वारिस पंजाब दे’ या संघटनेच्या वतीने त्यांच्या एका कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी नुकताच पंजाबमध्ये अमृतसरजवळील अजनाला पोलीस ठाण्यावर तलवारी आणि बंदुका घेऊन ‘मोर्चा’ नेण्यात आला. या मोर्चाला प्रतिबंध करण्याच्या फंदात पंजाब पोलीस पडलेच नाहीत. याचे एक कारण म्हणजे, काही मोर्चेकऱ्यांनी पोलिसांसमोर गुरू ग्रंथसाहिबची ढाल केली, असे खुद्द तेथील पोलीस महासंचालकच सांगतात. गुरुवारी मोर्चाचे ऊग्र रूप पाहून शुक्रवारी संबंधित कार्यकर्त्यांला सोडूनही देण्यात आले. यानिमित्ताने ‘वारिस पंजाब दे ’ ही संघटना आणि तिचा नेता अमृतपाल सिंग हे पुन्हा चर्चेत आले. हे गृहस्थ जाहीरपणे स्वत:ला जर्नेलसिंग भिंद्रनवालेचे शिष्य मानतात. तोच तो भिंद्रनवाले, जो ऑपरेशन ‘ब्लू स्टार’ कारवाईत मारला गेला. अजनाला पोलीस ठाण्यावर गेलेल्या मोर्चाच्या अग्रस्थानी अमृतपाल सिंग होता. पंजाबमधील सुरक्षा यंत्रणा अमृतपालचे वर्णनही ‘भिंद्रनवाले २.०’ असे करतात. भिंद्रनवालेच्या स्वप्नातले ‘खालसा साम्राज्य’ पंजाबमध्ये पुनस्र्थापित करणे हे अमृतपालचे ध्येय. याचा तो जो कोण लव्हप्रीत सिंग नामे कार्यकर्ता होता, त्याला अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यासाठी अटक झाली होती. निव्वळ पोलीस ठाण्यावर सशस्त्र मोर्चा आला म्हणून, अशा व्यक्तीला पंजाब पोलीस, पंजाब प्रशासन आणि मुख्य म्हणजे तेथील ‘आप’ सरकारने सोडून दिले. असे कितीतरी कार्यकर्ते वेगवेगळय़ा कारणांसाठी पंजाबमधील इतर तुरुंगांमध्येही असतील. त्यांच्या बाबतीतही असेच धोरण अनुसरणार काय, हे स्पष्ट झाले तर बरे होईल. सुटकेचे हे ‘अजनाला प्रारूप’ पंजाबमध्ये आणि देशातही इतरत्र सुरू झाल्यास त्याबाबत काय करणार, हे जरा केंद्रीय पातळीवरूनही स्पष्ट होणे अनाठायी नाही. ‘धर्मयोद्धय़ां’ना हात लावण्याचे कामच नाही, हा तेजस्वी विचार अजनाला आणि पंजाबबाहेर झिरपला, तर त्याबद्दल उत्तरदायी कोणाला ठरवायचे हा खरा मुद्दा आहे. सत्तेवर येण्यासाठी किंवा सत्तास्थानाला चिकटून राहण्यासाठी धर्मवेडय़ा विषवल्लीचा आधार घेतला, किंवा तिच्या वाढीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले तर ही वल्ली मूळ वृक्षालाच लपेटून त्याचा नाश करणे अशक्य नाही हा विचार हल्ली बहुतांच्या मानसाला स्पर्शत नाही.
‘वारिस पंजाब दे’ ही संघटना स्थापन करताना संस्थापक संदीप सिंग ऊर्फ दीप सिद्धू याने सामाजिक सुधारणांचा दाखला दिला होता. दिल्लीच्या सीमेवर सिंघू येथे झालेल्या शेतकरी आंदोलनात त्याचा सहभाग होता. दोन वर्षांपूर्वी २६ जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर शीख निशाण फडकवल्यानंतर दीप सिद्धू राष्ट्रीय माध्यमांच्या चर्चेत आला. पुढे त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात त्याने ‘वारिस पंजाब दे’ म्हणजेच पंजाबचे वारस ही संघटना स्थापन केली. आपण केवळ सामाजिक सुधारणांवर भर देणार असल्याचे सांगूनही प्रत्यक्षात त्याने शिरोमणी अकाली दल (अमृतसर) गटाचे खलिस्तानवादी नेते सिमरनजीत सिंग मान यांच्यासाठीच प्रचार केला. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रचारादरम्यान दीप सिद्धूचा अपघाती मृत्यू झाला आणि पुढे सप्टेंबर महिन्यात अमृतपाल सिंगने या संघटनेची सूत्रे हाती घेऊन तिला अधिक जहाल आणि विभाजनवादी बनवले. जर्नेलसिंग भिंद्रनवालेसारखाच पेहराव करणारा अमृतपाल सुरुवातीपासूनच केंद्रातील सरकारविषयी तुच्छतेने बोलतो. संघटनेच्या उद्दिष्टांसाठी हिंसाचाराच्या मार्गाला आदर्शवत मानतो आणि स्वतंत्र खालसा राज्याचे जाहीर समर्थन करतो. पंजाबमधील गावागावांमध्ये जाऊन युवकांना ‘अमृतधारी’ किंवा पवित्र शीख बनवण्याचा त्याचा मनसुबा आहे. अजनाला प्रसंगानंतर त्याच्या कोणत्याही कृतीला पोलीस किंवा प्रशासनाकडून अटकाव होणार नाही याची खात्री पटल्यामुळेच अमृतपाल अधिक शिरजोर बनू शकतो.
ही परिस्थिती विचित्र आणि धोकादायक ठरते. खलिस्तानवादी विभाजनवादी पर्वानंतर पंजाबमध्ये मध्यंतरीच्या काळात शांतता आणि समृद्धी होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या सीमावर्ती राज्यात युवकांमध्ये फैलावणाऱ्या अमली पदार्थ सेवनाची समस्या उग्र बनली आहे. अकाली दल, काँग्रेसच्या सरकारांनी तिच्या निराकरणाकडे हवे तितके लक्ष दिले नाही. आम आदमी पक्षाचे विद्यमान सरकारही त्याबाबत बेफिकीर आहे. रोजगार, कृषी उत्पन्नाच्या घटत्या पर्यायांमुळे पंजाबमधील युवक अमली पदार्थाच्या कच्छपि लागला होता. आता या मोठय़ा वर्गाला अमृतपाल सिंगच्या धर्माधतेची भुरळ पडणारच नाही याची खात्री कोणी द्यावी? केंद्रात सशक्त नेतृत्वाचे सुस्थिर सरकार असूनही याआधीची खलिस्तानवादी चळवळ फोफावली होती, याचे भान विद्यमान नेतृत्वाने ठेवलेले दिसत नाही. काँग्रेस, ‘आप’ नेतृत्वाला पंजाबमधील ताज्या फुटीर वाऱ्यांचे गांभीर्य कळालेले नाही आणि ज्या राज्यात आपले सरकार नाही तेथील समस्यांचे आपण पालक वा निवारकही नाहीच, अशी भाजपची धारणा आहे. नवीन युगाच्या परिभाषेत ‘२.०’ म्हणजे अधिक सुधारित प्रारूप. मूळ भिंद्रनवालेच काय होता हे सर्वज्ञात आहे. त्याची ‘सुधारित’ आवृत्ती काय असेल, हेही जेव्हा कळेल तो सुदिन!