अखिल मेहता
पुस्तकं बसल्या जागी जगाची सफर घडवतात, पण पुस्तक महोत्सव पुस्तकांची सफर घडवतात आणि साहित्य उत्सव – लिटरेचर फेस्टिव्हल- तर वाचकाला पुस्तकांच्या मागच्या माणसांपर्यंत- लेखकापर्यंत पोहोचवतात. देशभरात अनेक ठिकाणी भरणाऱ्या या महोत्सवांचं स्वरूप निरनिराळं आहे. प्रकाशक म्हणून यापैकी कुठे ना कुठे जाण्याचा योग येतोच. यंदा केरळ लिटरेचर फेस्टिव्हलपासून सुरुवात केली, तिथून जयपूर, तिथून दिल्ली आणि दिल्लीनंतर बेंगलोर अशा एकाहून एक सरस महोत्सवांत हजेरी लावली. या महोत्सव सफरीचं सार काढायचं तर मला वाटू लागलं आहे की कोझिकोडच्या शांत किनाऱ्यावर जगभरच्या मातब्बरांना एकत्रित आणून झालेलं विचारमंथन कोकणच्या किनाऱ्यावरही करणं शक्य आहे. पर्यटन आणि साहित्याची ही सांगड दोन्ही क्षेत्रांना चालना देणारी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
केरळ लिटररी फेस्टिव्हल म्हणजे नऊ सभागृहांत रंगलेला, तब्बल तीनशेहून अधिक मान्यवरांची व्याख्यानं, मुलाखती असा भरगच्च कार्यक्रम असलेला महोत्सव. तोही तब्बल दहा दिवसांचा. तो भले कोझिकोडला होत असेल, पण केरळच्या कानाकोपऱ्यातले वाचकरसिक या महोत्सवाला हजेरी लावतात. यंदा या महोत्सवात नसरुद्दिन शहा, जावेद अख्तर यांसारख्या सेलिब्रिटींनीही उपस्थिती लावली. हुकमी मांडणी आणि विषयावरची मजबूत पकड असणारी त्यांची सत्रं विशेष गाजली. एकीकडे किनाऱ्याची गाज आणि दुसरीकडे जगभरच्या बुद्धिवंतांची वैचारिक स्पंदनं असं आगळावेगळं मिश्रण अनुभवताना एक विचार सतत मनात रुंजी घालत होता. तो म्हणजे कोकणच्या किनाऱ्यालाही हीच शांतता आणि सौंदर्य लाभलं आहे. तर असाच देखणा सोहळा तिथंही का होऊ नये? अर्थात वाचकांची संख्या आणि पुस्तकांच्या मागणी-पुरवठ्याच्या गणिताचा विचार केला तर केरळ आणि महाराष्ट्राची कदाचितच तुलना होऊ शकेल. पण तूर्तास हे स्वप्न पाहायला काय हरकत आहे?
फ्रान्स हा देश यंदा केरळ लिटररी फेस्टिव्हलचा गेस्ट ऑफ ऑनर होता. पुस्तकांच्या वा साहित्याच्या महोत्सवांमध्ये दर वर्षी एकेका देशाला असा मान देण्याची प्रथा जर्मनीतल्या फ्रँकफर्टच्या वर्ल्ड बुक फेअरपासून सुरू झाली आणि ती भारतात दिल्लीच्या ‘विश्व पुस्तक मेळ्या’प्रमाणेच इथं केरळमध्येही पाळली जाते. त्यामुळं फ्रान्समधील दर्जेदार साहित्याची इथल्या प्रादेशिक भाषांना ओळख घडवण्याचं महत्त्वाचं काम या महोत्सवानं केलं. फ्रेंच दूतावासानं या महोत्सवात देशभरच्या प्रकाशकांशी खास संवाद साधला, त्यात मराठीतून ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’चा समावेश होता. या संधीचा फायदा घेऊन फ्रेंच साहित्य मराठीत आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
केरळच्या किनाऱ्यांना निरोप देऊन जयपूरच्या राजेशाही वातावरणात पोहोचलो, पण या वेळी प्रकर्षानं जाणवलेली बाब म्हणजे केरळचा तिथल्या मातीशी असलेला दृढ संबंध जयपूरमध्ये तुलनेनं कमी जाणवला. जयपूरमध्ये भारतीय प्रादेशिक भाषांचं प्रतिनिधित्व होतं; पण ते नावापुरतंच. त्यामुळं जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल हा इंग्लिश साहित्याला समर्पित महोत्सव अधिक वाटत होता. या महोत्सवात सुधा मूर्ती आणि त्यांच्या लेकीचं सत्र विशेष गाजलं. विशेष म्हणजे या सत्राला माजी ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक आणि नारायण मूर्ती दोघेही श्रोत्यांमध्ये बसले होते. हीच जणू लेखक आणि पुस्तकांची ताकद! ती जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये वर्षानुवर्षे अनुभवायला मिळते. आणि पुन्हा ‘ती’ जाणीव होतेच… हे सगळं आपल्या महाराष्ट्रात मुंबईसारख्या शहरातही का नाही, असं वाटल्याशिवाय राहात नाही.
