‘रायटर्स अगेन्स्ट वॉर ऑन गाझा’ अशी एक चळवळ २३ ऑक्टोबर २०२३ रोजी- म्हणजे हमास-इस्रायल युद्धाला पंधरवडा उलटत नाही तोच सुरू झाली होती. व्हिएतनामवरच्या अमेरिकी हल्ल्यांना १९६० च्या दशकाअखेरीस तत्कालीन अमेरिकी साहित्यिकांनी जसा संघटित विरोध दाखवला तसंच आपण करू, ही या गाझाविरोधी ‘रायटर्स’च्या चळवळीची प्रेरणा. कॉर्नेल वेस्ट, ज्युडिथ बटलर या महनीय विचारवंतांनीही या अमेरिकी चळवळीच्या निवेदनाला पूर्ण पाठिंबा दिला असला तरी, जे काही आठशेहून अधिक पाठिंबादार जमले आहेत त्यांच्यात संगीतकार, चित्रकार, कवीही आहेत. दुसरीकडे ब्रिटनमधल्या ‘सोसायटी ऑफ ऑथर्स’ या साहित्य संस्थेत ३ मे रोजी गाझामधल्या सततच्या हल्ल्यांमध्ये ९५ पत्रकार, साहित्यिकांनी प्राण गमावल्याचा तरी निषेध आपण करावा, असा ठराव मांडला गेला तेव्हा ठरावाच्या बाजूनं ७८६ मतं, तर ठरावाच्या विरुद्ध ८८३ मतं पडली… २३९ जण तटस्थ राहिले. इंग्रजी साहित्यासाठी पूर्वापार ओळखल्या जाणाऱ्या या दोन देशांतली साहित्यिक गाझाबद्दल- किंवा इस्रायलबद्दल गप्पच आहेत. अशा वेळी आर्ये नीएर यांनी ‘होय, इस्रायलनं गाझात वंशसंहारच चालवला आहे’ अशी स्पष्ट भूमिका घेणं ब्रिटिश-अमेरिकी मिळून सोळाशे-सतराशे लेखकांपेक्षाही जास्त लक्षणीय ठरतं.
आर्ये नीएर हे लेखक आहेतच, पण त्याहीपेक्षा ‘ह्यूमन राइट्स वॉच’ या संस्थेचे ते एक संस्थापक आहेत, अमेरिकेतल्या आणि जगातल्या मानवी हक्क उल्लंघनाबद्दल त्यांनी सातत्यानं भूमिका घेतल्या आहेत… तरीही कोणीच त्यांच्याबद्दल ‘हे मानवी हक्कवाले…’ वगैरे शब्दांत अनादर दाखवत नाही. कारण मानवी हक्कविरोधी उथळ टीकाकारांना गप्पच बसवेल असा या नीएर यांचा व्यक्तिगत भूतकाळ आहे… ते १९३७ सालच्या बर्लिनमध्ये ज्यू कुटुंबात जन्मलेले, नाझींकडून छळ झालेले, मग अनाथ आश्रित या नात्यानं अमेरिकेत आलेले होते. १९७६ मध्ये मात्र त्यांनी अमेरिकी ‘नॅशनल सोशालिस्ट’ (होय, नाझीच) संघटनेला एका गावात मिरवणूक काढण्यास बंदी असू नये, अशी बाजू घेतली- ‘तुमच्या टीकेचा प्रतिवाद करेन, पण टीका करण्याचे तुमचे स्वातंत्र्य जपेन’ या तत्त्वाशी ते किती एकनिष्ठ आहेत, हे तेव्हा दिसलं आणि त्या अनुभवावर त्यांनी ‘डिफेन्डिंग माय एनिमी’ हे पुस्तकही लिहिलं. मानवी हक्कांच्या लढ्यातल्या ४० वर्षांच्या वाटचालीवर ‘टेकिंग लिबर्टीज’ आणि आंतरराष्ट्रीय मानवी हक्क चळवळीचा इतिहास ही त्यांची अन्य पुस्तकं .
हेही वाचा >>> लोकमानस : मस्तवाल अधिकारी, निडर धनाढ्य!
तर या नीएर यांनी ‘आधी मीही इस्रायल ‘स्वसंरक्षणासाठी’ आणि ‘हमासविरुद्ध’ सशस्त्र कारवाई करत असल्याच्या मताचा होतो, पण अधिक सजगपणे वास्तव पाहू लागलो. सद्दाम हुसेनने कुर्द लोकांचा वंशसंहार चालवल्याचे मी १९९० च्या दशकाअखेरीस म्हटले होते, त्यानंतर कधीही न वापरलेला ‘वंशसंहार’ (जेनोसाइड) हा शब्द मी इस्रायलसंदर्भात आता वापरतो आहे. इस्रायल ज्याप्रकारे हल्ले चढवत आहे, तो पॅलेस्टिनींचा वंशसंहारच, अशा निष्कर्षाप्रत मी आलो आहे’ अशी विधानं फरीद झकारिया यांना ‘सीएनएन’वर दिलेल्या मुलाखतीत केली आहेत. ‘न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स’ या दर्जेदार नियतकालिकात ‘इज इस्रायल कमिटिंग जेनोसाइड’ असा लेखही लिहिला आहे.
हा वंशसंहार थांबवणार कसा, आंतरराष्ट्रीय कायद्याचा धाक इस्रायलवर (इस्रायलला पाठीशी घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालय तसेच आंतरराष्ट्रीय (तंटे) न्यायालय यांच्याकडेही गांभीर्यानं न पाहणाऱ्या अमेरिकेवर) राहणार आहे की नाही, हा नीएर यांचा ताजा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे.
हेही वाचा..
अलेक्झांडर मॅक्कॉल स्मिथ या आताच्या झिम्बाब्वेमध्ये वाढलेल्या आणि स्कॉटलंडमध्ये कारकीर्द केलेल्या लेखकाने आधी लहान मुुलांसाठी पुस्तके लिहिली. मग ‘द नंबर वन लेडीज डिटेक्टिव्ह एजन्सी’ ही कादंबरी लिहिली. ती इतकी लोकप्रिय झाली की १९९८ ते २०२२ पर्यंत या कादंबरीचे पुढील २४ भाग आले. या लेखकाचे नवे पुस्तक येत्या आठवड्यात दाखल होणार आहे. तो इतक्या वेगात कादंबऱ्या लिहितो कसा हे सांगणारी काही मुलाखत. https://shorturl.at/qcUEG
या महिन्यात अमेरिकी- ब्रिटिश मासिके, साप्ताहिके ‘समर फिक्शन’चा भला मोठा वाचनखाऊ उभारणार आहेत. वर्षभर थांबवून ठेवलेली पुस्तके या काळात प्रकाशित होतात. ती कोणती, ते इथे पाहा.
https://shorturl.at/sj82i
सेजल शहा या नावाची एक भारतीय अभिनेत्रीदेखील असली, तरी याच नावाची अमेरिकी लेखिकासुद्धा आहे. ‘ हाऊ टू मेक युअर मदर क्राय’ हा कथासंग्रह व एक निबंधाचे पुस्तक अशी तिची अद्यापपर्यंतची साहित्यसंपदा. तिच्या कथासंग्रहातील एक कथा ज्यात भारताचे बरेच संदर्भ आहेत, ती येथे वाचा. https://shorturl.at/j1fzJ