हैदराबाद विद्यापीठात ‘सी. आर. राव अॅडव्हान्स्ड इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स अॅण्ड कम्प्युटर सायन्स’ ही संस्था २००९ मध्ये उभारली गेली, तेव्हा स्वत: राव नव्वदीच्या उंबरठय़ावर होते. वयाच्या १०३ व्या वर्षी, २३ ऑगस्ट रोजी अमेरिकेत त्यांचे निधन झाले, त्याआधीच दशकभरापासून (२२ डिसेंबर २०१३ पासून) या संस्थेत छोटेखानी ‘सी. आर. राव संग्रहालय-दालन’सुद्धा आहे. म्हणजे त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी संस्था-उभारणीचे काम आधीच झालेले आहे. हयात असताना १९६५ च्या ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारा’चे एक मानकरी ठरण्यापासून ते पद्मभूषण (१९६८), पद्मविभूषण (२००१), अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या हस्ते त्या देशाचे ‘नॅशनल सायन्स मेडल’ (२००२), ते गणितशास्त्रातील नोबेल मानले जाणारे ‘इंटरनॅशनल प्राइझ इन स्टॅटिस्टिक्स’ (२०२३) अशा पुरस्कारांनी राव यांचे दीर्घायुष्य कृतार्थ झालेले होते.
ते मूळचे गणिती, पण गणिताची पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर संख्याशास्त्रातही त्यांनी अशी पदवी मिळवली (१९४३), त्यासाठी १९४१ पासूनच त्यांचा संबंध कोलकात्याच्या भारतीय संख्याशास्त्र संस्थेशी (आता महालनोबिस संस्था) आला. तिथे परिमिती व परिगणन यांविषयीचा शोधनिबंध सादर करून लंडनच्या किंग्ज कॉलेजात ते डॉक्टरेटसाठी गेले. तेथून पुन्हा कोलकात्यातील याच संस्थेत येऊन १९७९ पर्यंत तिथल्या प्रमुखपदासह विविध पदांवर त्यांनी काम केले. महालनोबिस यांच्या सूचनेनुसार राज्याराज्यांत ‘संख्याशास्त्र विभाग’ स्थापणे- उभारणे आणि तिथे माणसे तयार करणे हे यापैकी प्रमुख काम! तर वयाच्या साठीत अमेरिकेतील पिट्सबर्ग विद्यापीठाचे प्राध्यापक पद त्यांनी स्वीकारले. १९८८ पासून पेनसिल्व्हानिया विद्यापीठात ते प्राध्यापक झाले आणि इथेच २००१ पासून ‘सुप्रतिष्ठ (तहहयात) प्राध्यापक’ पदाचा मान त्यांना मिळाला.
उमेदीचा काळ स्वदेशातच घालवून नंतर प्रगत देशांत नाव कमावण्याचा हा लौकिक प्रवासही थक्क करणारा असला तरी, संख्याशास्त्रीय सिद्धान्तनात त्यांनी घातलेली भर ही अलौकिक आहे. त्या शास्त्रात ‘क्रेमर-राव इनइक्वॅलिटी’, ‘राव-ब्लॅकवेलायझेन’, ‘राव-मेट्रिक’, ‘राव्ज यू-टेस्ट’, ‘राव्ज जनरलाइज्ड इन्व्हर्स ऑफ मेट्रायसेस’ अशा संज्ञा वापरल्या जातात, त्यातले हे राव! त्यांच्या नावातील ‘सी. आर.’ म्हणजे कल्यमपुडी राधाकृष्ण’वगैरे माहिती जगाच्या दृष्टीने बिनमहत्त्वाची आणि विकिपीडियापुरतीच; तर त्या संज्ञांचे अर्थदेखील गणित वा संख्याशास्त्राच्या जगाबाहेर अगम्य. पण संख्याशास्त्रीय मापन-पद्धती, अनुमानपद्धती अधिक अचूक होण्यासाठी त्या चुकतातच कशा याचा विचार करून – म्हणजे अनुमानपद्धतीतल्या ‘फटी’ ओळखून- त्या अचूकपणे बुजवण्याचा ध्यास राव यांनी घेतला होता. त्यांचे ‘स्टॅटिस्टिक्स अॅण्ड ट्रुथ’ हे पुस्तक इंग्रजीत भारतातही मिळत असले तरी फ्रेंच वा जर्मनखेरीज तैवानी आणि चिनी तसेच जपानी, तुर्की भाषांतही त्याचे अनुवाद झाले आहेत! मराठीसह अन्य भारतीय ‘ज्ञानभाषां’त हे पुस्तक आले, तर लोक शहाणे होऊन कदाचित सत्ताधाऱ्यांची संख्याशास्त्र-विषयक अनास्थाही कमी होईल आणि ती राव यांना खरी आदरांजली ठरेल.