वक्फ विधेयकावर संसदेत झालेल्या मत विभागणीतून किमान तीन पक्षांतले मतभेदही चव्हाट्यावर आले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल, ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल तसेच केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोकदल हे ते पक्ष. संयुक्त जनता दल व राष्ट्रीय लोकदलामधील काही मुस्लीम नेत्यांनी पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिले. संयुक्त जनता दल हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष असल्याने भाजपला मदत करणे अपेक्षितच होते. पण बिजू जनता दलाच्या भूमिकेवरून वादळ निर्माण झाले आहे. खरे तर बिजू जनता दल (बीजेडी) अनेक वर्षे भाजपचा मित्रपक्ष. गेल्या दहा वर्षांत पटनायक यांनी केंद्रात वेळोवेळी मोदी सरकारला मदत केली होती. पण भाजपने संधी येताच पटनायक यांच्याबरोबरील मैत्री तोडून स्वबळावर निवडणूक लढविली. सुमारे २५ वर्षे सत्तेत असलेल्या नवीन पटनायक यांच्या सरकारच्या विरोधात नाराजी निर्माण झाल्याचा फायदा उठवत भाजपने गेल्या वर्षी ओडिशामध्ये पटनायक यांना पराभवाची धूळ चारली. निवडणूक प्रचारात भाजपने पटनायक यांच्यावर वैयक्तिक आरोप केले होते. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून नवीन पटनायक यांनी भाजपपासून दूर राहण्यावरच भर दिला होता. पण वक्फ कायद्यावरील पक्षाच्या भूमिकेने बिजू जनता दलातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
वक्फ विधेयकावर राज्यसभेत विरोधी भूमिका घेण्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला होता. लोकसभेत ‘बीजेडी’चा एकही सदस्य नाही. राज्यसभेत पक्षाचे सात खासदार आहेत. एखाद्या विधेयकावर विरोधी मतदान करावे म्हणून पक्षाकडून पक्षादेश (व्हिप) लागू केला जातो. वक्फ विधेयकाच्या विरोधी भूमिका घेण्याचे जाहीर करूनही पक्षादेश लागू करण्यात आला नाही. उलट खासदारांना सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान करण्यास सांगण्यात आले. परिणामी सातपैकी तिघे भाजपच्या बाजूने, तिघे विरोधात तर एक खासदार अलिप्त राहिला. यामुळेच राज्यसभेत विधेयकाच्या बाजूने एनडीए, अपक्षांच्या संख्याबळापेक्षा तीन मते अधिक पडली. या गोंधळावरून ‘बीजेडी’त वाद निर्माण झाला आहे. याचे खापर पक्षात एकमेकांवर फोडले जात आहे. माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि त्यांचे विश्वासू सहकारी व माजी सचिव व्ही. के. पांडियन हे लक्ष्य झाले आहेत. याच नवीन पटनायक यांच्या विरोधात २००२ मध्ये पक्षाच्या १० पैकी सहा खासदारांनी बंड केले होते, तेव्हा राजकारणात तसे नवखे असूनही पटनायक यांनी ते बंड यशस्वीपणे मोडून काढले होते. पुन्हा २०१२ मध्ये असाच प्रयत्न झाला, तेव्हाही पक्ष पटनायक यांच्या मागे ठामपणे उभा राहिला होता. या वेळी मात्र परिस्थिती निराळी असल्याने, पटनायक यांचे नेतृत्वच पणाला लागले आहे.
मतदानातील गोंधळाबद्दल पक्षातील मुस्लीम नेत्यांनी आवाज उठवला आहे. पक्षाने धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्याशी समझोता करू नये, अशी मागणी करण्यात येत आहे. एका खासदाराने या गोंधळाला पांडियन यांना जबाबदार धरले आहे. यावर पक्षातील खासदारांच्या एका गटाने पांडियन यांची काहीही चूक नाही, ते गेल्याच वर्षी सक्रिय राजकारणापासून दूर झाल्याचा युक्तिवाद केला. गेल्या वर्षी पटनायक यांच्या पराभवास पांडियन यांना जबाबदार धरण्यात आले होते. मूळचे तमिळ, पण सनदी अधिकारी म्हणून वर्षानुवर्षे ओडिशात असलेल्या पांडियन यांना पटनायक यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून पुढे आणण्यास सुरुवात केल्याने त्याची प्रतिक्रिया उमटली होती. भाजपने प्रचारात नेमक्या याच मुद्द्यावर भर दिला होता. ‘पटनायक आणि पांडियन यांना पुन्हा भाजपशी जुळवून घ्यायचे आहे’ असा आरोप ‘बीजेडी’च्याच विरोधी भूमिका घेणाऱ्या खासदारांकडून करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून बिजू जनता दल अद्यापही सावरलेला नाही. अशातच ओडिशामध्ये काँग्रेसने विरोधकांची जागा व्यापण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्रात शिवसेना (ठाकरे), पंजाबमध्ये अकाली दल, आसाममध्ये आसाम गण परिषद, गोव्यात महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष हे एकेकाळी भाजपशी मैत्री केलेले पक्ष आज राजकीयदृष्ट्या संपले वा त्यांचे अस्तित्वच नगण्य झाले. या यादीत बिजू जनता दलाची भर पडते की काय, अशी भीती व्यक्त केली जाते. लोकसभा व विधानसभेतील दारुण पराभवापासून नवीन पटनायक यांनी काही बोध घेतलेला दिसत नाही. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागताच लक्ष घालण्याचे आश्वासन नवीनबाबूंनी दिले आहे. तरीही ‘आणखी एक प्रादेशिक पक्ष संपला’अशी वेळ ‘बीजेडी’वर येऊ नये यासाठी पटनायक यांना पुढील काळात फार सावध पावले टाकावी लागणार आहेत.