योगेंद्र यादव
भगवी कफनी घालणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्यावर संघ परिवाराने कधीचाच हक्क सांगितला असला तरी या कफनीच्या पलीकडे असलेले विवेकानंद संघविचारांना अजिबातच झेपणारे नाहीत..
‘विवेकानंद : द फिलॉसॉफर ऑफ फ्रीडम’ हे गोविंद कृष्णन व्ही. यांचे नुकतेच प्रसिद्ध झालेले पुस्तक मी रेल्वे प्रवासात वाचायला घेतले होते. आदल्या दोन संध्याकाळी मी हेडलबर्ग विद्यापीठाच्या साऊथ एशिया इन्स्टिटय़ूट ऑफ युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर राहुल मुखर्जी यांच्याशी विवेकानंदांबद्दल दीर्घ संभाषण केले होते. त्यांनी विवेकानंद आणि रामकृष्ण आश्रम माझ्यापेक्षा कितीतरी अधिक वाचले आहेत. तो दिवस होता ४ जुलै, नेमका त्याच दिवशी अमेरिकन स्वातंत्र्यदिन होता आणि स्वामी विवेकानंदांची १२१ वी पुण्यतिथीदेखील होती.
माझ्या पिढीतील अनेकांप्रमाणे, मीदेखील या कठीण काळात आपल्या प्रजासत्ताकाचे रक्षण करू शकतील अशा राजकारणासाठीच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक संसाधनांच्या शोधात आहे. त्यात या पुस्तकाच्या ‘हाऊ द संघ परिवार्स ग्रेटेस्ट आयकॉन इज इट्स आर्च नेमेसिस’ या टॅग लाइनने मला खेचून घेतले. मला असे वाटते की नवीन कल्पना, नवीन प्रवाह शोधणे आणि नवीन मित्र करणे याऐवजी, उदारमतवादी-पुरोगामी मंडळींनी आपल्या सांस्कृतिक पोषणाचे क्षेत्र कमी केले आहे. याउलट संघ – भाजपकडे बघा. त्यांना ज्यांच्यावर दावा सांगता येणार नाही अशा सरदार पटेल, नेताजी सुभाष बोस, लोकनायक जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया आणि अगदी शहीद भगतसिंग या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांना आपल्या विचारसरणीत सामावून घेण्यासाठी त्यांनी आपली पोहोच वाढवली आहे.
तर, गेल्या दोन शतकांतील हिंदू धर्माचा सर्वात प्रसिद्ध जागतिक राजदूत असलेला, भगवा परिधान केलेला हिंदू भिक्षू, हिंदूत्वाच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या द्वेषाच्या राजकारणाविरुद्धच्या लढाईत आपला सहकारी आहे का? हे कदाचित विचित्र वाटू शकेल. कारण शेवटी, स्वामी विवेकानंद हे संघ परिवारासाठी एक प्रतीक आहेत. आधुनिक काळातील काही महान भारतीयांपैकी एक असलेल्या विवेकानंदांवर संघ परिवार आमचेच म्हणून दावा सांगू शकतात. संघ-भाजप स्वामी विवेकानंदांवर सांगतो तो दावा म्हणजे अवैध विनियोगाची राजकीय कृती, यापलीकडे दुसरे काही नाही, हे दाखवून देणे हे या पुस्तकाचे सगळय़ात मोठे काम आहे. आपल्या प्रजासत्ताकावर पुन्हा हक्क मिळवण्याच्या सर्वात कठीण कामासाठी हे पुस्तक स्वामी विवेकानंदांच्या महान वारशाची संघ भाजपच्या तावडीतून सुटका करते.
लेखक आपल्याला आठवण करून देतो की स्वामी विवेकानंद त्यांच्या भगव्या कफनीच्याही पलीकडे बरेच काही होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू संघ परिवाराने परिश्रमपूर्वक उभारलेल्या त्यांच्या प्रतिमेत बसणार नाहीत. स्वामी विवेकानंदांनी ब्रह्मचर्य आणि संपत्ती न मिळवण्याच्या साधूच्या व्रतावर विश्वास ठेवला आणि त्याचे पालन केले, परंतु त्यांचा आत्मत्याग वगैरे मान्य नव्हता. ते खुलेपणाने आणि नियमितपणे धूम्रपान करत. आवडीने मांसाहार करत. योगसाधना वगैरे करायला त्यांना अजिबात आवडत नसे.
त्याच्या भटकंतीच्या वर्षांमध्ये, भगवद्गीताव्यतिरिक्त त्यांनी सोबत घेतलेले एकमेव पुस्तक म्हणजे द इमिटेशन ऑफ ख्राइस्ट- ख्रिस्ताचे अनुकरण. या दोन्ही पुस्तकांनी त्यांना प्रेरणा दिली. मुघल शासकांचे प्रशंसक आणि ताजमहालाच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झालेले स्वामी विवेकानंद नियमितपणे मुस्लीम फकिरांशी संवाद साधत. स्वामी मोहम्मदानंद असे नाव घेतलेल्या सर्फराज हुसेन या मुस्लीम अनुयायालाही ते भेटले. नवीन मंदिरे बांधण्याची मोहीम काढण्याइतपत धीर स्वामीजींकडे नव्हता आणि माणसांमधील गरिबी आणि उपासमारीकडे डोळेझाक करणाऱ्या गोरक्षणाच्या मोहिमेचा तर त्यांना तिरस्कार होता. असे स्वामी संघ परिवाराचे प्रतीकामध्ये अजिबातच बसत नाहीत.
