जर्मन सिनेमाशी भारतीय दर्शकांचा काहीएक संबंध नाही. तरी डीव्हीडी आणि त्यानंतरच्या टोरंटयुगात जी आसक्त सिनेचूषकांची पिढी निपजली, त्यांनी ‘रन लोला रन’, ‘गुडबाय लेनिन’, ‘द व्हाइट रिबन’, ‘लाइव्हज ऑफ अदर्स’ या तिथल्या सिनेमांशी नेत्रसख्य करीत त्यांची महती इतरांना समजावली. अलीकडच्या बिंजाळलेल्या युगात ‘डार्क’ या काळाशी खेळणाऱ्या नेटफ्लिक्सी सीरिजची पारायणे करीत जगासह मराठी अबालवृद्धांनीही सबटायटलसह जर्मनीची सैर केली. याच देशातील ज्याचे नाव पश्चिम-पूर्वेतील सिनेवेडय़ांना सहज घेता येईल असा दिग्दर्शक म्हणजे विम वेण्डर्स. पण नावाच्या उच्चारसुलभतेपलीकडे त्याच्या सिनेकर्तृत्वाची कक्षा उत्तुंग आहे. फ्रेंच आणि इटालियन न्यू वेव्ह सिनेमाच्या प्रभावातून साठोत्तरीत जर्मनीतून जे चित्रकर्ते नवा सिनेमा बनवत होते, त्यात विम वेण्डर्स आघाडीवर होते. भारतीय वृत्तपटलाला ‘कान’ महोत्सवाचे नावही माहिती नसणाऱ्या काळात म्हणजे ऐंशीच्या दशकात तेथील परमोच्च सिनेकिताब आणि दिग्दर्शकाचे पारितोषिक विम वेण्डर्स यांनी पटकावले होते. अन् प्रत्येक दशकात जगासाठी लक्षवेधी चित्रपट, माहितीपट बनविण्याचा त्यांचा शिरस्ता अगदी अलीकडेपर्यंत थांबलेला नाही. निष्णात शल्यचिकित्सकाच्या घरात जन्मलेल्या विम यांचे नाव बाप्तिस्म्यातल्या ‘विल्हेम’वरून संक्षिप्त करण्यात आले. कलेची आवड असताना त्यांनी करिअरसाठी वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला. पण वैद्यकीय शिक्षणात नापाशीचा शिक्का लागल्यानंतर पॅरिसमध्ये जाऊन चित्रकार बनण्याचा चंग बांधला. या काळात त्यांना सिनेमा पाहण्याचा नाद लागला आणि स्थानिक चित्रगृहांत दिवसाला पाच चित्रपट असा डोळय़ांना खुराक देत त्यांच्यातला सिनेदिग्दर्शक घडला.
चित्रपट अभ्यासक्रमादरम्यानचा प्रकल्प म्हणून १९७० साली त्यांनी ‘समर इन द सिटी’ नावाचा पूर्ण लांबीचा चित्रपट बनवला. त्यानंतर अमेरिकी कादंबरी ‘स्कार्लेट लेटर’चे जर्मन सिनेरूप तयार केले. ‘पॅरिस, टेक्सास’ या रोडमूव्हीद्वारे त्यांची जर्मनेतर देशांत ओळख झाली. ‘विंग्ज ऑफ डिझायर’ या चित्रपटानंतर ते जागतिकच झाले. क्यूबामधील संगीतसंस्कृतीवरील ‘ब्युएना व्हिस्टा सोशल क्लब’, पिना बाऊश या नर्तकीवरील ‘पिना’ आणि ब्राझिली छायाचित्रकारावरच्या ‘सॉल्ड ऑफ द अर्थ’ या माहितीपटांनी ऑस्करमध्ये धडक दिल्यावर या जर्मन दिग्दर्शकाची कीर्ती ओसंडून वाहू लागली. पण लिआँ येथील ल्युमिए पुरस्कारासाठी वेण्डर्स यांचे नाव नुकतेच जाहीर झाले आहे. आद्य चित्रपटकर्ते ल्युमिए बंधूंच्या नावाने, त्यांच्याच गावातून देण्यात येणाऱ्या या कारकीर्द-गौरवाला २००९ पासून आरंभ झाला. हा गौरव मिळवल्याने आता विम वेण्डर्स हे क्लिंट ईस्टवुड, मिलोस फोरमन, केन लोच, क्वेण्टिन टेरेण्टिनो, प्रेडो अल्माडोर, वाँग कर वै, जेन फोण्डा, फ्रान्सिस फोर्ड कपोला, टिम बर्टन आदींच्या पंगतीत समाविष्ट झाले आहेत. त्यांचा नवा चित्रपट ‘परफेक्ट डे’ हा जपानमधील शौचगृह सफाई करणाऱ्या व्यक्तीवर आधारित आहे. या सन्मानाच्या बातमीने सध्या जगभरातील चित्रपटवेडय़ांना पुढले काही दिवस डाऊनलोडण्या आणि बिंजाळण्याकरिता निमित्त मिळाले आहे.