आज कोणत्या विषयावर लेख लिहावा असा प्रश्न पडला होता. म्हणजे विषय संपले असं नव्हे. झालं असं आहे की काल गुडफ्रायडे होता, उद्या ईस्टर संडे आहे आणि आज ग्रीष्म ऋतू चालू झाला. ‘काळाचे गणित’ आणि या सगळ्या घटना यांचा अगदी जवळचा संबंध. त्यामुळे यांपैकी एखाद्या गोष्टीवर लेख लिहावा असा विचार मनात आला खरा. पण तिथींबाबत चर्चा पुढे चालू ठेवणं अधिक योग्य असं वाटलं. त्यामुळे, आजही तिथींचाच ऊहापोह. अर्थात, या गोष्टींविषयी यथावकाश लेख लिहूच.
दिनदर्शिकेत दाखवलेली तिथी आणि आपण त्या दिवशी करतो तो उपवास किंवा साजरा करतो तो सण यांचं गणित अनेकदा जुळत नाही. आणि आपण बुचकळ्यात पडतो. उदाहरणार्थ, १४ जून या तारखेला दिनदर्शिकेत ‘संकष्टी चतुर्थी’ असा उल्लेख आढळतो. पण त्याच दिवशी ‘ज्येष्ठ कृष्ण तृतीया’ असाही उल्लेख आहे! हा काय प्रकार आहे? तृतीयेलाच संकष्टीचा उपवास?
किंवा ६ ऑक्टोबर या दिवशी ‘कोजागरी पौर्णिमा’ असा उल्लेख दिनदर्शिकेत आहे. पण तिथे बाजूलाच ‘आश्विन शुक्ल चतुर्दशी’ असाही उल्लेख आहे. म्हणजे पौर्णिमेच्या आधीच पौर्णिमा?
‘तिथी’ ही संकल्पना नीट समजून घेतली म्हणजे हे आणि असे सगळे गोंधळ अगदी क्षणार्धात दूर होतील. आज तेच करू.
सूर्य आणि चंद्रामधलं कोनीय अंतर हा एकमेव निकष वापरून ‘तिथी’ या संकल्पनेची व्याख्या केली आहे. त्यांच्यात ० अंश अंतर झालं, अमावास्या संपली, कृष्णपक्ष संपला, शुक्लपक्ष सुरू झाला. मग पुढे प्रत्येक १२ अंश अंतराला एक तिथी. याप्रमाणे अंतर १८० अंश झालं. पौर्णिमा संपली, शुक्लपक्षही संपला आणि कृष्णपक्ष सुरू झाला.
म्हणजे अमावास्या काय, पौर्णिमा काय किंवा अन्य कोणती तिथी काय ही रात्रीच संपली पाहिजे असं काही नाही. कोणतीही तिथी ही दिवसा, रात्री कधीही संपू शकते.
उदाहरणार्थ हा लेख जर तुम्ही संध्याकाळी ६ वाजून २२ मिनिटं व्हायच्या आधी वाचत असाल तर तुम्ही तो चैत्र कृष्ण षष्ठीला वाचत आहात. पण हेच जर तुम्ही तो त्यानंतर वाचत असाल तर तुम्ही तो चैत्र कृष्ण सप्तमीला वाचत आहात. कारण संध्याकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी चैत्र कृष्ण षष्ठी संपली आणि चैत्र कृष्ण सप्तमी सुरू झाली!
त्यामुळे ‘आज तिथी कोणती?’ हा प्रश्नच एका अर्थाने गैरलागू आहे. ‘आत्ता तिथी कोणती?’ हा अधिक नेमका प्रश्न झाला. पण कोणत्याही दिवसाला, वाराला, तारखेला एखादी तरी तिथी ठरवून देता यावी म्हणून पंचांगकर्त्यांनी एक संकेत ठरवला आहे. त्या संकेतानुसार /त्या दिवशीच्या सूर्योदयी जी तिथी असेल ती त्या दिवसाची तिथी असं मानतात/. म्हणजे समजा आज सूर्योदय झाला तेव्हा शुक्ल नवमी तिथी होती. सूर्योदयानंतर दोन मिनिटांनी ती संपली आणि शुक्ल दशमी तिथी सुरू झाली तरी आजची तिथी शुक्ल नवमीच!
आता ती गोंधळ निर्माण करणारी उदाहरणं आपण पाहू. १४ जून रोजी सूर्योदयाच्या वेळेस होती ज्येष्ठ कृष्ण तृतीया. त्यामुळे त्या दिवसाची तिथी, अर्थातच, तृतीया. पण दुपारी ३ वाजून ४७ मिनिटांनी ज्येष्ठ कृष्ण तृतीया संपली. आणि कृष्ण चतुर्थी, अर्थात, संकष्टी चतुर्थी चालू झाली. त्या दिवशी चंद्रोदय झाला तेव्हा, अर्थातच, कृष्ण चतुर्थी होती. त्यामुळे जरी त्या दिवसाची तिथी कृष्ण तृतीया असली तरी संकष्टीचा उपास त्याच दिवशी करावा लागणार.
किंवा ६ ऑक्टोबरला सूर्योदयसमयी तिथी होती आश्विन शुक्ल चतुर्दशी. त्यामुळे त्या दिवशीची तिथी, अर्थातच, चतुर्दशी. पण ती दुपारी १२ वाजून २४ मिनिटांनी संपली आणि पौर्णिमा सुरू झाली. त्यामुळे त्या दिवशी ‘उगवला चंद्र पुनवेचा’ अशी स्थिती असणार. आणि म्हणून आटीव, केशर-बदाम घातलेलं दूध त्याच दिवशी सेवन केलं पाहिजे.
‘तिथी’ या संकल्पनेच्या व्याख्येमुळे ज्या काही समजांना धक्का बसतो त्यातला एक समज आज पाहिला आपण. म्हणजे आता ‘तृतीयेच्या दिवशी संकष्टी कशी’, किंवा ‘नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी कसं’ वगैरे प्रश्नांनी आपण गोंधळून जाणार नाही. पण ‘तिथी’ या संकल्पनेच्या व्याख्येमुळे काही तिथी चक्क गायबही होऊ शकतात. हे काय गौडबंगाल आहे ते आपण पाहणार आहोतच. पण ते पुढच्या भागात.