योगेंद्र यादव
आपल्या मुलांना पाश्चात्त्य देशांतले इंग्रजी बालवाङ्मय वाचायला देऊन आपण त्यांच्यावर अन्यायच करतो आहोत, हे इथल्या ‘डॅडी-मम्मीं’ना कधी कळणार?
‘रूपा हत्तिणी’ची गोष्ट आठवते? प्राणिसंग्रहालयात या रूपाकडे कुणीच पाहात नसे. आपण किती कुरूप आहोत, असेच तिला वाटे. मग काय झाले? तिच्या साऱ्या प्राणिमित्रांनी तिचे दु:ख दूर करायचे ठरवले. वाघाने आपल्या अंगावरले पट्टे तिला दिले, बिबळय़ाने ठिपके तिच्या अंगावर चढवले, पोपटाने आपला रंग देऊन रूपाची शेपटी हिरवी-ताजी केली आणि मोराने तर पिसाऱ्यावरले सगळे रंग तिच्या सोंडेला बहाल केले! पण प्राणिसंग्रहालयात येणारी मुले म्हणू लागली, रूपाचे हे नवे रंगीबेरंगी रूप असे कसे उसने? त्यापेक्षा आपली जुनी रूपा किती छान होती! रूपाला आनंद झाला, आत्मविश्वास आला.. प्राण्यांना ती म्हणाली, घ्या रे मित्रांनो, आपापले रंग परत! तसेच झाले. आता रूपा आनंदी असते.
‘नॅशनल बुक ट्रस्ट’ने प्रकाशित केलेल्या एका पुस्तकातली ही रूपा हत्तीण परवा दिल्लीच्या ‘विश्व पुस्तक मेळय़ाला मी भेट दिली तेव्हा पुन्हा आठवली! माझी मुले लहान असताना त्यांची आवडती होती ही रूपा. माझी सहचरी मधुलिका बॅनर्जी आणि मी, आमच्या मुलांना आपापल्या भाषा आल्याच पाहिजेत अशा विचाराचे असल्याने मी हिंदूी पुस्तके आणत असे. तेव्हा मला हिंदूीत बालवाङ्मयाची कशी नि किती कमतरता आहे हे जाणवू लागले. पाठय़पुस्तके, अभ्यासपूरक पुस्तके किंवा कंटाळवाणी उपदेशपर पुस्तके यांची रेलचेल असायची, गोष्टीचे नवे पुस्तक मागितल्यावर पुराणकथा किंवा पंचतंत्र, विक्रम-वेताळ किंवा अकबर-बिरबल या माझ्याही लहानपणापासूनच्याच पुस्तकांचा गठ्ठा समोर यायचा. अशा काळात ‘अमर चित्रकथां’नी जरा तरी रंग भरले. चम्पक, पराग, नंदन आणि लोटपोट ही बाल-मासिके, फॅण्टम कॉमिक्स किंवा मग ‘मोल्दावियातील शरदामधले दिवस’ वगैरे कथांची सोव्हिएत पुस्तके माझ्याही लहानपणी मिळत. ती आजच्या पिढीतल्या मुलांना भावणार नाहीत, हा सार्वत्रिक अनुभव मलाही येत असे. इंग्रजीत छान दिसणारी, निगुतीने छापलेली रंगीबेरंगी बालपुस्तके भरपूर असताना भारतीय भाषांमध्ये असे दुर्भिक्ष का, असा प्रश्न पडत असतानाच टीव्हीवर कार्टून वाहिन्यांचा धुमाकूळ सुरू झाला होता.
अर्थात अशाही काळाला अपवाद होते.. ‘चिल्ड्रेन्स बुक ट्रस्ट’ होता आणि ‘नॅशनल बुक ट्रस्ट’सुद्धा रूपा हत्तिणीसारख्या कथा देत होता, पुढे तर ‘कराडी टेल्स’ हिंदूीत गुलजार यांच्या आवाजात ऐकण्याची सोय झाली ‘राजा कापी’ किंवा ‘बोस्की का पंचतंत्र’ मुलांप्रमाणेच मलाही आवडून गेले. कमला भसीन यांची ‘मालू भालू’ची गोष्टही अशीच पिढय़ांमधले अंतर मिटवणारी. शिवाय कथा, तूलिका बुक्स आणि प्रथम यांनीही काही पुस्तके काढली. मध्य प्रदेशातील ग्रामीण-आदिवासी मुलांच्या विज्ञानशिक्षणासाठी उत्तम प्रयत्न करणाऱ्या ‘एकलव्य’ने काढलेले ‘भालू ने खेली फुटबॉल’सारखे पुस्तक उत्कृष्ट ठरले.
