लेखिका, कथाकार, कवयित्री, चरित्रकार, लघुपट निर्मात्या, दिग्दर्शिका याच्याबरोबरीने भरतनाटय़म, सतारवादनात रमणाऱ्या, बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या डॉ. अंजली कीर्तने, ‘मी जन्मले पुस्तकांच्या घरात आणि लेखिकेच्या पोटी,’ असे म्हणत आपले सारे कर्तृत्व आईच्या ओंजळीत टाकतात. लेखिका, प्राध्यापक पद्मिनी बिनीवाले यांच्या सहवासात अंजली यांच्यात साहित्याचे बीज रोवले गेले खरे, मात्र त्याची मशागत झाली ती समीक्षक वा. ल. कुलकर्णी आणि संशोधक म.वा. धोंड यांच्या तालमीत.

कुलकर्णी यांच्यासारखा मृदू स्वभावाचा प्राध्यापक आणि धोंड यांच्यासारखा अंजलीबाईंच्याच भाषेत ‘कर्दनकाळ’ प्राध्यापकाने त्यांच्यातला संशोधक घडवला. त्यामुळे आणि आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे हे नेमकेपणाने माहीत असल्यानेच अंजली यांनी ‘पॉप्युलर प्रकाशना’ची नोकरी सहज सोडली. संपादन ते विक्री या प्रकाशन व्यवसायातल्या सगळय़ा गोष्टी करायला मिळत असताना, विश्राम बेडेकरादी लेखकांशी त्यांच्या लेखनाविषयी गप्पा मारायला, त्यांच्या लिखाणाचे संपादन करायला मिळत असताना आणि मुख्य म्हणजे या कामात रमलेल्या असताना ‘वाटा बदलण्यातच खरी मजा असते,’ असे म्हणत पूर्णवेळ लेखनकामासाठी त्या बाहेर पडल्या. याच काळात त्यांच्या आयुष्यात आल्या डॉ. आनंदीबाई जोशी. आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे आनंदीबाईंनी डॉक्टर व्हायचे ठरवले, हे जेव्हा त्यांना कळले तेव्हा त्याआधी वाचलेले ‘गोपाळरावांमुळे आनंदीबाई डॉक्टर झाल्या’ हे त्यांना आनंदीबाईंवर अन्यायकारक वाटू लागले आणि त्यांनी आनंदीबाईंच्या आयुष्याचा अधिक शोध घ्यायचे निश्चित केले. ग्रंथालयात जाऊन आनंदीबाईंवर जे जे मिळेल ते ते शोधून वाचायचा सपाटा लावला. मात्र एका क्षणी त्यांना जाणवले, आपल्याला जी माहिती मिळाली ती एकाच बाजूची आहे.

अमेरिकेत नेमके काय झाले ते कसे कळणार? ते समजून घ्यायचे असेल तर अमेरिकेला जावे लागेल! हे सोपे नव्हते, पण इच्छा होती, मार्ग सापडला आणि अंजली अमेरिकेत पोहोचल्या. माहिती गोळा करत असतानाच एके दिवशी आनंदीबाईंच्या रक्षाकलश ठेवलेल्या समाधीचे दर्शन त्यांनी घेतले आणि त्या एका क्षणाने आत्तापर्यंत लेखक असणाऱ्या अंजली लघुपटकार झाल्या. आनंदीबाईंचे आयुष्य ‘डॉक्युड्रामा’च्या माध्यमातून मांडताना त्यांना एक नवीन ‘दृष्टी’ मिळाली.

‘लेखणी माझी सखी आणि कॅमेरा माझा मित्र,’ असे म्हणत त्यांनी दोन्ही माध्यमांना आपलेसे केले आणि लोकांपर्यंत नामवंतांना पोहोचवले. त्यात संगीताचे सुवर्णयुग आणणारे गानयोगी दत्तात्रेय विष्णू पलुस्कर होतेच आणखी एक महत्त्वाचे नाव होते दुर्गाबाई भागवत. ‘दुर्गाबाई हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक धन आणि सदसद्विवेकबुद्धीचे प्रतीक आहे, ते जपायला हवे,’ असे म्हणत ध्यासमग्न दुर्गाबाईंवर ‘बहुरूपिणी दुर्गा भागवत’ हे चरित्र आणि ‘साहित्यिका दुर्गा भागवत’ हा लघुपट तयार करत त्यांनी  महाराष्ट्राचे संचित महाराष्ट्राच्या हाती सुपूर्द केले. डॉ. अंजली कीर्तने यांच्या निधनाने एक चतुरस्र साक्षेपी लेखक-संशोधक गमावला आहे.

Story img Loader