युद्धं ही भूकंपासारखी असतात. पृथ्वीच्या अंतरंगात भूपट्टांची हालचाल होऊन तणाव निर्माण होतो आणि एका मर्यादेनंतर या तणावाचा उद्रेक भूकंप, ज्वालामुखी अशा स्वरूपात दिसतो. जीवित आणि वित्तहानीच्या पलीकडे या भौगोलिक घडामोडींचा दूरगामी परिणाम म्हणजे त्यांनी भूपृष्ठावर घडवलेले बदल आणि नवीन भूरूपांची निर्मिती…काही विध्वंसक तर काही निर्मितीशील! युद्धांचंही असंच काहीसं… आधी राष्ट्रा-राष्ट्रांतले ताणतणाव वाढीस लागतात… संघर्ष इरेला पेटतो… जीवित आणि वित्तहानी होते… मात्र त्यापुढे युद्धांची सर्जनशील भूमिका असते ती युद्धोत्तर घडी बसविण्याची… युद्ध लढण्यासाठी आणि रोखण्यासाठी नवनवीन शोधांचं उगमस्थान बनण्याची. मागील शतकाचा पूर्वार्ध हा दोन महायुद्धांच्या मंथनाचा साक्षीदार. त्यातून तंत्ररूपी विश्वव्यापी अमृत प्रकटलं आणि सर्वच राष्ट्रे या तंत्र-प्राशनाच्या स्पर्धेत उतरली. या स्पर्धेने अनेक वळणं, कोलांट्याउड्या घेत तर कधी राजमार्ग बांधत आधुनिक जागतिक व्यवस्थेची घडी बसवली. अर्ध्या शतकाचा हा समरशंख राजकीय महत्त्वाकांक्षेनं फुंकला गेला तर आण्विक तंत्रज्ञानाच्या आविष्काराने विझला… तो आजतागायत!

महायुद्धे आणि तंत्रज्ञान

पहिल्या महायुद्धात इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यामधील प्रसिद्ध आणि अनिर्णित ‘खंदकाची लढाई’ अनेक महिने लांबल्यानंतर नवीन युद्धपद्धतींची गरज निर्माण झाली; त्यातून रणगाडा केंद्रित युद्धपद्धती अस्तित्वात आली. ब्रिटिश मार्क-१ सारखी रणगाड्याची प्राथमिक प्रारूपे, यांत्रिकदृष्ट्या सुलभ आणि अनेकदा बेभरवशी असली तरी त्यांना तैनात केल्यामुळे युद्धशास्त्राचे तांत्रिक निकष कायमस्वरूपी बदलले. लघु-शस्त्रे आणि तोफखान्याच्या प्रगतीमुळे युद्धभूमीचे स्वरूप मूलत: बदलले. ‘मशीनगन’चा वापर त्या युद्धापूर्वीच सुरू झाला असला तरी आता ती वेगवान, सातत्यपूर्ण गोळीबार करून समोरच्या सैन्याला मोठ्या प्रमाणात नामोहरम करताना दिसली आणि आधुनिक युद्धाचे प्रतीक बनली. क्रीपिंग बराजसारख्या तंत्रांचा विकास झाला- यात पायदळाच्या हालचालींना पाठिंबा देण्यासाठी समन्वयित तोफगोळ्यांचा मारा केला जात असे. या नव्या रणनीतींनी लष्करी सिद्धांत आणि तंत्रज्ञान यांच्या एकत्रीकरणाचे महत्त्व तंत्रज्ञान विकासाच्या पार्श्वभूमीवर अधोरेखित झाले. त्याच वेळी, रासायनिक युद्धाच्या भयानक वास्तवाने युद्धाला धोकादायक आणि नैतिक वादाचा नवा पैलू दिला. क्लोरीन, फॉस्जीन आणि मस्टर्ड गॅस यांसारख्या घातक रसायनांच्या वापरामुळे नृशंस जीवितहानी झाली.

भूपृष्ठावरील युद्ध पहिल्या महायुद्धादरम्यान हवेत झेपावले. सुरुवातीला केवळ टेहळणीसाठी वापरण्यात येणारी विमाने लवकरच चकमकी आणि रणनीतीपूर्ण बॉम्बहल्ल्यांसाठी प्रभावी साधने बनली. सिंक्रोनायझेशन गिअर्ससारख्या नवकल्पनांमुळे फायटर विमानांवर मशीनगन बसवणे शक्य झाले. गोळीबारात प्रॉपेलरला इजा होण्याचा धोका टळला. संवाद प्रणालींत मोठी प्रगती झाली. वायरलेस टेलिग्राफीपासून फील्ड टेलिफोनपर्यंतच्या सुधारणांमुळे विस्तीर्ण युद्धभूमीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य झाले.

