योगेन्द्र यादव
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एखाद्या आदिवासी स्त्रीने राष्ट्रपतीपदावर विराजमान होणे हे प्रतीकात्मक आहे, अशी टीका झाली. त्यासंदर्भात आधीच्या राष्ट्रपतींची उदाहरणेही दिली गेली. आता नव्या राष्ट्रपतींच्या कारकीर्दीतून या चर्चेला उत्तरे मिळू शकतात.
‘द्रौपदी मुर्मू देशाच्या राष्ट्रपती झाल्या आहेत, याबद्दल अभिनंदन !’ मी माझ्या एका परिचितांना म्हणालो.
‘द्रौपदी मुर्मू देशाच्या राष्ट्रपती होणे यात विशेष ते काय?’ त्यांनी मला विचारले.
‘विशेष आहेच, नाही कसे?’ मी त्यांनाच उलट विचारले. ‘त्यांच्यामुळे पहिल्यांदाच आदिवासी समाजाच्या प्रतिनिधीला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याची संधी मिळते आहे आणि तीही एका स्त्रीला! या वेळी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये आपले लष्कर एका आदिवासी स्त्रीला सलामी देईल. इतर कुणाला वाटो न वाटो, मला तरी या गोष्टीचा अभिमान वाटेल. या स्त्रीला अशा पद्धतीने लष्कराची सलामी घेताना दूरचित्रवाणीवरून पाहणाऱ्या किती मुलींना त्यातून प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल, याची कल्पना करा.’
हा संवाद ज्यांच्याबरोबर सुरू होता, त्या माझ्या परिचितांच्या चेहऱ्यावर उत्साह नव्हता. ते म्हणाले, ‘एक स्त्री राष्ट्रपतीपदावर विराजमान होते आहे, असे पहिल्यांदाच घडते आहे, असे कुठे आहे? याआधीही एका स्त्रीने हे पद विभूषित केले आहे. त्यामुळे एखाद्या आदिवासी स्त्रीने राष्ट्रपती होण्यामध्ये असे विशेष ते काय आहे?’
हा प्रश्न येणार हे मला माहीत होते. त्यामुळे माझी माहितीही तयारच होती. २०११ च्या जनगणनेनुसार, आपल्या देशातील साक्षरतेचे प्रमाण ६४ टक्के आहे. परंतु आदिवासी स्त्रियांमध्ये ते प्रमाण फक्त ४२ टक्के आहे. या जनगणनेनुसार संपूर्ण देशात पदवीधरांचे प्रमाण नऊ टक्क्यांच्या जवळपास आहे. परंतु आदिवासी स्त्रियांमध्ये ते तीन टक्क्यांपेक्षा कमी होते. आरोग्याच्या संदर्भातील कोणतेही उदाहरण घ्या. मग ते उदाहरण बालमृत्यूचे असो, मुलींच्या कुपोषणाचे असो किंवा पंडुरोगग्रस्त स्त्रियांचे असो, त्यातून हेच दिसते की आदिवासी स्त्रियांची स्थिती देशात सगळ्यात वाईट आहे. या देशात सगळय़ात शेवटची व्यक्ती कोण असेल तर ती आदिवासी स्त्रीच!
माझ्या या माहितीमुळे माझ्या या परिचितांची बोलती बंद झाली हे बघून मला आणखीनच उत्साह आला. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती होणे हा एका व्यक्तीचा, एका स्त्रीचा नाही, तर सामाजिक उतरंडीमध्ये शेवटच्या पायरीवर असलेल्या सहा कोटी आदिवासी स्त्रियांचा सन्मान आहे. मी आजपर्यंत कधी त्यांना भेटलो नाही, पण त्यांच्याबद्दल जे काही वाचले आहे, त्यावरून लक्षात येते की त्या अत्यंत विलक्षण आहेत. त्यांच्या गावातील त्या पहिल्या पदवीधर आहेत. बिकट परिस्थितीतही शिक्षण घेण्याची त्यांची तळमळ, त्यानंतर समाजसेवेसाठी स्वत:ला वाहून घेणे आणि वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळे आघात सोसूनही सार्वजनिक जीवनात टिकून राहणे हे खरोखरच अद्भुत आहे. राज्यपाल म्हणून काम केल्यानंतरही त्यांचा समाजाशी असलेला धागा तुटला नाही, हे त्यांचे वेगळेपण नोंद घेण्याजोगे आहे. झारखंडमध्ये दलित, आदिवासी आणि इतर मागासलेल्या समाजातील मुलींसाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातर्फे शाळा चालवल्या जातात. झारखंडच्या राज्यपाल असताना द्रौपदी मुर्मू यांनी तेथील या सगळय़ा शाळांना भेट दिली होती. राज्यपालांनी असे करणे हे काही कमी महत्त्वाचे नाही.
माझे हे बोलणे माझे हे परिचित लक्षपूर्वक ऐकत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नाहीत. ते म्हणाले, राष्ट्रपतीपद हे रबर स्टॅम्पसारखे असते. त्यामुळे त्या खुर्चीवर जो कोणी बसेल त्याच्या समाजातील लोकांना त्यामुळे काय फरक पडणार आहे? इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर शिखांची कत्तल झाली, तेव्हा ग्यानी झैलसिंग राष्ट्रपती होते, हे तुम्ही विसरलात की काय? गुजरात दंगलीनंतर अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले. पण त्यामुळे दंगल पीडितांना न्याय मिळाला का? रामनाथ कोविंद यांच्या राष्ट्रपतीपदाच्या काळात दलितांवर कितीतरी अत्याचार झाले. या कोणाच्याही पदामुळे काय फरक पडला?
