अमेरिकेचा साठोत्तरीकाळ विन्स्टन ग्रूम या लेखकाने ‘फॉरेस्ट गम्प’ कादंबरीमधून अत्याकर्षकपणे सादर केला. ७५ इतका बुद्ध्यांक (साधारण मानवी पातळी ८५ ते ११५) असलेल्या फॉरेस्ट गम्प या मुलाची जडण-घडण अमेरिकेतील साऱ्या ऐतिहासिक-सामाजिक आणि सांस्कृतिक घटनांच्या साखळीद्वारे यात गुंफली होती. १९८६ साली या कादंबरीच्या प्रकाशनापूर्वीच त्याचे सिनेमाहक्क विकले गेले. पण सिनेमा येईस्तोपर्यंतचा काळ कादंबरी काही लोकप्रिय किंवा खूपविक्या गटात गणली गेली नाही. या कादंबरीआधी तीन कादंबऱ्या ग्रुम यांच्या नावावर होत्या, त्याही यथातथा खपलेल्या. मग १९९४ ‘फॉरेस्ट गम्प’वर चित्रपट आला. त्यानंतर विन्स्टन ग्रुम हा लेखक जगभर नाव कमावता झाला. कारण सिनेमा पाहताना लोक हसले-रडले-भावुक झाले आणि ‘मूळ पुस्तकातला गम्प दिसतो कसा आननी’ याचे कुतूहल शमवण्यासाठी वाचूही लागले. चित्रपट येण्यापूर्वी आठ वर्षांत पुस्तकाच्या फक्त ३० हजार प्रती संपल्या होत्या. चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतरच्या पहिल्याच वर्षामध्ये लाखोंनी प्रती छापाव्या लागल्या. चित्रपटातील टॉम हँक्सच्या दृश्यांसह मुखपृष्ठ असलेली नवी प्रत जगभरात धो-धो खपू लागली. आजही मुंबईपासून देशातील सर्वच शहरात पायरसी उद्याोगाच्या रस्तापुस्तक दालनांत फॉरेस्ट गम्पची प्रत (बेंगळूरु किंवा मुंबई कागदावर छापलेली आवृत्ती) सहज मिळते.
‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा तिसावा वाढदिवस गेल्या महिन्याभरापासून साजरा होत आहे. तिसाव्या वर्षाप्रीत्यर्थ त्याची ‘स्पेशल ब्लू रे’ सीडी-डीव्हीडी काढण्यात आली. चित्रपटावर आणि टॉम हँक्सच्या कारकीर्दीवर काही माध्यमसमूहांनी विशेषांकही काढले. अमेरिकी तिकीटबारीवर विक्रम करणारा हा चित्रपट. पण पुस्तकाचीही विक्रमी विक्री झाली.
हा सिनेमा बहुतांश भारतीयांनी स्टार मूव्हीज या वाहिनीवर आवडीने पाहिला. काहींना त्यातली गाणी (साऊंडट्रकमधील ‘टर्न टर्न टर्न’, ‘स्वीट होम अलाबामा’) भावली, काहींना त्यातील टॉम हँक्सच्या चौकटयुक्त शर्ट आणि खाकी पॅण्टच्या पेहरावाने भुरळ पाडली, तर बहुतांशांना टॉम हँक्सने साकारलेला ‘फॉरेस्ट गम्प’ हा आपल्या पिढीचा भावनिक संवेदनावाहक प्रतिनिधी वाटायला लागला. एल्व्हिस प्रेसलेचे संगीत, वॉटरगेट प्रकरण, व्हिएतनाम युद्ध, पिंगपॉँग डिप्लोमसी आदींसह सर्वच घटनांशी संबंध जुळणारे फॉरेस्ट गम्पच्या आयुष्याचे कथानक एकाबाजूला तरलतुंद तर दुसऱ्या बाजूला कला-अभिनय विभागातील परमोच्च निर्मितीबिंदूस कारणीभूत ठरणारे होते. आजही लोक हा चित्रपट मनाला उभारी मिळविण्यासाठी पुन:पुन्हा पाहतात.
भारतात रस्त्यावरही सहज मिळणारी ‘फॉरेस्ट गम्प’ कादंबरी आपल्या सर्वांना माहिती असली, तरी विन्स्टन ग्रुम या कादंबरीकाराने ‘फॉरेस्ट गम्प’नंतरचा आणखी एक भाग लिहिल्याचे अनेकांच्या गावीही नसते. त्याचे खरे कारण त्यावर हक्क विकले जाऊनही अद्यापपर्यंत न बनलेला चित्रपट हेच आहे. फॉरेस्ट गम्प चित्रपटाच्या तिशीनिमित्ताने या पुस्तकाची ओळख करून देणे हाच या टिपणाचा उद्देश आहे.
ग्रुम यांनी चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर ‘गम्प अॅण्ड कंपनी’ ही कादंबरी लिहिली. फॉरेस्ट गम्पच्या यशलाटेत तिच्या प्रती बऱ्यापैकी खपल्या. पण जगभरात ती खूपविकी ठरू शकली नाही. या कादंबरीत ग्रुम यांनी लिहिलेली गम्पची व्यक्तिरेखा टॉम हँक्सशी मिळतीजुळती तयार झाली होती. या कादंबरीत १९८६ ते १९९५ पर्यंतच्या अमेरिकी इतिहासातील घडामोडी फॉरेस्टच्या समांतर पळू लागतात.
पहिल्या कादंबरीच्या शेवटी आपल्या बालमैत्रिणीला भेटून झाल्यानंतरचा आणि तिथे नव्या सत्यानंतर आयुष्याला निरागसपणे स्वीकारणारा फॉरेस्ट गम्प भेटतो. आता त्याच्या आयुष्यातील नैमित्तिक सत्ये घेऊन फॉरेस्ट ‘बरा करत असो किंवा भला, पण तुमच्या आयुष्यावर चित्रपट बनवायला कुणालाही परवानगी देऊ नका.’ असा सल्ला वाचकाला देतो. मागणी-पुरवठ्याचे गणित बिघडल्याने त्याची कोळंबी कंपनी रसातळाला जाते. मग तो एका स्ट्रिप क्लबमध्ये कामाला लागतो. त्यानंतर पुन्हा बेकारीच्या स्थितीत विश्वकोशाचे खंड दारोदार विकतो. कोकाकोलाच्या नव्या उत्पादनाला कर्मधर्मसंयोगाने त्याचा हातभार लागतो, डुकरांची शेती सांभाळण्याचे कामही त्याच्या वाटेला काही काळ येते. पण गमतीशीर म्हणजे हा फॉरेस्ट गम्प हॉलीवूड अभिनेता टॉम हँक्स याचीही भेट घेतो. रोनाल्ड रेगन, अयातुल्ला खोमेनी, बिल-हिलरी क्लिंटन, सद्दाम हुसेन यांच्या भेटी-गाठीचा प्रसंगही यात आहेच. आधीच्या कादंबरीच्या बाजाची, विनोदी शब्द आणि शैलीच्या पेहरावात चालणारी ही कादंबरी वाचणे म्हणजे सिनेमातील फॉरेस्ट गम्पचे पुढे काय झाले, हे अनुभवणे आहे.