होय, स्वामी विवेकानंद हे हिंदू धर्माभिमानी हिंदू होते. पण ते हिंदू वर्चस्ववादी नव्हते. त्यांच्या काळातील वसाहतवाद्यांच्या तसेच सुशिक्षित भारतीयांच्या हिंदू धर्माची विटंबना करण्याच्या प्रचलित प्रवृत्तीच्या विरोधात ते उभे राहिले. पण त्यांनी इतर कोणत्याही धर्माला धक्का लावला नाही. किंबहुना त्यांना येशू ख्रिस्तापासून प्रेरणा मिळत असे आणि इस्लाममधील समानतेच्या संदेशाचे ते प्रशंसक होते. त्यांचा असा विश्वास होता की हिंदू तत्त्वज्ञानाकडे, विशेषत: वेदांताच्या अद्वैत (द्वैतवादी) तत्त्वज्ञानाकडे, उर्वरित जगाला शिकवण्यासाठी बरेच काही आहे. परंतु म्हणून हिंदू तत्त्वज्ञान हे श्रेष्ठ आणि इतर धर्मापेक्षा वेगळे आणि वरचढ आहे, हे त्यांना मान्य नव्हते. स्वामी विवेकानंदांच्या मते हिंदू सिद्धांताचे वेगळेपण म्हणजे इतर सर्व धर्माचे सत्य ओळखण्याची क्षमता.
विवेकानंदांचा दाखला देऊन हिंदूत्वाव्यतिरिक्त अन्य धर्माचे आचरण करणाऱ्यांच्या विरोधात मोहीम उघडू पाहणाऱ्यांनी विवेकानंदांनी येशू ख्रिस्तांविषयी काय म्हटले आहे, ते नीट लक्षात घ्यावे. ‘‘मी येशू ख्रिस्ताच्या काळात जन्माला आलो असतो, तर मी त्यांची पावले माझ्या अश्रूंनी नव्हे, तर माझ्या हृदयातील रक्ताने धुतली असती.’’ त्यांच्या मते भारतीय संस्कृतीच्या अध:पतनास मुस्लीम आक्रमकांना किंवा ख्रिस्ती वसाहतवाद्यांना जबाबदार धरता येणार नाही. हे अध:पतन मुस्लीम आक्रमक भारतात येण्याच्या बरेच आधी सुरू झाले होते आणि त्याला हिंदू समाजातील विषमता आणि अज्ञान जबाबदार होते. ‘‘मोहम्मदाचे भारतावरील आक्रमण हे खरेतर येथील दीन-दलितांचा आणि गरिबांचा उद्धार करणारे ठरले. सुमारे एक पंचमांश हिंदूंनी इस्लामचा स्वीकार करण्यामागे हेच कारण होते. हे तलवारीच्या धाकाने घडले नाही. हे सारे जाळपोळ आणि रक्तपात केल्यामुळे झाले, असे मानणे हा मूर्खपणाचा कळस ठरेल.’’ विवेकानंदांनी इस्लामची समता आणि बंधुतेच्या तत्त्वांबद्दल, अद्वैताचे प्रत्यक्षात आचरण करणारा पहिला धर्म ठरल्याबद्दल वारंवार प्रशंसा केली आहे. ते म्हणतात, ‘‘हिंदूंना अन्य वंशांच्या आधी अद्वैताच्या सत्यापर्यंत पोहोचण्याचे श्रेय दिले जाऊ शकते, मात्र हिंदूंमध्ये वैश्विक स्तरावर प्रत्यक्ष अद्वैत कधीच विकसित होऊ शकले नाही. समतेच्या स्तरावर प्रशंसनीय पद्धतीने जर कोणता धर्म पोहोचला असेल, तर तो केवळ आणि केवळ इस्लामच आहे.’’
महात्मा गांधींची हिंदूत्वाशी असलेली निष्ठा किंवा मौलाना आझाद यांचे इस्लामप्रती असलेले समर्पण याप्रमाणेच विवेकानंदांनी केलेला हिंदूत्वाचा प्रसारही पूर्णपणे समतेच्या तत्त्वावर आधारित होता. अन्य धर्मापेक्षा हिंदूत्व श्रेष्ठ, असा दावा त्यात कधीही नव्हता. शासनाने संघटित धर्मापासून कायमच अंतर राखले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. स्वामी विवेकानंदांचा वैश्विक धर्माचा सिद्धांत विविध धर्माविषयीच्या सहिष्णुतेचा पाया तर आहेच, शिवाय हा सिद्धांत धार्मिक विविधता गौरवास्पद असल्याचेही अधोरेखित करतो. ‘‘मानवाला हे शिकवले गेले पाहिजे की जगात अस्तित्वात असणारे सर्व धर्म ही एकाच धर्माची विविध रूपे आहेत. आणि तो धर्म आहे एकात्मतेचा. तिथवर पोहोचण्यासाठी प्रत्येकजण स्वत:च्या सोयीचा मार्ग स्वीकारू शकतो.’’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष विवेकानंदांच्या नावाने जाती-धर्माधारित भेदांचा आणि बहुसंख्यवादी राजकारणाचा पुरस्कार करत असले, तरी प्रत्यक्षात मात्र विवेकानंद अशा भेदभावाचे कट्टर विरोधक होते.
लेखक ‘जय किसान आंदोलन’ आणि ‘स्वराज इंडिया’चे संस्थापक आहेत.
yyopinion@gmail.com