क्लेअर सेस्टानोविच ही देखणी लेखिका वयाच्या तिशीतच न्यू यॉर्कर, पॅरिस रिव्ह्यू आणि हार्पर्स या तीन कथांबाबत गंभीर असणाऱ्या मासिकांमध्ये झळकली. हे भाग्य आत्तापर्यंत मोजून आठ ते दहा हयात असलेल्या लेखकांनाच लाभले आहे. गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये न्यू यॉर्करमध्ये कथा आणि निबंधांसह तिची उपस्थिती लक्षवेधीच वाटणारी. या साप्ताहिकातच तिने काही वर्षे संपादकीय विभागात काम केले असल्याने तिची तिथवरची वाट सोपी झाली असेल, असे कुणाला वाटावे. पण तसे बिलकुल नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिच्या कथा वाचकाला गुरुत्वाकर्षणात ओढून घेतात. त्या अजिबातच ओ हेन्रीएटिक किंवा धक्कातंत्राने संपणाऱ्या नसतात. कथानक नसलेल्या आकर्षक कथा असे तिच्या कथांचे वर्णन करता येईल. वाचनविपुल, ज्ञानविपुल अशा व्यक्ती आणि त्यांच्यातील नात्यांचा गुंता किंवा वेगवान शहरात रोजच्या जगण्याची त्यांची स्थिती या परिघात त्या घडत राहतात. ‘ऑब्जेक्ट्स ऑफ डिझायर’ नावाच्या संग्रहात या ११ विलक्षण वेगवान कथा वाचण्याची संधी मिळते. या लेखिकेची ‘आस्क मी अगेन’ नावाची पहिलीच कादंबरी काही दिवसांपूर्वी आली असून ती गेल्या काही दिवसांतच खूपविक्या पुस्तकांत गणली गेली आहे.

हेही वाचा >>> अन्वयार्थ: चंद्राबाबूंचे चोचले चालतील?

न्यू यॉर्कमधील मध्यमवर्गीय घरात राहणाऱ्या १६ वर्षांच्या मुुलीचा एका विशीतील श्रीमंत तरुणाशी झालेला परिचय हा कथानकाचा साधारण भाग. या परिचयाचे ठिकाण एकच पण कारणे वेगवेगळी. मुुलीच्या आजीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्यामुळे तिच्या देखभालीसाठी उपस्थित राहिलेली ही नात. मुलाच्या भावाला अमली पदार्थांनी बेजार केल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत त्याचे तेथे असणे. आता या विचित्र परिस्थितीत झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात वगैरे पडण्याची शक्यता लेखिका ठेवत नाही.

पुढल्या दशकभरात या परिचयाचे रूपांतर ठळक संपर्कात होते. पण त्या पात्रांच्या भवताली घडणाऱ्या राजकीय, सामाजिक घटनांसह त्यांचे वयाने वाढत जाणे दाखवणे क्लेअर सेस्टानोविच यांचा मुख्य उद्देश. या लेखिकेची न्यू यॉर्करमध्ये आणि इतर मासिकांमध्ये आलेली कोणतीही कथा वाचल्यावर कथानकाचा विचार न करता ती कशी फुलवता येऊ शकते, याचे तपशील मिळू शकतील. तूर्त ‘आस्क मी अगेन’ ही कादंबरी तरी वाचा किंवा न्यू यॉर्करमधील तिचे लेखन तरी अनुभवा.

https://shorturl.at/S2PnS

हेही वाचा…

अनिता देसाई या भारतात जन्मल्या आणि लेखिका म्हणून अमेरिकेत वाढल्या. तीन वेळा त्यांची पुस्तके बुकरच्या लघुयादीत राहिली. पण प्रत्यक्षात बुकर मिळाले ते त्यांच्या मुलीला, किरण देसाई यांना. वयाच्या ८७ व्या वर्षात अनिता देसाई यांची ‘रोझारिटा’ ही नवी कादंबरी आली आहे. त्यानिमित्ताने या लेखिकेची जडणघडण सांगणारी दीर्घ मुलाखत.

https://shorturl.at/DaDi9

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये वाचन आणि पुस्तक विक्री या दोन गोष्टींसाठी सध्या सर्वाधिक प्रयत्न होत आहेत. आपल्या भाषेतील पुस्तकांची दुकाने अधिकाधिक व्हावीत यासाठी अनुदान आणि ‘पुस्तक प्रमाणपत्र’ आदी योजनांवर राष्ट्राध्यक्षांनी काही दिवसांपूर्वी शिक्कामोर्तब केले. युक्रेनी नागरिकांमध्ये राष्ट्रभाषा आणि वाचनाबाबत प्रचंड आस्था आहे. त्याची झलक दाखविणारे हे वृत्त.

https://shorturl.at/4RMF6

आजच्या पानात मुख्य लेख असलेल्या खूपविक्या लेखिका सिल्विया मोरेनो गार्सिया यांच्या उण्यापुऱ्या ४३ वर्षांतील ८ कादंबऱ्या तीन कथासंग्रह आणि अगणित कथा संकलनाचे संपादन आदी काम पाहिले तर कोणीही थक्क होईल.

‘मेक्सिकन गॉथिक’ या कादंबरीनंतर जगासाठी प्रकाशझोतात आलेली ही लेखिका आपली कथा दशक-दीड दशकांपासून गाजवत आहे. तिच्या भयकथेची जातकुळी समजून घेण्यासाठी येथे वाचा.

https://shorturl.at/j33Tp

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Writer clare sestanovich novels clare sestanovich books zws