बुद्धिबळ जगज्जेता मॅग्नस कार्लसनने एका ऑनलाइन स्पर्धेतील डावात पहिली चाल खेळून हार मानली. त्याचा प्रतिस्पर्धी होता अमेरिकेचा हान्स नीमन. याच नीमनविरुद्ध या महिन्याच्या सुरुवातीला आणखी एका सदेह स्पर्धेत पराभूत झाल्यानंतर कार्लसनने स्पर्धेतूनच माघार घेतली होती. सत्य समजले तर खळबळ उडेल, अशा आशयाचे ट्वीट त्याने त्या वेळी केले. पण कोणताही अधिक खुलासा केला नाही. त्याचा युवा प्रतिस्पर्धी नीमन याने फसवणूक केली असावी आणि त्याला वैतागूनच कार्लसनने माघार घेतली, असा तर्क त्या वेळी अनेक विश्लेषक, बुद्धिबळप्रेमी आणि आघाडीच्या बुद्धिबळपटूंनी केला. खुद्द नीमनने त्यानंतर प्रदीर्घ मुलाखत देऊन स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मागे काही ऑनलाइन स्पर्धामध्ये नीमनने गैरप्रकारांचा अवलंब केल्याचे आढळून आले होते आणि त्याबद्दल ताकीद, स्पर्धेतून हकालपट्टी वगैरे कारवाई त्याच्यावर झाली होती. पण नंतर त्याच्याविरुद्ध कोणीही तक्रार केलेली नाही. या नीमनच्या प्रामाणिकपणाविषयी बुद्धिबळपटूंमध्ये दोन प्रवाह आहेत. अमेरिकेतील ज्या सिंकेफील्ड स्पर्धेत पहिल्यांदा हा प्रकार घडला, ती प्रतिष्ठेची मानली जाते.
फसवणूक होऊ नये यासाठीची सर्व खबरदारी त्या स्पर्धेत घेतली जाते, शिवाय आघाडीचे बुद्धिबळपटू फसवणूक (उपकरणांच्या साह्याने सॉफ्टवेअरची मदत घेऊन उत्कृष्ट आणि विजयी चाली रचण्याचे प्रकार) करत असतील, अशी शक्यता अलीकडच्या काळात जवळपास शून्य मानली जाते. मॅग्नस कार्लसन हा जगज्जेता आहे आणि त्याचे बुद्धिबळ खेळाप्रति काहीएक दायित्व आहे. स्पर्धामधून माघार घेणे, डावाच्या सुरुवातीलाच तो सोडून निघून जाणे याविषयीची कारणे त्याने स्पष्ट करणे आवश्यक आहे. बहुधा त्याच्या भोवतीचे वलय आणि प्रेक्षक व पुरस्कर्ते आकृष्ट करण्याची त्याची अफाट क्षमता याचा विचार करून स्पर्धा संयोजक किंवा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेने (फिडे) त्याला जाब विचारण्याची हिंमत दाखवलेली नाही. यातून तो खेळापेक्षा मोठा असल्याचा समज लोकांपर्यंत पोहोचतो. हान्स नीमनची रीतसर चौकशी करणे आणि तोपर्यंत त्याला कोणत्याही स्पर्धेत खेळण्यापासून परावृत्त करणे हा एक मार्ग आहे. मात्र, अद्याप नीमनविरुद्ध कोणताही पुरावा कोणीही सादर करू शकलेले नाही. अशा वेळी केवळ कार्लसनच्या एका कृतीवरून त्याला परस्पर दोषी ठरवणे अयोग्यच. कार्लसन अलीकडच्या काळात युवा बुद्धिबळपटूंकडून वारंवार हरतो. भारताच्या आर. प्रज्ञानंदने तर त्याला या वर्षभरात तीन वेळा हरवले आहे. प्रज्ञानंद किंवा इतर कोणाच्याही हेतूंविरुद्ध कार्लसनने संशय घेतलेला नाही. मग नीमनविरुद्धच त्याने असे प्रकार का सुरू केले आहेत, याचा खुलासा करण्याची त्याची इच्छा नसेल तर किमान फिडेने तरी पुढाकार घेतला पाहिजे. मागे माजी जगज्जेता गॅरी कास्पारॉव्हनेही अशा प्रकारे मनमानी करून खेळापेक्षा स्वत:कडे मोठेपणा घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. त्यातून बुद्धिबळ संघटनेमध्येच उभी फूट पडली होती. कार्लसनला तसेही जगज्जेतेपद राखण्यात रस राहिलेला नाही. ते दडपण मनावरून उतरल्यामुळे असले प्रकार त्याने सुरू केले, तर त्याच्याच हेतूंबाबत शंका घेण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. एरवी पटावर वाघासारखा लढणाऱ्या कार्लसनने अशा प्रकारचा पळपुटेपणा करणे, त्याच्या आजवरच्या लखलखत्या कामगिरीस डाग लागण्यासारखेच ठरेल.