दुसऱ्या महायुद्धाने नवसंशोधनाचा वेग वाढवला. जागतिक संघर्षाची तीव्रता वाढली तशी या राष्ट्रांची संशोधन आणि विकासात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकही वाढली. या काळातील सर्वात मोठ्या तांत्रिक प्रगतींपैकी एक होती रडार तंत्रज्ञानाचा विकास आणि वापर. युद्धपूर्व प्रयोगांमधून विकसित झालेल्या रडारचे परिपक्व रूप दुसऱ्या महायुद्धात दिसले. मित्रदेशांना शत्रूच्या विमानांचे व नौदल जहाजांचे लांब पल्ल्यावरून अचूक शोध आणि मागोवा घेण्याची क्षमता रडारनेच दिली. माहितीशास्त्राचा पाया घातला गेला. ‘एनिअॅक’ (इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अॅण्ड कम्प्युटर- एठकअउ) सारख्या संगणकीय उपकरणांचा विकास, बॅलिस्टिक मिसाइलचे मार्गक्रमण निश्चित करण्यासाठी सखोल आणि गुंतागुंतीच्या कलनशास्त्रासारख्या विद्याशाखांचा विकास, सांकेतिक भाषांतर (क्रिप्टोअॅनालिसिस) आणि लष्करी पुरवठा व्यवस्थापन यांतही निर्णायक बदल झाले. ब्लेचली पार्क येथे तज्ज्ञांची एक टीम एनिग्मा कोड उलगडण्यासाठी अथक परिश्रम घेत होती. जर्मनीचे सांकेतिक संदेश उकलल्यानंतर ‘‘आपण फक्त संदेशयंत्रणा भेदली नाही, आपण युद्ध जिंकले आहे’’ हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ अॅलन टयुरिंग यांचे उद्गार इतिहासात अजरामर झाले!

दुसऱ्या महायुद्धातील विभंगरेषा म्हणजे अण्वस्त्रांचा विकास! तंत्रज्ञाचा विकास मानवतेच्या विनाशाकडे नेऊ शकतो हे सिद्ध करणारा आणि धोरणकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा आविष्कार होता. अण्वस्त्रांचे विनाशकारी सामर्थ्य जगासमोर आले आणि युद्धाच्या मूलभूत संकल्पनांबाबत नवी विचारसरणी निर्माण झाली. संघर्ष सर्वनाशाला कारण होऊ शकतो याची जाणीव होऊन राष्ट्रांनी युद्धे टाळणारी मुत्सद्देगिरी विकसित करण्यावर भर दिला. त्यातून आण्विक जरब या धोरणाचा विकास झाला. युद्धपूर्व काळातील ‘युद्ध मंत्रालया’चे नामकरण ‘संरक्षण मंत्रालय’ असे होण्यात तंत्रज्ञान बदलाची महत्त्वाची भूमिका होती. युद्धोत्तर काळात तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची शीतयुद्धाची रणनीती हीदेखील आण्विक संहाराच्या दहशतीमुळे आलेली अगतिकताच! या युद्धप्रेरित तांत्रिक क्रांतीचा केवळ नागरी जीवन सुखकर होण्यास मोठा हातभार लागला. फ्लूसारख्या संसर्गजन्य रोगांवर लसी, पेनिसिलिनसारख्या प्रतिजैविकांचे व्यावसायिक उत्पादन, प्लाझ्मा रक्तसंक्रमण प्रक्रियेचा विकास, अन्नप्रक्रिया विकास, जेट इंजिनचा शोध, संगणकाचे मूलभूत प्रारूप ही महायुद्धाच्या मंथनातून आलेली तंत्ररूपे आहेत.

तंत्रज्ञान – सक्षमक की नियंत्रक?

