‘‘समर शंख फूंक दो, कटप्पा,’’ नेतृत्वाने ललकारी दिल्याबरोबर दोन्ही बाजूंनी प्रचंड त्वेषाने आदळणारे सैन्यदलाचे प्रचंड लोंढे हे आपल्या कल्पनेतलं युद्धाचं सर्वसाधारण चित्र! काळाच्या ओघात शस्त्रे बदलत गेली, रणमैदानाची व्याप्ती महासागरापासून अवकाशापर्यंत पोहोचली, आणि शस्त्रकुशलतेपेक्षा शास्त्रकुशलता निर्णायक झाली. याआधी आपण युद्धामुळे तंत्रज्ञानाची बदलणारी वाटचाल, खासगी घटकांचा शिरकाव आदी बाबींचा परामर्श घेतला. या लेखात तंत्रज्ञानामुळे युद्धांचे स्वरूप, हेतू आणि साध्य यांच्यावर कसा परिणाम झाला हे पाहू!

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांना अमेरिकेच्या प्रत्यक्ष सहभागासाठी मनधरणी करावी लागली. अटलांटिक ओलांडून युरोपच्या भूमीवर पाय ठेवून लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यासाठी सामान्य अमेरिकन नागरिकांच्या नजरेत युद्धाची निकड दिसणे गरजेचे होते. शीतयुद्धाच्या काळात काही अपवाद वगळता अमेरिका आणि रशिया या दोन्ही महासत्तांनी बसल्या जागी इतर देशांतील ठिणग्यांनी डवरलेल्या परिस्थितीवर आधुनिक शस्त्रास्त्रांचे पलिते फेकले. कधी सरकारे बदलली तर कधी विरोध करणाऱ्या नेतृत्वाचा सैन्य उठाव, नियंत्रित हल्ले वगैरे प्रकारे परस्पर काटा काढला. म्हणजेच युद्ध तर करायचे मात्र नामानिराळे राहायचे हा आधुनिक शस्त्रास्त्रांमुळे झालेला पहिला बदल! त्यातूनच पुढे जाऊन जर सरकारे कह्यात येणार नसतील तर देशांतर्गत बंडखोरांची मोट बांधून त्यांना खतपाणी घालणे हा संघर्षांचा पुढचा टप्पा! यातूनच मॅक्स वेबरने सांगितल्याप्रमाणे हिंसेचा लोकमान्य वापर करण्यावर शासनाची असलेली एकाधिकारशाही नष्ट होऊन अशासकीय घटकांचा अंतर्भाव युद्धनीतीत झाला. अफगाणिस्तान हे या नवीन युद्धतंत्राचे सर्वात उत्तम उदाहरण! १९७९ साली सोविएतने केलेल्या काबूलवरील आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने इस्लामी मूलतत्त्ववाद्यांना गोंजारून दहशतवादाचा राक्षस उभा केला. आणि या खासगीकरणाचा सर्वात आधुनिक टप्पा म्हणजे प्रत्यक्ष खासगी सैन्यदलांची उभारणी.

