पृथ्वीच्या पोटावर (किंवा पाठीवर म्हणा, हवं तर) मारलेला एक काल्पनिक आडवा पट्टा सर्वांच्या परिचयाचा आहे. विषुववृत्त. हा पृथ्वीच्या बरोब्बर मध्यभागी आहे. या विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन समान भाग होतात-उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध.
पण पृथ्वीवर आखलेले याखेरीज आणखी दोन काल्पनिक आडवे पट्टे प्रसिद्ध आहेत. उत्तर गोलार्धात कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धात मकरवृत्त. आधी मकर संक्रांत आली. मग मकर रास आली. आणि आता मकर वृत्त! यांचा एकमेकांशी काही संबंध आहे की योगायोगाने त्यांची नावं अशी पडली?
या सगळ्यांचा एकमेकांशी अगदी घनिष्ठ संबंध आहे. कारण एकाच खगोलीय घटनेमुळे ही ‘मगरमिठी’ बसली आहे! हे सगळं नीट समजून घेऊ.
सूर्य रोज साधारण पूर्व दिशेलाच उगवतो, पण ठीक पूर्वेला नव्हे. त्याची उगवण्याची जागा रोज बदलते. २१ जून या दिवशी सूर्य सर्वात उत्तरेकडे उगवतो. मग त्याची उगवण्याची जागा हळूहळू दक्षिणेकडे सरकू लागते ती थेट २१ डिसेंबरपर्यंत. या दिवशी सूर्य सर्वात दक्षिणेकडे उगवतो. मग त्याची उगवण्याची जागा हळूहळू उत्तरेकडे सरकू लागते. ही उगवण्याची जागा हळूहळू उत्तरेकडे सरकू लागणं म्हणजे ‘उत्तरायण’. ‘उत्तरायण’ या शब्दाचा अर्थच मुळी ‘उत्तरेकडे जाणे’ असा होतो.
२१ डिसेंबर याच दिवशी साडेतेवीस अंश दक्षिण या अक्षांशावर माध्यान्ही सूर्य डोक्यावर येतो. हेच ते सुप्रसिद्ध ‘मकरवृत्त’! पण याला ‘मकरवृत्त’ असं नाव का मिळालं? कारण ज्या काळात त्या वृत्ताला ‘मकरवृत्त’ हे नावं मिळालं त्या काळात नेमक्या याच दिवशी सूर्य मकर राशीतही प्रवेश करी! त्याच दिवशी सूर्याचं मकर संक्रमण होई. असा जवळचा संबंध आहे मकर संक्रमण, मकर रास आणि मकर वृत्त यांचा.
सूर्याची वर्षभरात बारा संक्रमणं होतात. पण त्यातलं हे एवढं एकच संक्रमण आपण साजरं करतो याचं कारणही हेच आहे. मकर संक्रमण आणि उत्तरायणाचा आरंभ एकाच दिवशी असे. आजही भारताच्या अनेक प्रांतात हा सण ‘उत्तरायण’ म्हणून साजरा करतात. असो.
आता प्रश्न असा निर्माण झाला की पूर्वीच्या काळी जर हे मकर संक्रमण २१ डिसेंबर या दिवशी होत असे तर आता ते १४ जानेवारीला का होतं? आणि इथून पुढे ही तारीख पुढे-पुढे का सरकेल? नेमकं काय सरकतं आहे? पृथ्वी, सूर्य, मकरवृत्त की मकर रास?
याचं उत्तर ‘करी डळमळ भूमंडळ’ असं आहे! म्हणजे पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा आस डळमळता आहे-एखाद्या फिरत्या भोवऱ्याचा असावा तसा. तो अक्षही एका काल्पनिक रेषेभोवती प्रदक्षिणा घालतो!
आता त्यामुळे होतं काय तर क्रांतिवृत्तावरच्या विशिष्ट स्थानी सूर्य असणं ही घटना हळूहळू पुढे सरकते – साधारण ७२ वर्षांत एक दिवसाचा फरक पडतो. म्हणजे कोणे एके काळी सूर्यकिरण साडेतेवीस अंश दक्षिण या अक्षांशावर लंबरूप पडले नेमक्या त्याच दिवशी मकर संक्रमण झालं. त्यानंतर दर ७२ वर्षांनी सूर्याचं मकर संक्रमण एक-एक दिवस उशिराने घडू लागलं. असं होत होत आपण सुमारे २४ दिवस पुढे सरकलो आहोत.
अजून सुमारे ५०० वर्षांनी मकर संक्रमण होईल २१ जानेवारीला! आणि २१ डिसेंबरला, उत्तरायण सुरू होईल त्या दिवशी, सूर्य मकर नाही, धनू राशीत प्रवेश करेल! आणि आजपासून दहा-बारा हजार वर्षांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल २१ जूनला! म्हणजे चक्क दक्षिणायन चालू होईल त्या दिवशी!
७२ वर्षांत एक दिवस म्हणजे किती क्षुल्लक असं कोणाला वाटू शकेल. पण प्रत्यक्षात त्याने केवढी उलथापालथ झाली आहे आणि होणार आहे! ‘काळाचं गणित’ किती फसवं आहे पाहा!