पुढची फ्लाइट होती दिल्लीची. जयपूरच्या गुलाबी थंडीतून दिल्लीच्या प्रदूषित वातावरणात आणि कदाचित त्या भव्यतेतही जाणं तसं आव्हानदायी होतं. केरळ आणि जयपूर महोत्सव त्यांच्या त्यांच्या जागी नेटकेच होते, पण त्या दोन्ही साहित्य-उत्सवांमध्ये पुस्तकविक्रीची जबाबदारी एकेका मोठ्या संस्थेकडे (केरळमध्ये प्रकाशक/ वितरक ‘डीसी बुक्स’; तर जयपूरमध्ये ‘क्रॉसवर्ड’ हे महादुकान) होती. याउलट दिल्लीचा पुस्तक मेळा म्हणजे पुस्तकविक्रीचेच सुमारे दोन हजार स्टॉल. थेट वाचक-ग्राहकांपर्यंत जाणाऱ्या दिल्लीच्या ‘विश्व पुस्तक मेळ्या’ची भव्यता कदाचितच देशातल्या दुसऱ्या कुठल्या महोत्सवाला असेल. देशभरात वर्षभर प्रकाशित झालेली पुस्तकं घेऊन आलेले देशाच्या कानाकोपऱ्यातले प्रकाशक, वाचक, वितरक यांची अभूतपूर्व मैफल म्हणजे हा महोत्सव. अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एजन्ट्सची ‘राइट्स टेबल’ जागतिक साहित्याकडे खुणावत होती. जणू दिल्ली वर्ल्ड बुक फेअर हा मिनी फ्रँकफर्ट झाला होता. एरवी ज्या एजन्ट्सशी इथले प्रकाशक केवळ ईमेलद्वारे जोडलेले असतात, त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटीगाठींची आणि चर्चा करण्याची ही संधी होती. तितकंच इथे भारतीय इंग्रजी प्रकाशकांमध्येही उत्साहाचं वातावरण होतं. पेंग्विन इंडिया, हार्पर कॉलिन्स आणि हॅचेट्ससारख्या स्टॉलवर या महोत्सवाची खरी रौनक होती. मेहता पब्लिशिंग हाऊस गेली अनेक वर्षे या महोत्सवाला हजेरी लावत आहे. या महोत्सवामुळे राजधानीतील हिंदी आणि इंग्रजी प्रकाशकांशीही ऋणानुबंध जोडणं शक्य झालं आहे. या महोत्सवाचं फलित म्हणून अनेक हिंदी, इंग्रजी पुस्तकं आमच्याकडून मराठीत अनुवादित झाली आहेत. दिल्ली बुक फेअरचं यंदाचं खास वैशिष्ट्य म्हणजे विविध मुद्रकांचे स्टॉल. छपाई क्षेत्रातलं पीओडी अर्थात ‘प्रिंट ऑन डिमांड’चं तंत्रज्ञानही अनेक स्टॉल्सवर लक्ष वेधून घेत होतं. प्रकाशन क्षेत्रातल्या छपाईच्या गुंतवणुकीवरचा हमखास उपाय म्हणून ‘पीओडी’कडे पाहिलं जातं. दिल्लीच्या वर्ल्ड बुक फेअरमध्येही अनेक प्रकाशक याकडे आकर्षित होताना दिसत होते.
दिल्लीचा हा बुक फेअर ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ आयोजित करतं. याच ‘एनबीटी’तर्फे असा पुस्तकविक्री आणि साहित्यिक उपक्रमांचा प्रयोग आणि नेटकं आयोजन काही अंशी पुणे बुक फेअरमध्येही पाहायला मिळालं होतं. वाचकांचा उदंड प्रतिसाद पुण्यातल्या महोत्सवानं अनुभवला. पुस्तक विक्रीचे उच्चांकही अनुभवले. त्यानिमित्तानं अनेक हिंदी, इंग्रजी प्रकाशकांनी पुण्याला भेट दिली होती. आणि पुस्तकविक्रीची मरगळ घालवून प्रकाशकांना नवचैतन्य दिलं होतं. त्यामुळे पुणे बुक फेअरही आगामी काळात या महोत्सवांच्या यादीत आपलं स्थान निर्माण करेल, अशी आशा आहे.