त्यांचे बोलणे ऐकून मला एक प्रसंग आठवला. द्रौपदी मुर्मू एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असल्याची बातमी २२ जून रोजी आली. त्याच्या बरोबर दहा दिवसांनंतर, मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातून बातमी आली की रामप्यारी नावाच्या सहारिया आदिवासी समुदायातील ३८ वर्षीय स्त्रीला जिवंत जाळण्यात आले. तिच्या कुटुंबाला मध्य प्रदेश सरकारने सहा बिघे जमीन दिली होती. त्या कुटुंबाकडे जमिनीची कागदपत्रेही होती. मात्र ती जमीन बिगर आदिवासी समाजातील लोकांच्या ताब्यात होती, ते ती कसत होते. वरून ते रामप्यारीच्या कुटुंबीयांना धमकावत होते. घटना घडली त्याच्या आठवडाभरापूर्वी रामप्यारी आणि तिचा पती अर्जुन यांनी पोलिसांना या सगळय़ा प्रकाराची माहिती दिली होती आणि त्या बिगर आदिवासी लोकांपासून संरक्षण मागितले होते. पण ते मिळाले नाही. त्या बिगर आदिवासी लोकांनी आपले शेत कसण्यावर रामप्यारी यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर त्या लोकांनी रामप्यारी यांच्यावर डिझेल टाकून त्यांना जिवंत जाळले. या घटनेचे चित्रीकरणही उपलब्ध आहे. मी विचार करू लागलो, द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्यास रामप्यारी आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल का? या देशात आणखी एक रामप्यारी दिवसाढवळय़ा जाळली जाणार नाही याची खात्री दिली जाईल का?
माझा हा सगळा विचार सुरू होता. तो थांबवत माझे परिचित म्हणाले, हे बघा, प्रतीकांचे महत्त्व मलाही कळते. राष्ट्रपती फक्त रबर स्टॅम्प असतील तर मग मुखर्जी, पाटील, शर्मा, सिन्हा, रेड्डी आणि यादव यांच्या ऐवजी मुर्मू, सोरेन, मुंडा, राठवा, मीना किंवा जाटव आणि वाल्मिकी ही नावे असणे मलाही आवडेल. लाखो वर्षे सत्तेबाहेर राहिलेल्या समाजाला त्याचे प्रतिनिधी खुर्चीत बसल्यावरच न्याय मिळेल.
आता हे परिचित सलग बोलायला लागले होते. ते म्हणाले, खरा प्रश्न हा आहे की दलित किंवा आदिवासी कोणत्या मार्गाने खुर्चीपर्यंत पोहोचतील? बाबासाहेब आंबेडकर, नेल्सन मंडेला आणि मार्टिन ल्यूथर किंग यांनी दाखवलेला क्रांतीचा मार्ग हा एक पर्याय आहे. म्हणजेच सामाजिक न्यायाच्या चळवळीच्या जोरावर बहिष्कृत समाजातील लोकांनी सत्ता काबीज करावी. तामिळनाडूतील द्रविड चळवळ आणि कांशीराम यांच्या बसपाने कमी-अधिक प्रमाणात हा मार्ग स्वीकारला. बहिष्कृत समाज या मार्गाने सत्ता मिळवून, तिचा वापर मूलभूत सामाजिक न्यायासाठी करू शकतो. दुसरा मार्ग बराक ओबामा किंवा राष्ट्राध्यक्ष के. आर. नारायणन यांनी दाखवला होता. या मार्गाचा अवलंब करणाऱ्यांना सामाजिक न्यायाच्या चळवळीच्या माध्यमातून सत्ता मिळत नाही. पण सत्ता मिळाल्यानंतर त्यांच्यासारखे काही नेते आपली वैयक्तिक प्रतिभा आणि वैचारिक बांधिलकीच्या जोरावर समाजाचे हित साधतात. तिसऱ्या मार्गाला चमचा मार्ग किंवा शिखंडी मार्ग असे काहीही म्हटले जाऊ शकते. या मार्गाने येणाऱ्या बहिष्कृत समाजातील नेत्यांना मोठमोठय़ा खुर्च्यावर बसवले जाते. ते आपल्या समाजावरील अन्याय, अत्याचार झाकण्याचे काम करतात. असे नेते सक्षम असले तरी उपेक्षित समाजाच्या संतापाच्या ज्वालामुखीचा उद्रेक होऊ नये म्हणून त्यांचा उपयोग सुरक्षा झडपेसारखा केला जातो. जेणेकरून या वर्गाची मतेही मिळतात आणि सत्तेला त्यांच्यासाठी काहीही करावे लागत नाही. सामाजिक अन्याय आणि शोषणाची व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी ते खूप उपयुक्त ठरतात.
‘द्रौपदी मुर्मू यापैकी कोणत्या मार्गाचा अवलंब करतील, या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यावर मी तुमचे अभिनंदन स्वीकारेन’, असे सांगत त्यांनी आपला मुद्दा पूर्ण केला.
त्यांचे म्हणणे बरोबर होते, पण माझे मन काही मान्य करत नव्हते. त्यामुळे मग मी, मी केलेले अभिनंदन स्वीकारेल अशा दुसऱ्या व्यक्तीच्या शोधात निघालो.
लेखक ‘जय किसान आंदोलन’ आणि ‘स्वराज इंडिया’चे संस्थापक आहेत. yyopinion@gmail.com