सौम्या स्वामिनाथन जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञपदावरून पायउतार होत आहेत. त्यांची जागा घेणार आहेत जेरेमी फरार. ही नियुक्ती महत्त्वाचीच, कारण आरोग्यविषयक कोणतीही समस्या आता जगाच्या एखाद्या भागापुरती मर्यादित राहणार नाही हे कोविडने सिद्ध केले आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात उद्भवू शकणाऱ्या समस्यांचा अदमास बांधून त्या दूर करण्याच्या दिशेने आतापासूनच तयारी सुरू करण्याएवढी दूरदृष्टी असणारी व्यक्ती, जागतिक आरोग्य संघटनेतील महत्त्वाच्या स्थानी असणे गरजेचे आहे. जागतिक महाशक्ती आरोग्य क्षेत्रातील घडामोडींना आपापल्या सोयीप्रमाणे वळण देऊ पाहात असताना, हे क्षेत्र राजकीय आणि आर्थिक महत्त्वाकांक्षांपासून दूर ठेवणेही महत्त्वाचे आहे. जेरेमी फरार यांचा आजवरचा प्रवास या निकषांची पूर्तता करणारा असल्याचे दिसते.
फरार स्वत: इम्युनॉलॉजिस्ट (रोगप्रतिकारकक्षमता तज्ज्ञ) आहेत. त्यांचा जन्म सिंगापूरमध्ये झाला. इंग्रजीचे शिक्षक असलेल्या त्यांच्या वडिलांना कामानिमित्त विविध देशांत राहावे लागत असे. परिणामी जेरेमी यांचे बालपण न्यूझीलंड, सायप्रस, लिबिया अशा विविध देशांत गेले. नि १९८३ साली इम्युनॉलॉजीची पदवी, तर १९८६ साली बॅचलर ऑफ सर्जरी ही पदवी मिळवली. क्षयरोग, डेंग्यू, टायफॉइड, मलेरिया आणि बर्ड फ्लू असे संसर्गजन्य रोग हे त्यांचे अभ्यासाचे विषय. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात ‘उष्ण कटिबंधीय प्रदेशांतील औषधशास्त्र’ आणि ‘जागतिक आरोग्य’ या विषयांचे अध्यापन केले. त्यांच्या या विषयांतील ज्ञानाचा लाभ आता जागतिक आरोग्य संघटनेला आणि पर्यायाने जगाला होऊ शकेल. व्हिएतनाममध्ये फरार यांनी तब्बल दोन दशके टायफॉइड, डेंग्यू, क्षयरोगाच्या निर्मूलनासंदर्भात काम केले. २००४ मध्ये आलेल्या बर्ड फ्लूच्या साथीचा पहिला रुग्ण त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्याने ओळखला. त्याच्या लक्षणांचा, परिणामांचा आणि त्यावरील औषधांचा अभ्यास केला. २०१३ साली त्यांनी ‘वेलकम ट्रस्ट’च्या संचालकपदाची जबाबदारी घेतली तेव्हा, या संस्थेची ओळख केवळ मूलभूत आरोग्य विज्ञानाशी संबंधित संस्था एवढीच होती. फरार यांच्या संचालकपदाच्या जवळपास दशकभराच्या वाटचालीत संस्थेने आपल्या कार्याचा पैस मानसिक आजारांपासून, आरोग्यावर होणाऱ्या हवामान बदलांच्या परिणामांपर्यंत वाढविला. २०१४-१५मध्ये आफ्रिकेत इबोलाचा उद्रेक झाला तेव्हा संस्थेने लसीकरणात मोलाचे योगदान दिले. साथनियंत्रणाचे प्रयत्न तत्परतेने सुरू न केल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटना आणि जगातील अन्य देशांच्या सरकारांवर टीका करण्याएवढा स्पष्टवक्तेपणा त्यांनी दाखविला. कोविडकाळात गरीब आणि श्रीमंत देशांमधील लसीकरणाच्या प्रमाणात जी तफावत दिसून आली, त्यावर भाष्य करताना ते म्हणाले होते, ‘राजकीय उदासीनता आणि नेतृत्वाचा अभाव यामुळे ही साथ वाढतच चालली आहे. साथीविषयी भाषणे दिली जातात, सहानुभूती व्यक्त केली जाते, मात्र प्रत्यक्षात कृती केली जात नाही.’
जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञपद किती महत्त्वाचे आहे, याचा प्रत्यय कोविडकाळात आला. सौम्या स्वामिनाथन पायउतार होत असताना, त्या पदी नव्या आव्हानांची समज असणारी, या आव्हानांना सामोरे जाण्याची इच्छा असणारी आणि दबावाची चिंता न करता स्पष्टपणे मते मांडणारी व्यक्ती येणे गरजेचे होते. जेरेमी फरार या वर्गातील आहेत, असे दिसते.