योगेन्द्र यादव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बहुसंख्याकवादाचा विरोध करायचा असेल, तर आपण द्रविडियन राजकारणाच्या तीन वैचारिक आधारांकडे वळले पाहिजे : त्यापैकी एक म्हणजे प्रादेशिकता, दुसरा म्हणजे बुद्धिवाद आणि तिसरा म्हणजे नव्या मार्गानी सामाजिक न्याय!

जगाचा नकाशा तुम्ही कधी दक्षिणेकडचा भाग वर घेऊन पाहिला आहे का? तो जगाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन अक्षरश: उलटासुलटा करून टाकतो. तो पाहताना तळाकडच्या ऑस्ट्रेलियाचे, मध्यवर्ती असलेल्या आफ्रिकेचे आणि लॅटिन अमेरिकेचे महत्त्व आपल्या लक्षात येऊ लागते. या नकाशातून जगाच्या दक्षिणेचे महत्त्व लक्षात येते आणि युरोप आणि उत्तर अमेरिकेचे स्थानही सहज समजते.  जगाच्या नकाशाची ही रचना बघताना आपल्याला जगाबद्दल काय माहीत असायला हवे याचीही आपल्याला लगेच कल्पना येते. ते म्हणजे पृथ्वी गोल आहे आणि तिच्या या गोलाकाराची कल्पना करण्यासाठी कोणताही ‘योग्य’ कोन नाही; आपल्याला सवयीचे असलेले उत्तरेकडील नकाशे आपण बघतो ते वसाहतवादी शक्तींनी आपल्यावर लादलेल्या दृष्टिकोनातून.

आपल्या देशाचा दक्षिणेकडचा असा नकाशा का नाही, हा प्रश्न मी भारत जोडो यात्रेच्या पहिल्याच दिवशी स्वत:ला विचारला होता. मी कन्याकुमारीत केप कॅमोरिन पॉइंट येथे उभा होतो. भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक (भारताचे टोक म्हणता येणार नाही, कारण आणखी दक्षिणेकडे निकोबार बेटे आहेत). हा त्रिवेणी संगम आहे, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर या तीन समुद्रांच्या संगमाचे ठिकाण. विवेकानंद  शिला स्मारक आणि तिरुवल्लुवरच्या भव्य पुतळय़ाकडे पाठ करून मी ही यात्रा ज्या दिशेने निघाली आहे, त्या दिशेला म्हणजे काश्मीरकडे पाहिले आणि मला जाणवले की मी उभा होतो तिथूनच भारत सुरू होतो. कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या या प्रवासाने नव्या भारताच्या कल्पनेची दारे उघडली आहेत.

प्रोफेसर गणेश देवी यांनी नव्या भारताच्या या कल्पनेला नाव दिले आहे, दक्षिणायन. २०१६ मध्ये त्यांनी आणखी अनेक लेखकांसह दक्षिणायन ही चळवळ सुरू केली. ते सुद्धा या भारत जोडो यात्रेच्या उद्घाटनासाठी आले होते आणि त्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलावर आम्ही सगळे एकत्र होतो. इडली सांबार आणि दक्षिण भारतीय फिल्टर कॉफीचा आस्वाद घेता घेता त्यांनी आम्हाला दक्षिणायनची संकल्पना आणि त्यामागची गोष्ट सांगितली. उजव्या विचारसरणीच्या शक्तींनी प्रोफेसर एमएम कलबुर्गी यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या पत्नीला सोबत करण्यासाठी प्रो. गणेश देवी आणि त्यांची पत्नी सुरेखा यांनी त्यांचे गुजरातमधील वडोदरा येथील घर कर्नाटकातील धारवाड येथे हलवले.  प्रो. देवी यांच्या दृष्टीने दक्षिणायन या संकल्पनेला दुहेरी महत्त्व आहे. उत्तरेकडील कल दाखवणाऱ्या ‘उत्तरायण’ या संकल्पनेच्या विरोधी दक्षिणेकडे कल दाखवणारे दक्षिणायन. आणि दुसरे म्हणजे दिवस लहान आणि रात्र मोठी असलेल्या काळाचे राजकीय रूपक म्हणून दक्षिणायन.

भारत जोडो यात्रा ही अशा पद्धतीने भारताचे दक्षिणायन आहे. रात्री मोठय़ा आहेत, दिवस लहान आहेत. पुढचा रस्ता दक्षिणेकडे जाणारा आहे. आपण दक्षिणेकडे वळले पाहिजे. आपल्या प्रजासत्ताकासमोर मूलभूत आव्हान उभे आहे. आणि अशा वेळी दक्षिण भारत आपल्याला आशा दाखवतो आहे आणि वैचारिक पाठबळ देतो आहे.

दक्षिण भारत खास धडे का देतो?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या जोडीदारांच्या सांस्कृतिक आक्रमणाला तोंड देण्यासाठी तुलनेत अधिक समर्थ आहे, म्हणून फक्त दक्षिण भारत वेगळा आहे असे नाही. तर १९९१ मध्ये कर्नाटकात, अलीकडे तेलंगणात थोडेफार यश मिळाले असले आणि केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चांगला रुजलेला असला तरी भाजपच्या राष्ट्रवादाला उत्तर आणि पश्चिम भारतात मिळाला आहे तसा प्रतिसाद दक्षिण भारतात मिळालेला नाही. केरळ आणि तमिळनाडूमधील पक्षांची रचना आगळीवेगळी आहे. तशी इतरत्र होऊ शकत नाही, हे त्यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे. 