खासगी सैन्यदल आणि उथळ मोहिमा

सद्या:स्थितीत येमेन, सुदान, इराक अशा बऱ्याच अशांत क्षेत्रात संघर्षाची अमेरिका आणि रशियाच्या खासगी सैन्यदलांद्वारे हाताळणी होत आहे. या खासगी सैन्याकडून केवळ सशस्त्र संघर्षच नव्हे तर रसदपुरवठा, प्रशिक्षण आणि हेरगिरीसारखी कामेही केली जातात. आधुनिक शस्त्रांमुळे युद्धे लढण्यात आलेली सुलभता, उत्पादनतंत्राच्या प्रगतीमुळे खासगी क्षेत्रांकडे कललेले रसदपुरवठ्याचे स्राोत, सामान्य तज्ज्ञांपासून विशेषज्ञांकडे गेलेला युद्धशास्त्राचा प्रवास आणि खासगी क्षेत्राची अपरिहार्यता तसेच हेरगिरीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर असणारे अवलंबित्व या सर्व घटकांमुळे या खासगी सैन्याचा युद्धावर वरचष्मा राहण्यास मदत झाली. तसेच खासगी सैन्यामुळे संसदेची मान्यता घेण्यासारख्या किचकट गोष्टीची गरज राहत नाही. सीआयएच्या फसलेल्या क्युबावरील आक्रमणानंतर अमेरिकेची जी नाचक्की झाली होती तशी गत होण्यापासून खासगी सैन्यदल वाचवते आणि कमी पगारात सैन्याचे नियंत्रण करून लष्करी मोहिमेचा खर्चदेखील वाचतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रोन्स आणि इतर हवाई हल्ल्यांचा झालेला परिणाम म्हणजे बंडखोरीविरोधातील लढाईचे स्वरूप बदलून गेले. व्हिएतनाम युद्ध अमेरिकेच्या सैन्यदलाच्या युद्धभूमीवर प्रत्यक्ष वावर, नागरिकांचे मतपरिवर्तन करण्यावर असलेला भर आणि हस्तक्षेपानंतरच्या शासनाला लोकमान्यता मिळवून देणे ही आक्रमकांची प्राथमिकता होती. मात्र अफगाणिस्तानचा विचार करता असे दिसून येईल की ड्रोन्स आणि स्वयंचलित क्षेपणास्त्रांमुळे प्रत्यक्ष युद्धभूमीवर उपस्थित राहण्यापेक्षा सर्जिकल स्ट्राइक करून विरोधातील नेतृत्व संपविण्यावर आता या महाशक्तींचा भर राहिलेला आहे. यामुळे दहशतवादविरोधी लढ्याचा भर संरचनात्मक उपायांऐवजी प्रतिशोधात्मक, तात्कालिक आणि संहारक मार्ग अवलंबकडे सरकलेला दिसतो.

मेरी काल्डोर या अभ्यासकांनी आपल्या ‘न्यू अँड ओल्ड वॉर्स: ऑर्गनाइज्ड व्हायलन्स इन अ ग्लोबल एरा (१९९९)’ या पुस्तकांत युद्धांच्या बदलणाऱ्या शैलीचे विवेचन केले आहे. शीतयुद्धानंतरचे संघर्ष पारंपरिक राज्य-विरुद्ध-राज्य या धाटणीपेक्षा मूलभूतपणे वेगळे आहेत. ही ‘नवीन युद्धे’ अस्मितेच्या राजकारणावर, मोठ्या प्रमाणावर विखुरलेले स्वरूप आणि हिंसेच्या खासगीकरणावर आधारित आहेत. आयसिससारख्या संघटनांनी समाजमाध्यमांचा वापर करून जगभर पसरविलेले नेटवर्क, त्यातून होणारी स्वयंसेवकांची भरती आणि निधी उभारणी हे या विकेंद्रीकरणाचे एक उदाहरण! समाजमाध्यम, लक्ष्यनिर्धारित जाहिराती वगैरे डिजिटल आविष्कारांमुळे अस्मिता चेतवणे आणि तिला संघर्षाचे स्वरूप देणे हे सुकर झाले आहे. थोडेसे विषयांतर करून, सध्याचे महाराष्ट्राचे वातावरण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की एका चित्रपटामुळे महाराष्ट्राचे राजकीय क्षितिज वेठीस धरले जाईल एवढ्या आपल्या अस्मिता पोकळ झाल्या आहेत आणि समाजमाध्यमांची ही परिस्थिती चिघळण्यात महत्त्वाची भूमिका आहे. याच अनुषंगाने पुढे जाऊन आपल्याला असे आढळून येईल की प्रत्यक्ष सीमेवर लढली जाणारी युद्धे आता नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनली आहेत. आपल्या मोबाइलच्या पडद्यावर येणारी माहिती एका मोठ्या स्वरूपात नागरी समाजाचे नियंत्रण करते आणि आपल्या इशाऱ्यावर ती जनतेला नाचवते. कधी निवडक माहिती दाखवून तर कधी सत्याचा विपर्यास करून! शस्त्रांचा वार करण्याची प्राथमिकता शरीरावरून मनावर आलेली आहे. यामुळे युद्धाचे हिंसक, रक्तलांच्छित, घृणास्पद स्वरूप जाऊन त्याला पांढरपेशी स्वरूप आलेले आहे आणि वार करणारा अदृश्य राहिल्यामुळे संदिग्धतेचा फायदा घेणे हे नवीन युद्धनीतीचे वैशिष्ट्य बनले आहे. त्यामुळे सीमेपलीकडून सामान्यांचे डिजिटल माध्यमांतून होणारे नियंत्रण सामाजिक सलोख्यास नख लावून अंतर्गत यादवी चिघळवण्यास हातभार लावते तर देशांतर्गत घटकांकडून अस्मितेचे राजकारण करून जगण्याशी निगडित प्रश्नांवरून सामान्यांना भरकटविले जाते.