महायुद्धांमधील तांत्रिक नवसंशोधनांमधून एक विरोधाभास स्पष्ट होतो – लष्करी तंत्रज्ञानाने योजनाकारांना व्यापक धोरणात्मक पर्याय उपलब्ध करून दिले, तरीही परिणामांचा अंदाज बांधणे कठीण आहे. ते युद्धाच्या व्यापक राजकीय, कार्यात्मक आणि नैतिक मर्यादांवर अवलंबून असतात. तंत्रज्ञानाचे परिणाम केवळ सकारात्मक असतीलच असे नाही, तसेच तंत्रज्ञानाने विजय हमखास मिळेल असेही नाही. या दृष्टीने पाहता, तंत्रज्ञान हे युद्धसज्जतेसाठी सक्षम साधन आहे. यातून युद्धभूमीवरल्या शक्यता वाढतात; पण युद्धाचा परिणाम मात्र मानवाच्या निर्णयक्षमतेवर व युद्धनीतीवर ठरतो. याच दृष्टिकोनातून अण्वस्त्रांकडे पाहता येते- त्यांची अपरिमित विनाशक क्षमता असूनही, युद्धोत्तर काळात राजकारणात प्रत्यक्ष संघर्ष टाळण्याच्या नवनवीन रणनीतींना जन्म दिला. अस्तित्वाच्या धोक्याने मोठ्या शक्तींना थेट युद्ध टाळण्यास भाग पाडले आणि शीतयुद्धाच्या काळात शस्त्रसज्ज शांततेचा सिद्धांत उदयास आला. अण्वस्त्रांचा विध्वंसक परिणाम लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर शस्त्र नियंत्रणासाठी जागतिक एकमत निर्माण झाले, ज्यामुळे संयुक्त राष्ट्रे आणि अण्वस्त्र प्रसारबंदी करार यांसारख्या आंतरराष्ट्रीय करारांद्वारे तंत्रज्ञानाच्या प्रसारावर बंधने घालण्याचा प्रयत्न केला गेला. अशा यंत्रणांमुळे आंतरराष्ट्रीय संवादासाठी एक व्यासपीठ मिळाले. युद्धाऐवजी शांततामूलक वाटाघाटींचे मार्ग प्रभावी ठरले.

युद्धकाळातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वारसा आजच्या जागतिक राजकारणावरही प्रभाव टाकत आहे. डिजिटल क्रांती, सायबर युद्धनीती, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मानवरहित शस्त्र प्रणाली हे सर्व तंत्रज्ञानात्मक प्रवाह दोन्ही महायुद्धाच्या काळात सुरू झालेल्या संशोधनाचा पुढील टप्पा आहेत. आज तांत्रिक सामर्थ्यावरच कोणत्याही राष्ट्राची सामरिक ताकद ठरते आणि जागतिक प्रभावही जोखला जातो. मात्र, जसे हे तंत्रज्ञान युद्धकौशल्याचा विस्तार करते, तसेच ते नव्या प्रकारच्या जोखमी आणि नैतिक प्रश्नही निर्माण करते. आतापर्यंत केवळ सक्षमक म्हणून क्षमता असणारे तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमतेच्या युगात स्वत: निर्णय घेत आहे. मानवी आवाक्याबाहेर असणारी विदा विश्लेषण क्षमता, नैतिकता आणि मानवतावाद यांसारख्या मानवी घटकांचा अभाव आणि उपयोगितावादी युद्धकारण यांमुळे तंत्रज्ञान जागतिक व्यवस्थेपुढे आव्हाने निर्माण करत आहे.

आजच्या आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये या ऐतिहासिक घडामोडींचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. सामरिक युती, नियामक चौकटी आणि धोरणात्मक तत्त्वे हे आधुनिक जागतिक व्यवहाराचे अविभाज्य घटक बनले आहेत. नावीन्यपूर्ण तांत्रिक आविष्कारांनी केवळ युद्धतंत्रच बदलले नाही, तर सत्ता आणि प्रभाव यांची व्याख्याही नव्याने विकसित केली. भविष्यातील तंत्रज्ञान आणखी वेगाने विकसित होत असताना, इतिहासातील महायुद्धांनी शिकवलेले धडे आजच्या धोरणकर्त्यांसाठी आणि संशोधकांसाठी मार्गदर्शक आहेत. इसापनीतीतील मृत वाघ आणि मांत्रिकाची गोष्ट आठवत असेलच : मांत्रिक सामर्थ्याने वाघ जिवंत झाल्यानंतर भुकेने व्याकूळ त्या वाघाने पहिल्यांदा जीवनदात्याचाच फडशा पाडला होता. मंत्र-तंत्र विद्योपेक्षा व्यवहारज्ञान शिकविणारी ती कथा… धोकादायक तंत्रज्ञानाचा वाघ जिवंत होण्यासाठी आसुसलेला आहे. त्याची प्राणप्रतिष्ठा करण्याचे तंत्र अवगत असलेलेही बाह्या सरसावून सज्ज आहेत. बाकी सुज्ञांस वेगळे सांगण्याची गरज नाही…

पंकज फणसे

तंत्रज्ञान आणि राजकारण यांच्या अंत:संबंधाचे विद्यापीठीय संशोधक

phanasepankaj@gmail.com

Story img Loader