मराठी वा बंगालीतले माहीत नाही, पण हिंदूी बालवाङ्मय मात्र गेल्या काही दशकांपासून इंग्रजीच्या तुलनेत मागासलेलेच आहे. इंग्रजीत ‘सिल्व्हेस्टर ॲण्ड द मॅजिक पेबल’, ज्युलिया डोनाल्डसन यांचे ‘ग्रूफालो’ किंवा डोनाल्डसन आणि शेफ्लर यांनी लिहिलेली-चितारलेली अन्य पुस्तके (ही माझी आजही शिफारस!) हे सारे किती रंगीत, आकर्षक आणि किती नवे! तसे काही हिंदूीत मिळण्यासाठी शोधाशोध करावी लागते, अर्थात अरिवद गुप्ता यांच्या संकेतस्थळावर जागतिक बालवाङ्मयाचा खजिनाच वाचता येतो, तोही लक्षणीय.
हॅरी पॉटर हवा की रूपा हाथी?
मुले थोडी मोठी होऊ लागल्यावर तर किशोरवाङ्मयाचा इंग्रजीतला सुकाळ अधिकच जाणवतो. हिंदूीतल्या चाचा चौधरीपेक्षा टिनटिन मोठीच मजल मारतो. एनिड ब्लायटनच्या ‘फेमस फाइव्ह’ची जागा मराठीत शकुंतला परांजपे यांच्या कधीकाळच्या ‘सवाई सहां’नी घेतली होती की नाही कोण जाणे.. आणि जे. के रोलिंग यांच्या ‘हॅरी पॉटर’ने तर जणू भारतातल्या साऱ्याच शहरांतल्या मुलांना होग्वार्टमध्ये नेऊन सोडले.. त्या पॉटरदिग्विजयापुढे भारतीय भाषा हतबलच ठरल्या, ही जाणीव मला पोखरते.
आज दोन दशकांनंतर तरी स्थिती काय आहे? विश्व पुस्तक मेळय़ातल्या बालवाङ्मय दालनात फिरलो, तेव्हा धंदेवाईक प्रकाशक खूपखपाऊ इंग्रजी पुस्तके किंवा त्यांची हिंदूी भाषांतरेच विकताना दिसले. मधल्या काळात इंग्रजी शाळा वाढल्या, त्या भारताच्या गावोगावी.. पण हे इंग्रजी बालवाङ्मय, किशोरवाङ्मय इंग्रजीत असले तरी भारतीय का नाही? बरे, इंग्रजीच पुस्तके विकत घेणाऱ्यांकडे ऐपत असते आणि हिंदूी पुस्तके विकत घेण्यासाठी ऐपत नसते, असे काही आहे काय?
पुस्तके महाग होण्याचे एक कारण म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील (चिल्ड्रेन्स बुक ट्रस्ट, नॅशनल बुक ट्रस्ट आदी) प्रकाशकांचे ओसरणे. वास्तविक या प्रकाशकांनी जुनीच- गिजूभाई बधेकांची, अरिवद गुप्तांची वा ‘रूपा हाथी’सारखी पुस्तके पुन्हा छापली तरी भलेच होईल. पण तेही होत नाही.
.. हिंदूीचा ‘पिटारा’ समृद्धच!
