‘युद्ध नव्हे, कायदा हाच आंतरराष्ट्रीय झगडे सोडवण्याचा मार्ग असू शकतो’ हे बेंजामिन बी. फेरेन्झ ऊर्फ बेन फेरेन्झ यांनी वयाच्या ९६ व्या वर्षी काढलेले उद्गार त्यांच्या मृत्यूनंतरही महत्त्वाचे ठरतात, याचे कारण या उद्गारांमागचा फेरेन्झ यांचा प्रदीर्घ, सखोल अनुभव. ‘न्यूरेम्बर्ग खटल्यातील वकील’ म्हणून त्यांनी वयाच्या २७ व्या वर्षी काम केलेच, पण महायुद्धानंतर (१९४६) स्थापन झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय न्यायालया’च्या जोडीने ‘आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालय’ (२००२ पासून) कार्यरत होण्यामागे त्यांचेही प्रयत्न कारणीभूत होते. वयाच्या शंभरीतही बुद्धी शाबूत ठेवणारे बेंजामिन फेरेन्झ ७ एप्रिल रोजी, १०३ वर्षांचे होऊन निवर्तले.
‘न्यूरेम्बर्ग खटल्यां’च्या वकील-पथकातील फेरेन्झ तसे नवखे. परंतु अमेरिकेचे मुख्य वकील म्हणून तेथील न्यायाधीश रॉबर्ट एच. जॅक्सन यांची नियुक्ती तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी केली, तेव्हा जॅक्सन यांना त्यांचे सहकारी निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. फेरेन्झ ज्यू आहेत, जर्मनीतील तीन ठिकाणच्या अत्याचारांचा त्यांनी अभ्यास केला आहे, हे जॅक्सन यांनी हेरले असावे. एकंदर १३ ‘न्यूरेम्बर्ग खटल्यां’पैकी नवव्या खटल्याचे प्रमुख वकील म्हणून तरुण फेरेन्झ यांची नियुक्ती झाली .‘आइन्सात्झग्रूपेन’ ही नाझींची फिरती कत्तलपथके. त्यातील २४ अधिकाऱ्यांवर भरला गेलेला हा खटला होता. यापैकी आठ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, त्यापैकी चौघांना फासावर चढवण्यात आले, तर अन्य चौघांना कालांतराने जन्मठेप देण्यात आली.
ही तरुणपणीची कीर्ती सांगत राहण्याऐवजी फेरेन्झ हे सर्वच प्रकारच्या आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांचा अभ्यास करू लागले. व्हिएतनाम युद्धाला तर त्यांचा विरोध होताच. ते युद्ध ‘अघोषित’ असले तरीही अमेरिकेने युद्धगुन्हेच केल्याचे सिद्ध होऊ शकते, असे अतिशय सनदशीर शब्दांत सांगणारा दीर्घ लेख त्यांनी १९६८ च्या जूनमध्येच लिहिला आणि प्रकाशितही झाला! पुढल्या प्रत्येक अमेरिकी ‘जागतिक पोलीसगिरी’च्या प्रसंगी, स्वदेशाला अप्रिय प्रश्न विचारण्याची न्यायप्रिय िहमत फेरेन्झ यांनी दाखवली. १९७५ पासून त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालय’ स्थापनेसाठी पाठपुरावा सुरू केला. त्यासाठी भक्कम बाजू मांडणारे त्यांचे पुस्तक १९७५ मधील आहे. अखेर रवांडातील नरसंहारानंतर, १९९८ मध्ये या न्यायालयाच्या स्थापनेसाठी अनेक देशांनी करार केला. भारत या कराराचा सदस्य नाही.
मूळच्या हंगेरियन ज्यू कुटुंबात मार्च १९२० मध्ये बेंजामिन रोमानियाच्या ज्या सीमावर्ती प्रांतात जन्मले, त्यास १९१८ च्या करारामुळे ‘हल्लामुक्त क्षेत्र’ असा दर्जा मिळाला असूनही हंगेरीच्या नव्या कम्युनिस्ट राजवटीने तिथे आक्रमण करून तो प्रांत बळकावला. दहा महिन्यांच्या बेंजामिनसह फेरेन्झ कुटुंब अमेरिकेत आले. हार्वर्डमधून कायद्याची पदवी मिळवलेल्या बेंजामिन यांना १९४३ मध्ये लष्करी सेवेत दाखल व्हावे लागले. तिथे ते विमानविरोधी पथकात होते. त्या दोन वर्षांत शांतताप्रिय बेंजामिन यांची घालमेल झाली असेल तेवढीच.. एरवी ते समाधानाने जगले.. शाळेपासूनच्या मैत्रिणीशी मांडलेला ७३ वर्षांचा संसार तिच्या मृत्यूने (२०१९) संपला, त्यानंतर काही काळ घरी राहून ते वृद्धाश्रमात गेले होते.