ संघांनी सहभाग घेतला होता. मात्र, आर्थिक गणित जुळत नसल्याने ही स्पर्धा बंद करावी लागणार असे त्यांना अनेकदा वाटले. परंतु मुलाच्या व फुटबॉलच्या प्रेमाखातर त्यांनी ही स्पर्धा सुरू ठेवली. बिपिन फुटबॉल अकादमीच्या माध्यमातून मुंबई आणि आसपासच्या उपनगरांतील गरीब-गरजू मुलांना फुटबॉलचे धडे दिले. त्यांचे हे कार्य गेली ३४ वर्षे सुरू होते.
कर्नाटकातील मंगळूरु येथून सत्तरीच्या दशकात मुंबईत आलेल्या करकेरा यांनी पुढे सेंट्रल बँकेत नोकरी केली. वर्षांतून दोन वेळा स्पर्धा घेणे यासाठी खूप पैसा लागायचा. हा खर्च भागवण्यासाठी करकेरा स्वत:च्या खिशातून, तसेच फुटबॉलच्या दात्यांकडून, सामाजिक आणि विविध कंपन्यांकडून निधी जमा करायचे. गरज पडल्यास कर्ज काढायचे, पत्नीचे दागिने गहाण ठेवायचे. गरीब-गरजू फुटबॉलपटूंना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी रात्रशाळेत त्यांना दाखल केले. त्यांना हॉटेल-कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून दिली. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवला. करकेरांनी घडवलेल्या अनेक खेळाडूंना फुटबॉलमुळे नोकऱ्याही मिळाल्या. वयाच्या ७१व्या वर्षी या ध्येयवेडय़ा संघटकाने नुकताच अखेरचा श्वास घेतला. करकेरांच्या निधनानंतर व्यक्त झालेली सार्वत्रिक हळहळ त्यांच्या कर्तृत्वाची खरी पोचपावती ठरली.