अशा वेळी बिगरसरकारी, पण बिगर-धंदेवाईक क्षेत्राकडेच पाहावे लागणार. त्या क्षेत्राला अर्थसाह्य मिळाले तर काही चांगले घडू शकते, याची साक्ष मध्य प्रदेशच्या ‘एकलव्य’ने उपलब्ध केलेल्या पुस्तक-पेटाऱ्याने पटवली! हिंदूीतला हा ‘पिटारा’ गोष्टीची, माहितीपर, कवितांची, शैक्षणिक अशी हरप्रकारची पुस्तके एकगठ्ठा देणारा. टाटा ट्रस्ट आणि नीलेकणी यांच्या अर्थसाह्यामुळे हा पुस्तकसंच परवडणाऱ्या किमतीचा आहे. मुळात ‘एकलव्य’चे हसत-खेळत विज्ञान-शिक्षणाचे कार्य अनुकरणीयच. त्यांचे ‘चकमक’ हे नियतकालिकही चांगले असते. याखेरीज ‘प्रथम’नेदेखील आता २२ भारतीय भाषांमध्ये बालपुस्तके उपलब्ध केली आहेत.
मध्य प्रदेशातलीच, भोपाळमधली आणखी एक संस्था आहे- ‘एकतारा’. या संस्थेचे ‘सायकल’ हे बाल-कुमार नियतकालिक दर दोन महिन्यांतून एकदा येते, हे मी ऐकून होतो. ते मी पाहिले होते. पण एवढी पुस्तकेही त्यांनी प्रकाशित केली असल्याचे विश्व पुस्तक मेळय़ात पाहिले आणि मी हरखूनच गेलो. हिंदूीत जे जे असावेसे मला वाटे, ते ते इथे होते.. सर्वेश्वरदयाल सक्सेना यांची ‘बतूता का जूता’ इथे मुलांसाठी चित्रमय होऊन आली होती, गुलजार यांची अनेक पुस्तके होती आणि त्यांवर एलेन शॉ यांची चित्रेसुद्धा होती. हिंदूीतले महत्त्वाचे लेखक विनोदकुमार शुक्ल यांनी बालपुस्तकांची मालिकाच लिहिली आहे, तीही ‘एकतारा’साठीच. या पुस्तकांचे आकारही निरनिराळे.. ‘टके थे दस’ हे छोटुसे पुस्तक, तर काही पुस्तके दोन इवल्या हातांत मावणार नाहीत एवढी! चित्रे, गोष्टी, कविता, चित्रकथा, बालकादंबरिका.. भिंतीवर/ दारामागे लावता येतील अशा पोस्टर आणि कार्ड स्वरूपातही इथे बालकुमार वाङ्मय मिळत होते. हिंदूीविषयीचे माझे प्रेम इथे भरून पावले.
आधुनिक भारताच्या संस्कृती-सभ्यतेचे अपयश कोणते, असे जर मला कोणी विचारले तर गरिबी/ पर्यावरणाचा ऱ्हास/ स्वच्छतागृहांची आबाळ आदी उत्तरांच्याही आधी माझे पहिले उत्तर असेल- बालकुमार वाङ्मयाचा दुष्काळ! ‘विश्व पुस्तक मेळय़ा’त हिंदूी बालकुमार वाङ्मयाबद्दल मला जे आशादायक चित्र दिसले, ते प्रातिनिधिक म्हणावे की नाही आणि त्यामुळे ‘दुष्काळा’ची तक्रार थांबवावी का, हे मला इतक्यात ठरवता येणार नाही, कारण प्रश्न या चांगल्या प्रयत्नांना सर्वदूर चांगला प्रतिसाद मिळतो का (की फक्त विश्व पुस्तक मेळय़ातच त्यांचे अस्तित्व दिसते) हादेखील आहे. तरीदेखील ही पुस्तके आहेत, हे आशादायीच. यामागची आशा कोणती? तर, आपल्या मुलांना पाश्चात्त्य देशांतले इंग्रजी बालवाङ्मय वाचायला देऊन आपण त्यांच्यावर अन्यायच करतो आहोत, हे इथल्या ‘डॅडी-मम्मीं’ना कधीतरी कळेल आणि एकलव्य, प्रथम, इकतारा यांच्यासारखे प्रयत्न फळास येतील, याची आशा! आजच्या पिढीसाठी भारतीय जीवनानुभवावर आधारित चांगली भारतीय पुस्तके तयार आहेत.. पिढी निघून जाण्याआधी आपण ही पुस्तके पाहणार की नाही?