राष्ट्रवाद ही राष्ट्रीय व राष्ट्रभूमी प्रमाण मानून तिच्या एकात्म विकासाचा विचार करणारी राष्ट्रभावना होय. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी याबद्दल आपले मत व्यक्त करणारा एक लेख ‘पूर्वा’ नियतकालिकाच्या १ ऑगस्ट, १९७९ च्या अंकात लिहिला होता. ‘नवभारत’ मासिकाने आपल्या सप्टेंबर, १९७९च्या अंकात लगेच पुनर्प्रकाशित करून या विषयाचे महत्त्व अधोरेखित केले होते.

या लेखात तर्कतीर्थांनी जागतिक राष्ट्रवादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रवादाची मीमांसा केली आहे. ते म्हणतात की, ‘भारत हे अनेक राष्ट्रांनी बनलेले एक राष्ट्र आहे.’ या विधानामागे स्वातंत्र्यपूर्वकाळात भारत शेकडो संस्थानिकांचा देश होता. संस्थानांचा कारभार राष्ट्रसदृश होता. म्हणजे त्यांचे सार्वभौमत्व होते. त्यांचे कायदे, न्याय, सैन्य, पोलीस, बँक, टपाल, तिकीट, चलन व्यवस्था होती. भारतात ब्रिटिश साम्राज्यानंतर प्रांतनिहाय शासनव्यवस्था अस्तित्वात आली. तिच्यातून राष्ट्र संकल्पनेस वैधानिक अधिष्ठान प्राप्त झाले. पाश्चिमात्य राष्ट्रांचा इतिहास पाहता, त्यातही विशेषत: युरोप आकाराला आला, तेथील राष्ट्ररचनेचा विचार करता त्यांचा पाया ‘एक भाषा, एक राष्ट्र’ हा होता. फ्रान्स, जर्मनी, स्पेन, डेन्मार्क, रशिया, ग्रीस, इटली व अन्य अनेक राष्ट्रे भाषा तत्त्वावर अस्तित्वात आली. जगात एकभाषिक राष्ट्रे आहेत, तशी अनेक भाषिक राष्ट्रेही आहेत. भारतासारखी बहुभाषिक राष्ट्रे रशिया, अमेरिका, स्वित्झर्लंड, सिंगापूर इ. होत. ब्रिटिश साम्राज्यातील भारतात सन १९०५च्या वंगभंग चळवळीने एकराष्ट्र भावनेस बळकटी आली. स्वातंत्र्योत्तर काळात भाषावार प्रांतरचनेचा आधार युरोपीय राष्ट्रनिर्मितीचा इतिहास होता. एकराष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होण्यामागे सर्व भारतीयांच्या समान समस्या, हेही एक कारण होते. बहुजन समाज हा आर्थिक विपन्नतेतून व मागासलेपणातून बाहेर पडायचा, तर हे परकीय राज्य घालविले पाहिजे, या विचाराने जी उचल घेतली, तीही या एकराष्ट्रीयत्व भावनेमागे एक कारण होती. स्वराज्य प्राप्तीनंतर सर्वभाषिक, सर्वधर्मीय, सर्वजातीय समावेष्टित एकराष्ट्र विचार भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या मूल्य व तत्त्वांतून उदयाला आलेले भारतीय गणराज्य एकराष्ट्र होय.

या एकराष्ट्रीयत्वाची अस्मिता जागृत करण्याकरिता भारतीय नेतृत्वाने पूर्वेतिहासाचा आधार घेऊन सहा पारंपरिक मूल्ये अंगीकारल्याचे दिसते. ती म्हणजे (१) प्राचीन भारतीय संस्कृती व एकत्व. (२) प्राचीन सर्वसमावेशक वृत्ती. (३) भौतिक जीवनाचे आकर्षण. (४) भिन्न जात, वंशीय समायोजन. (५) साहित्य व कला परंपरा. (६) विदेशी आक्रमण परिणाम/प्रतिक्रियेतून निर्माण झालेले एकत्व. अशाप्रकारे जनमानसाला चिरंतन मूल्यांचा साक्षात्कार झाला. त्या अनुषंगाने तत्कालीन भारतात जी अस्मिता जागृत झाली, तिने ब्रिटिश राजवटीत प्राप्त शिक्षणातून प्रेरणा घेऊन पश्चिमी सामाजिक व राजकीय ध्येयवाद स्वीकारला व तो भारतीय जनमानसाच्या तनामनात रुजला. भारतीय जनतेने यातून लोकशाही स्वीकारली. ब्रिटिशांनी तत्कालीन आंदोलनांना विरोध केला, तर स्वराज्य नि स्वातंत्र्य भावनेस चर्चा, संधी यांतून अनुकूल प्रतिसाद देण्याचेच धोरण अंगीकारले होते.

भारत स्वतंत्र झाला तेव्हा युरोपातील एक एक राष्ट्रांएवढ्या असलेल्या आपल्या प्रदेशांनी स्वतंत्र राज्याची मागणी न करता एका सार्वभौम राष्ट्राची मागणी केली, ही महत्त्वाची गोष्ट असून, ती विसरता येत नाही आणि दुर्लक्षित करूनही चालणार नाही. भाषा ही शक्ती त्या त्या भाषिक समूहास एकत्र आणते, तशीच ती अन्य भाषिक समूहांपासून अलगही करते. त्यामुळे केंद्रीय सत्ता असणे हे सार्वभौमत्व व गणराज्य (रिपब्लिक) पद्धतीसाठी केवळ आवश्यकच नसते, तर अनिवार्यही असते. म्हणून केंद्रीय राज्यकर्ते प्रादेशिक राज्यांना आहे त्यापेक्षा अधिक अधिकार देण्यास नाखूश असतात आणि ते एकराष्ट्र तत्त्वाच्या दृष्टीने स्वाभाविक व आवश्यक असते, परंतु राष्ट्रीय सभेच्या केंद्रीकरणाचा वाढता हव्यास हा लोकशाहीच्या अंताकडे नेणारा व अंतिमत: एकाधिकारशाहीचे समर्थन करणारा ठरतो. हे इंदिरा काँग्रेसच्या १९७५-७७च्या राजकीय आणीबाणी काळात या देशाने अनुभवले आहे. एकराष्ट्रीयत्व भावनेचा आधार भाषा, धर्म ही तत्त्वे नसून सर्वभौम प्रजासत्ताक गणराज्याचा सांविधानिक स्वीकार स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवाद या मूल्यांवर आधारित हवा. बहुराज्यांचे एकराष्ट्र म्हणजे भारत होय.