दक्षिण भारताचे खास धडे फक्त प्रशासकीय गोष्टींपुरते मर्यादित नाहीत. देशभरात फिरणारा कुणीही सांगू शकेल की सरकारपासून रेस्टॉरंटपर्यंत सर्व काही दक्षिणेत अधिक चांगल्या पद्धतीने चालते. साऊथ व्हर्सेस नॉर्थ इंडियाज ग्रेट डिव्हाईड या नीलकंठन आर. एस. यांच्या आगामी पुस्तकात हे विरोधाभास अतिशय प्रभावीपणे मांडले गेले आहेत. आरोग्य आणि प्रगतीच्या मापदंडांवर दक्षिणेकडील राज्यांमधील बालकांची परिस्थिती तुलनेत अधिक चांगली असते हे लेखकाचे म्हणणे भारताच्या आर्थिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रासंदर्भातील आकडेवारीवर एक नजर टाकली की स्पष्ट होते. परिणामी, उत्तर भारतीय बालकांपेक्षा दक्षिण भारतीय बालकांचे जीवन अधिक चांगले असण्याची शक्यता आहे. केरळने साक्षरतेचे प्रारूप दिले, कर्नाटक साहित्याच्या क्षेत्रात अग्रेसर आहे, तमिळनाडू आपल्याला कल्याणकारी योजना कशा चालवायच्या हे शिकवू शकते आणि आंध्र प्रदेश सेंद्रिय शेतीत अग्रेसर आहे. उर्वरित भारत राज्यकारभारात दक्षिण भारताकडून बरेच काही शिकला आहे आणि आणखीही शिकू शकतो.

भारतासाठी द्रविड क्षण

असे असले तरी दक्षिण भारतातील प्रशासकीय यश हा मुद्दा, कन्याकुमारीमध्ये ज्या दिवशी भारत जोडी यात्रा सुरू झाली, त्या दिवशी माझ्या मनात प्राधान्यक्रमावर नव्हता. माझे दक्षिणायन वैचारिक चळवळीविषयीचे होते. मी तमिळनाडूत होतो आणि द्रविड चळवळ आणि तिचा वैचारिक वारसा माझ्या मनात होता. प्रबळ भारतीय राष्ट्रवादापुढचा प्रश्न किंवा आव्हान म्हणून या चळवळीकडे विसाव्या शतकात बघितले जात होते. आज, या परिघीय राजकीय प्रवाहात भारतीय राष्ट्रवादाची पुन्हा व्याख्या करण्याची आणि प्रजासत्ताक वाचवण्याची क्षमता आहे. बहुसंख्याकवादी राष्ट्रवादाच्या सध्याच्या हल्ल्याचा प्रतिकार करायचा असेल, तर आपण द्रविडीयन राजकारणाच्या तीन वैचारिक स्तंभांकडे वळले पाहिजे : ते म्हणजे प्रादेशिकता, बुद्धिवाद आणि सामाजिक न्याय.

 अर्थात, या तीन कल्पनांची नव्या पद्धतीने मांडणी करावी लागेल.  तमिळ इलम, राष्ट्रवाद किंवा सांस्कृतिक वर्चस्व या कल्पनेपासून प्रादेशिकता ही संकल्पना वेगळी करावी लागेल. तमिळ राष्ट्रवाद म्हणजे भाजप-संघाच्या सगळा देश कोणत्या तरी एकाच सूत्रात गुंफण्याच्या भूमिकेला तमिळ राष्ट्रवादासारख्या मुद्दय़ाच्या आधारे देऊन भारतीय संघराज्यवादाची नव्याने व्याख्या करता येऊ शकते. त्यामुळे राष्ट्र-राज्य या संकल्पनेतून सर्व वैविध्यांमधला एकजिनसीपणा शोधणाऱ्या रचनेपेक्षा सर्व सामाजिक आणि सांस्कृतिक वैविध्यांचा आदर करणारी राज्य-राष्ट्र अशी रचना असेल.

 त्याचप्रमाणे सामाजिक न्यायाचा शोध घेताना सरधोपट ब्राह्मणविरोधी राजकारणाच्या पलीकडे जावे लागेल. जन्माच्या आधारे वाटय़ाला येणारी असमानता संपवण्यासाठीची रचनाही तशीच करणे योग्य ठरणार नाही. जातिव्यवस्था आणि लिंगभेदासह इतर सामाजिक विषमता नष्ट करण्याची  मागणी असायला हवी. शेवटी, त्याकडे धर्मविरोधी सिद्धांत म्हणून न बघता, धर्माच्या नावाखाली स्वीकारल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या कट्टरता, अत्याचार आणि हिंसाचाराचा सैद्धांतिक विरोध म्हणून बघितले पाहिजे. यातून नवीन प्रकारच्या धर्मनिरपेक्षतेचा पाया उभारला जाईल. त्याची आपल्याला नितांत गरज आहे.

योगायोगाने, मी भारताचा ज्या प्रकारचा नकाशा शोधत होतो, त्या प्रकारचा नकाशा ‘हिमाल- साउथ एशिया’ या पहिल्यावहिल्या दक्षिण आशियाई मासिकाने प्रसिद्ध केला होता. या मासिकाचा विस्तार आता बराचसा संकुचित झाला आहे. या नकाशामध्ये श्रीलंका दक्षिण आशियाच्या सगळय़ात वर दाखवला गेला होता. आता आपणदेखील भारताकडे याच दृष्टीने, याच दिशेकडून बघायला हवे आहे. कन्याकुमारीमधून सुरू झालेली भारत जोडो यात्रा ही कदाचित त्याची सुरुवात असू शकते.

लेखक ‘जय किसान आंदोलन’ आणि ‘स्वराज इंडिया’चे संस्थापक आहेत.

yyopinion@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogendra yadav article bharat jodo yatra dravidian politics zws