सर्व महोत्सव भेटींमधील सर्वात सुखद अनुभव होता बेंगळूरु येथील न्यू इंडिया फाऊंडेशन रिट्रीट-२०२५ या फेस्टिव्हलचा. या महोत्सवात भर होता तो चर्चांवरच. प्रादेशिक भाषांसंबंधीच्या चर्चेत मेहता पब्लिशिंग हाऊसला आमंत्रित करण्यात आलं होतं. या चर्चेत तिथ्यस बुक्सच्या नीता गुप्ता, कर्नाटकचे वसुधेंद्र, मल्याळममधील डीसी बुक्स, रचना बुक्सचे अनुराग बासनेत यांचा समावेश होता. हल्ली काही हिंदी, इंग्लिश पुस्तकांमधली चित्रं ‘एआय’द्वारे केलेली असूनही ती कुणीतरी काढलेली आहेत, असं भासवून त्याचेही हक्क विकत घ्यावे लागतील अशी अडवणूक प्रकाशकांकडून सुरू झालेली दिसते. हे प्रमाण सध्या कमी असलं तरी दुर्लक्षणीय नाही, असा मुद्दा या चर्चेत मी मांडला आणि इतरांनीही तो उचलून धरला. याशिवाय विक्रीची नवी माध्यमं शोधताना कॉर्पोरेट कंपन्या आणि मोठ्या सोसायटींमध्ये भरवल्या जाणाऱ्या प्रदर्शनांचा अनुभवही इथे मांडता आला, पण ‘एआय’चं आव्हान आपण समजतो त्यापेक्षा मोठं आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानानं पुस्तकांचं ‘ऑडिओ बुक्स’मध्ये सहज होऊ शकणारं रूपांतर हाही चिंतेचा विषय आहे. गूगलकडून दिलं जाणारं टेक्स्ट रीड अलाऊड फीचरही ऑडिओ बुक्सच्या व्यवसायाला घातक ठरू शकतं याची चर्चा या वेळी झाली. मेहता पब्लिशिंग हाऊसचं प्रतिनिधित्व करत असताना मराठी पुस्तक वितरणातलं पुणे-मुंबईसारख्या शहरांचं वर्चस्व बाजूला सारून वाचकांची नवी पिढी घडवण्यासाठी ग्रामीण भागांपर्यंत पोहचण्याची गरज मी व्यक्त केली. महाराष्ट्रातला ८० टक्के वाचकवर्ग अजूनही ग्रामीण महाराष्ट्रात आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी असे महोत्सव प्रादेशिक पातळीवर भरवण्याची विशेष गरज या वेळी जाणवली.
एकूणच या सर्व महोत्सवांच्या निमित्ताने आपण करत असलेलं काम, देशात व जगात सुरू असलेल्या कामाशी पडताळून पाहता आलं. त्यातून अनेक नव्या संधींची वाटही समोर आली. ती वाट मराठी वाचकांना नक्की काहीतरी नवं देणारी ठरेल अशी आशा वाटते.
(संचालक, ‘मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे)
बुकनेट : दुर्मीळ पुस्तकांचे दुकान…
शेकडो वर्षे जुनी पुस्तके असलेल्या दुकानांतच काय वाचनालयांतही ती हाताळायला उपलब्ध होत नाहीत, अशी समजूत व्हायला आपल्या आजूबाजूचे ग्रंथवातावरण. हे फ्रान्समधील दुर्मीळ पुस्तकांचे दुकान मात्र याला अपवाद ठरावे. अठराव्या शतकातील पुस्तकेदेखील येथे पाहायला, त्यांची पाने उलटून पाहायला उपलब्ध असल्याचे दिसते. करोनानंतरच्या काळात तयार केलेला हा व्हिडीओ. दुर्मीळ पुस्तकांचा तपशील आणि दुकानाची सैर हा दुहेरी फायदा.
https://tinyurl. com/ydwbd5 e4
पुस्तक जतनाची कला…
वीस-तीस वर्षांपूर्वीची पुस्तकेदेखील काहींना दुर्मीळ वाटतात. शंभर वर्षांपूर्वीची पुस्तके मिळविणे अवघड भासते. कागद दर्जा, बांधणी आणि एकूणच जपणुकीची असोशी या तीन कसोट्या पूर्ण झाल्या, तर पुस्तक कितीही वर्षे जतन केले जाऊ शकते. सत्तरीच्या म्हणजे अलीकडच्या दशकातील मासिके आणि पुस्तकेही भारतात विलुप्त झाल्याची उदाहरणे आहेत. पण पाम बीच फ्लोरिडा येथील वाचनालयामध्ये १४९३ मधील पुस्तक सुस्थितीत असल्याचे दिसते. या व्हिडीओत पुस्तक जतनाचे काही मासले आहेत. दुुर्मीळ पुस्तकधारकांना प्रेरणा देऊ शकतील.
https://tinyurl.com/2s3 nvb93
न्यू यॉर्करच्या डॉक्टरबुवांचा सल्ला…
डॉक्टर अतुल गवांदे हे न्यू यॉर्कर साप्ताहिकात गेली दोन दशके आजारांवर आणि वैद्याकीय क्षेत्रातील किचकट प्रश्नांवर अतिशय सहज लिहीत आहेत. त्यांची पुस्तके मराठीतदेखील अनुवादित झाली आहेत. न्यू यॉर्कचाच जन्म असलेल्या या लेखकाची २०२४ च्या ‘न्यू यॉर्कर फेस्टिव्हल’मध्ये घेण्यात आलेली मुलाखत येथे पाहता-ऐकता येईल. उत्तम आरोग्य कसे राखावे, याबाबतच्या सल्ल्यांसह.
https://tinyurl. com/mrfd2 m4 t