घातक स्वयंचलित शस्त्र प्रणाली

घातक स्वयंचलित शस्त्र प्रणाली (लिथल ऑटोनॉमस वेपन सिस्टीम – LAWS) हा तंत्रज्ञानाचा आतापर्यंतचा सर्वोच्च लष्करी आविष्कार आहे. एआय, मशीन लर्निंग, फेशिअल रेकग्निशन या तंत्रांचा वापर करून आकारास आलेली ही प्रणाली लक्ष्यनिर्धारण, धोक्याचे मूल्यांकन आणि प्रत्यक्ष हल्ला करण्यास वापरली जाते. अचूकता आणि स्वप्नवत वेग हे या प्रणालीचे वैशिष्ट्य! आधी शस्त्र, मग संहार आणि व्यापकता आणि आता प्रत्यक्ष नियंत्रण अशी तंत्रज्ञानाची युद्धातील भूमिका उत्क्रांत झाली आहे. मात्र इस्रायलच्या हॅब्सोरा एआय सिस्टीमने गाझातील एक नागरी इमारत ‘हमास कमांड सेंटर’ म्हणून चिन्हांकित केली आणि त्यानंतर केलेल्या हवाई हल्ल्यात ४२ नागरिक मृत्यू पावले. नंतरच्या तपासात, इमारतीत कोणतेही सैनिक उपस्थित नव्हते असे निष्पन्न झाले. युद्धात अशा अनेक त्रुटींचा आणि एआयचा वापर करताना बरच प्रश्न उपस्थित होतात. न्याय्य युद्ध सिद्धांतानुसार युद्धात नागरी आणि लष्करी लोकसंख्येतील भेद आणि प्रमाणता म्हणजेच कमी हिंसेत महत्तम यश या दोन पैलूंचे भान राखणे गरजेचे आहे. मात्र एआयमध्ये अंतर्भूत असलेल्या धर्म, वंश, वर्ण या पूर्वग्रहांमुळे या प्रणालींनी माणसाला माणूस म्हणून किंमत देण्यास नकार दिला आहे. ड्रोनसारख्या युद्धक्षेत्रांपासून दूरवर नियंत्रण करण्याच्या कौशल्यामुळे हल्ला करण्याची मानसिकता व्हिडीओ गेम खेळण्यासारखी झाली. पीडितांच्या वेदना, रक्तपात नजरेस न पडल्यामुळे नियंत्रकांचे यांत्रिकीकरण होत आहे. तर मानवी भावना, करुणा, एखाद्या गोष्टीचा संदर्भ लक्षात न घेण्याची क्षमता (उदा.- प्रार्थनेच्या वेळी हल्ला) वगैरे कमतरतेमुळे लिथल ऑटोनॉमस वेपन सिस्टीमप्रणीत युद्ध अधिक हिंसक होत आहे. डोना हॅरावे या अभ्यासकांनी मानव आणि यंत्रे यांच्या मिश्रणातून सायबोर्ग ही मानवी मूल्यविरहित नवी प्रजाती उदयास येईल असे भाकीत वर्तविले होते. मानवी सहभागाशिवायची ही युद्धे मानवाच्या जगण्यात मानवोत्तरवाद (Posthumanism) उदयास येत आहे याचे द्याोतक आहेत.

एखाद्या गोष्टीत गुंतत गेलो की कुठे थांबावे हे समजणे सत्ता आणि संपत्तीसोबत अवघड होत जाते. काही तरी नवीन, संहारक, अनिश्चित घटनेची ही तर सुरुवात आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर सक्रिय झालेली ‘तंत्र-युद्ध’ युती केवळ ७० वर्षांत मानवोत्तर जगाच्या वळणावर उभी आहे.

तंत्रज्ञान आणि राजकारण यांच्या अंत:संबंधाचे विद्यापीठीय संशोधक

phanasepankaj@gmail.com

Story img Loader