‘भाऊ इंजिनीअर- तो अमेरिकेत असतो, एक बहीण डॉक्टर, दुसरी बहीण प्राध्यापक आहे.. आणि मी आयएएस व्हावं अशी वडिलांची इच्छा होती. झालेही असते कदाचित, पण ‘राष्ट्रीय नाटय़ विद्यालया’त गेल्यावर पक्कं ठरवलं- नाटय़ क्षेत्रातच राहायचं.’ – हे मुलाखतीत अगदी सहजपणे सांगणाऱ्या त्रिपुरारी शर्मा खरोखरच आयएएस झाल्या असत्या, तर प्रशासनातही त्यांनी छाप उमटवली असती इतके नेतृत्वगुण त्यांनी नाटय़ क्षेत्रात सिद्ध केले. ‘हजार चौरासी की माँ’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाच्या संवादलेखिका आणि ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ (२०१३) मिळवणाऱ्या नाटय़ लेखिका, दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातील अध्यापक अशी ओळख त्यांनी मिळवली. स्त्रीवादी नाटकांचा भारतीय इतिहास त्यांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही, इतके त्यांचे कर्तृत्व. सामाजिक आशयाचा आग्रह नुसता बोलून न दाखवता, कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणांच्या कोळपत्या आशा-आकांक्षांवरले ‘आधा चाँद’सारखे नाटक (२०१२) प्रेक्षकांपुढे आणत राहिल्या. त्यांची ही धडपड आधी दुर्धर आजाराने थांबवली, आणि १ ऑक्टोबर रोजी मृत्यूने.

दिल्लीच्या कश्मिरी गेट परिसरात त्रिपुरारी शर्मा यांचे बालपण गेले. दिल्लीतूनच (महत्त्वाकांक्षी वडिलांमुळे) त्यांनी दहावीच्या एसएससीऐवजी सीनियर केम्ब्रिजची परीक्षा दिली आणि मिरांडा हाऊस या प्रख्यात महाविद्यालयातून इंग्रजी साहित्यात त्या पदवीधर झाल्या. यानंतर मात्र राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे – ‘रानावि’चे – जग त्यांना दिसले. त्यांची हुशारी पाहून ‘ही फार तर समीक्षक होईल, स्टेजवर काही रमणार नाही’ अशीही भाकिते ‘रानावि’त झाली, पण रंगमंचावरच काही करून दाखवण्याचा चंग त्यामुळे पक्का झाला. नाटय़गुरू इब्राहिम अल्काझी यांचे मार्गदर्शन लाभलेच पण सहपाठींमुळे ग्रामीण भारताकडेही ओढा वाढला. हाच काळ होता ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ साजरे झाल्यानंतरचा आणि हुंडाविरोधी चळवळीतून पुढे स्त्रीवादी चळवळही वाढत असतानाचा. स्त्रीवादी नाटक आपल्याला कोणी आयते देणार नाही, हे ओळखून त्रिपुरारी शर्मा यांनी एका ग्रामीण स्त्रीवरचे ‘बहू’ हे नाटक लिहिले. सासर आणि माहेरही सोडणारी ही ‘बहू’ ढोबळ आहे, हे पुढे ‘अक्स पहेली’, ‘विक्रमादित्य का न्यायासन’, ‘बिरसा मुंडा’, ‘सम्पदा’ ही नाटके लिहिणाऱ्या शर्मा मान्य करीत. स्वत: नाटक लिहिण्याऐवजी कथा-कल्पना सहकाऱ्यांना सांगून, चर्चेतून आणि बहुविध अनुभवविश्वांतून ती फुलवण्याचा प्रयोग त्यांनी ‘अलारिपु’ या त्यांच्या संस्थेतर्फे अनेकदा केला. (त्याला ‘डिव्हायसिंग’ म्हणत.) १९८८ मध्ये अमेरिकेत महिला नाटककारांच्या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व त्यांनी केले होते. ‘दिग्दर्शकच राजा’ वगैरे न मानता नटांना सहकारी मानणारा स्त्रीवाद त्यांनी तालमींतही जपला. त्यांच्या जाण्याने नाटय़ क्षेत्रातील एक लोभस व्यक्तिमत्त्व अवघ्या ६७ व्या वर्षी लोपले आहे. ‘सामूहिक प्रक्रिया के भी कुछ नियम तो होते ही हैं जो उस रचना को परिभाषित करते हैं। कई बार मूल विचार तक पीछे छूट जाता है पर इससे किसी और को असुविधा नहीं होती। यह दोनों प्रक्रियाएं महत्वपूर्ण हैं।’ हे त्यांचे विचार मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही अंगीकारावेत असे आहेत.

Story img Loader